*पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे “पुरुष” या नाटकाचा प्रयोग रद्द*
*रंगभूमीवरील दुर्मिळ घटना*
पुणे (गुरुदत्त वाकदेकर) :
जयवंत दळवी यांच्या ४० वर्ष जुन्या कलाकृतीचे पुनरुज्जीवन करणाऱ्या पुरूष या नाटकाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मात्र, प्रयोग सुरू असताना शरद पोंक्षे अचानक त्यांच्या ओळी विसरले आणि त्यांना त्यांचे संवाद आठवले नाहीत.
नाटक सुरळीत सुरू असताना एका महत्त्वाच्या प्रसंगात पोंक्षे हरवल्यासारखे दिसले आणि संभ्रमात प्रेक्षकांकडे बघत राहिले. त्यानंतर त्यांनी प्रेक्षकांची माफी मागितली, “रसिक प्रेक्षकहो, मी पूर्ण ब्लँक झालोय, मला काहीही आठवत नाहीये, २ मिनिटं थांबू का?, अशी त्यांनी विचारणा केली.
प्रेक्षकांनी त्यांना होकार दिला आणि रंगमंचावरील दिवे बंद झाले. पोंक्षे विंगेत गेले, २ मिनिटांऐवजी ५ मिनिटं झाली, १०-१५ मिनिटं झाली. मग दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांनी स्टेजवर येऊन सांगितलं की, आम्ही प्रयत्न करतोय, हळूहळू थोडं-थोडं आठवतंय पण अजून थोडी विश्रांती घेतली की बरं वाटेल तेव्हा मध्यंतर आताच जाहीर करतो.
त्यानंतर ३० मिनिटांच्या मध्यांतरानंतर, दिवे परत लागले आणि पोंक्षे रंगमंचावर परत आले, फक्त प्रयोग रद्द होत असल्याची घोषणा करण्यासाठी.
“असं ४० वर्षात पहिल्यांदाच घडत आहे. मी तुमची माफी मागतो, तुमचे पैसे परत केले जातील” असे सांगत पोंक्षे यांनी उपस्थितांची माफी मागितली. त्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि समजूतदारपणाचे प्रेक्षकांनी कौतुक केले.
“पुरुष” या नाटकात स्पृहा जोशी, अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे यांच्याही नाटकात महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर शरद पोंक्षे या नाटकात मुख्य भूमिकेत आहेत. पोंक्षे विस्मरणावर मात करून लवकरच रंगभूमीवर पुन्हा काम सुरू करतील अशी खात्री त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.