मालवण-कसाल रस्त्यासाठी ६ रोजी आंदोलन*
मालवण
मालवण-कसाल रस्त्याच्या दुर्दशेबाबत ६ जानेवारी रोजी आनंदव्हाळ ग्रामपंचायत ते गोवेकर बसस्टॉप या दोन्ही ठिकाणी ओले शेण डंपरने ओतून आंदोलन करून रस्ता अडवणार आहोत, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते महेश जुवाटकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
मालवण-कसाल रस्ता सुधारणा व डांबरीकरण करण्यासाठी ठेकेदाराला काम दिलेले आहे. परंतु नौदल दिनानिमित्त घाई गडबडीने सार्वजनिक बांधकाम व ठेकेदाराने बोगस पध्दतीने काम पूर्ण केले. सदर रस्ता दोन महिन्यात खड्डेमय झाला. त्यावेळी स्थानिक राजकीय पक्षाने उठाव केल्यामुळे पुन्हा २ महिन्याच्या कालावधीत खराब झालेल्या रस्त्याची सुधारणा व डांबरीकरण करण्यात आले.
त्यावेळी देखील निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे पुन्हा जून महिना संपताच दुसऱ्यांदा हा रस्ता खड्डेमय बनला आहे. त्या खड्डेमय रस्त्यामुळे बरेचसे अपघात होतात. तरीही सार्वजनिक बांधकाम व ठेकेदार दुर्लक्ष करत असल्यामुळे आंदोलन करण्याचा इशारा जुवाटकर यांनी दिला आहे. यावेळी जमलेल्या जमावाने वाहनांवर दगडफेक केली असल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ठेकेदार व सार्वजनिक विभागाची राहील. याची शासनाने दखल घ्यावी. तसेच आपल्या पोलीस खात्याने संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना कार्यालयात बोलावून रस्त्यामुळे जनतेला त्रास होत असलेबाबत तो दूर कसा करता येईल याबाबत आपल्या कार्यालयाने सहकार्य करावे, असेही श्री. जुवाटकर म्हणाले आहेत.
संबंधित ठेकेदार यांना प्रशासनाने नोटीस देऊन सुध्दा रस्त्याच्या दुरूस्तीबाबत कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत. येथील आनंदव्हाळ रस्त्यावरील कारपेट टाकला होता. त्या कारपेट मिश्रणामध्ये डांबराचे प्रमाण कमी असल्यामुळे दोनवेळा रस्ता खराब झाला तसेच मोठ्या प्रमाणात खड्डे पडून पर्यटक तसेच स्थानिक जनतेला शारीरिक व मानसिक त्रास होत आहे. काही महिन्यांपूर्वी केलेल्या रस्त्याची अशी दुरवस्था होणे खेदाची बाब आहे. ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शासनाने गांभिर्याने दखल घ्यावी अशा आशयाचे निवेदन महेश जुवाटकर यांनी मालवण पोलीस स्थानकास दिले आहे. परंतु सदर रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात खडी साचल्यामुळे तसेच रस्त्याला चर पडल्यामुळे आजपर्यंत ३० ते ४० अपघात झालेले आहेत, असेही जुवाटकर यांनी म्हणाले आहे.