दुचाकीवरून न्यायालयात जात असताना वरळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश गवळी यांचा जीव शनिवारी थोडक्यात बचावला. नायलॉन मांजाने त्यांचा गळा चिरला. वेळेत उपचार मिळाल्याने राकेश गवळी बचावले.
शनिवारी दुचाकीवरून सत्र न्यायालयात राकेश गवळी जात होते. जे. जे. मार्ग जंक्शनवर अचानक पतंगीचा मांजा त्यांच्या गळ्याजवळ आला. दुचाकीवर नियंत्रण मिळवताना कधी मांजाने गळा चिरला हे त्यांच्या लक्षातच आले नाही. पोलिसाच्या गळ्यातून रक्त येताना पाहून कर्तव्यावरील वाहतूक पोलीस मदतीला धावून आले. त्यांनी गवळी यांना लगेचच जे. जे. रुग्णालयात नेले. याबाबत समजताच तत्काळ पुढील उपचार मिळावेत यासाठी पोलीस उपायुक्त परमजीत सिंग दहिया यांनी त्यांना व्होकार्ट रुग्णालयात हलविले. त्यांच्या गळ्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करून १० टाके टाकण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्याने गवळी यांचा जीव बचावला.