You are currently viewing रविवार, ०५ जानेवारीला तिसरे इंद्रायणी साहित्य संमेलन

रविवार, ०५ जानेवारीला तिसरे इंद्रायणी साहित्य संमेलन

*रविवार, ०५ जानेवारीला तिसरे इंद्रायणी साहित्य संमेलन*

पिंपरी

रविवार, दिनांक ०५ जानेवारी २०२५ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्यनगरी, जयगणेश बॅंक्वेट हॉल, पुणे – नाशिक हमरस्ता, मोशी येथे इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित तिसऱ्या एकदिवसीय इंद्रायणी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते सकाळी ९:०० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार असून ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक दादाभाऊ गावडे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत; तर मोशीच्या कन्या आणि स्नुषा वंदना हिरामण आल्हाट स्वागताध्यक्ष आहेत. तत्पूर्वी, सकाळी ठीक ८:०० वाजता ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिर ते कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्यनगरी या संमेलनस्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर समिती सदस्य ॲड. माधवी निगडे यांच्या हस्ते ग्रंथदिंडी पूजन करण्यात येईल. उद्घाटन सत्रात डॉ. श्रीपाल सबनीस यांना ‘यशवंतराव चव्हाण प्रज्ञावंत साहित्य पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असून ‘अक्षर इंद्रायणी’ स्मरणिका आणि दादाभाऊ गावडे लिखित ‘ताल – भवताल’ या कथासंग्रहाचे प्रकाशन; तसेच ‘स्वातंत्र्यसंग्रामातील समिधा’ या क्रांतिकारकांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार महेश लांडगे, बाबाजी काळे, संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. शिवाजीराव मोहिते, महाराष्ट्र साहित्य परिषद – पुणे कार्यवाह सुनीताराजे पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. अरुण दातार या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होईल.

सकाळी ११:०० वाजता डॉ. आरती दातार यांच्या अध्यक्षतेखाली ‘ज्ञानेश्वरी – काळाची गरज’ या परिसंवादात डॉ. नारायणमहाराज जाधव, ॲड. डॉ. यशोधनमहाराज साखरे, योगी निरंजननाथ आणि रामदास जैद आपले विचार मांडतील. भोजनोत्तर सत्रात संमेलनाध्यक्ष दादाभाऊ गावडे आणि ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्याशी प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून अनुक्रमे राजेंद्र घावटे आणि संदीप तापकीर संवाद साधणार आहेत. सायंकाळी ५:०० वाजता अरुण बोऱ्हाडे लिखित ‘दुर्ग भटकंती : जिंजी, वेल्लोर, तंजावर’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. माधवराव सानप यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. त्यानंतर उद्योजक रामदास काकडे, ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, महाराष्ट्र साहित्य परिषद – पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप सत्रात पंचक्रोशीतील बारा मान्यवरांना भूमिपुत्र पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. संमेलनातील अंतिम सत्रात शिवाजीराव चाळक यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुरेश कंक यांच्या प्रमुख उपस्थितीत निमंत्रितांचे कविसंमेलन संपन्न होणार आहे. नि:शुल्क असलेल्या या सर्व कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर, कार्याध्यक्ष सोपान खुडे, सचिव रामभाऊ सासवडे आणि निमंत्रक अरुण बोऱ्हाडे यांनी केले आहे.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा