You are currently viewing कळसुत्री बाहुली कलाकार गणपत मसगे यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार प्रदान

कळसुत्री बाहुली कलाकार गणपत मसगे यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार प्रदान

कुडाळ  :

उदयपूर येथील शिल्पग्राम महोत्सवात पिंगुळी येथील कळसुत्री बाहुली कलाकार गणपत मसगे यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी स्थानिक आमदार फुलसिंग मिणीजी तसेच पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे निर्देशक फुरकान खान व इतर मान्यवर उपस्थित होते. ठाकर लोककलाकार गणपत सखाराम मसगे यांनी केलेल्या ठाकर लोककलांच्या संवर्धन, संगोपनाच्या महान कार्याबद्दल तसेच चित्रकथी व कळसुत्री बाहुल्यांच्या कलेमध्ये केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेऊन या पुरस्कारासाठी यांची निवड राजस्थान सरकारकडून करण्यात आली.

महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान या चार राज्यांचा समावेश पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र या केंद्रात येतो. मसगे यांना कोमल कोठारी लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार म्हणून रजतपत्र, सन्मानपत्र तसेच २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. देशभरातील कला व लोककला क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कलाकारांमधून निवडलेल्या लोककला या क्षेत्रात निवडलेले गणपत मसगे हे एकमेव व पहिले कलाकार आहेत, ज्यांना हा पुरस्कार दिला जात आहे. ग्रामीण भागातून असूनही देशस्तरावर आपल्या कार्याची व कलेची छाप मसगे यांनी निर्माण केल्यामुळे त्यांचा गौरव करण्यात आला, असे आयोजकांनी नमूद केले. हा पुरस्कार अधिक चांगले काम करण्यासाठी नवी उर्जा देणारा आहे, अशी प्रतिक्रिया मसगे यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा