You are currently viewing लायन्स महोत्सवात ऑटो इंडस्ट्रीज स्टॉलचा समावेश; निश्चितच व्यवसायवृध्दीसाठी कौतुकास्पद

लायन्स महोत्सवात ऑटो इंडस्ट्रीज स्टॉलचा समावेश; निश्चितच व्यवसायवृध्दीसाठी कौतुकास्पद

आमदार नीलेश राणे यांचे गौरवोद्गार

कुडाळमध्ये लायन्स महोत्सवाला उत्साहात प्रारंभ

कुडाळ :

पर्यटनाला चालना देणारा लायन्स महोत्सव सिंधुदुर्गच्या विकासासाठी महत्त्वाचे योगदान ठरत आहे. समाजात वावरताना आपण समाजाचे देणे लागतो ही सामाजिक जाणीव ठेवून लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग काम करीत आहे. आंतरराष्ट्रीय लायन्स या सेवाभावी संस्थेचे सामाजिक कार्य सर्वांसाठी भुषणावह आहे, असे गौरवोद्गार कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार नीलेश राणे यांनी लायन्स फेस्टिवलच्या उद्घाटनप्रसंगी शनिवारी रात्री येथे काढले. स्थानिकांना रोजगार देण्यासाठी आणि बंद चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी निश्चितच पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हा फेस्टिवल ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागत या पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या २३ व्या लायन्स फूड फेस्टिवलला कालपासून कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर उत्साहात सुरूवात करण्यात आली. या फेस्टिवलचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उप प्रांतपाल लायन. विरेंद्र चिखले, लायन सीए सुनील सौदागर, उपाध्यक्ष कोकण रिजन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर श्रीकृष्ण परब, उपाध्यक्ष वेस्टर्न रिजन महाराष्ट्र रमाकांत मालू, लक्ष्मी ज्वेलर्सचें राहुल पाटणकर, राजू पाटणकर, अँड अजित भणगे, अँड श्रीनिवास नाईक, लायन सेवा संकुल अध्यक्ष अँड. अमोल सामंत, लायन्स क्लब (कुडाळ) चे अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, लायन फेस्टिवल चेअरमन गणेश म्हाडदळकर, आनंद बांदिवडेकर, सीए सागर तेली, अँड समीर कुळकर्णी, मंदार शिरसाट तसेच लायन्स व रोटरी क्लबचे पदाधिकारी आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर ,रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार श्री. राणे म्हणाले, लायन्स या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेचे कार्य २१० देशात सुरू आहे. आजच्या या फेस्टिवलमध्ये विविध उत्पादित मालाला बाजारपेठ मिळण्याच्या उद्देशाने विविध स्टॉल सहभागी झाले आहेत. तसेच ऑटो इंडस्ट्रीज स्टॉलचा सुद्धा या ठिकाणी समावेश आहे. हे निश्चितच व्यवसायवृध्दीसाठी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. श्री. चिखले यांनी लायन्स क्लब कुडाळ, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेने असे महोत्सव घेऊन शतकाकडे वाटचाल करावी, अशा शुभेच्छा दिल्या. श्री. अग्रवाल यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सांस्कृतिक चळवळीचे केंद्र आहे आणि अशा जिल्ह्यात लायन्स क्लबने समाजसेवा करतानाच असे महोत्सव घेऊन सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी कटिबद्ध झाल्याचे दिसून येत आहे, असे सांगितले.

उद्योजक श्री परब यांनी लायन्सचे सेवाभावी कार्य अवर्णनीय असल्याचे सांगून बंद पडलेला चिपी विमानतळ सुरू झाला पाहिजे. यासाठी आमदार नीलेश राणे यांचे लक्ष वेधले. अँड अजित भणगे यांनी गोवा राज्य पर्यटन दृष्ट्या अनेक उपक्रम राबवत आहेत असाच उपक्रम आपल्या सिंधुदुर्गात केला पाहिजे. हा उदात्त दूरदृष्टीकोन ठेवून तेवीस वर्षांपूर्वी लायन्स महोत्सवाला सुरुवात झाली, असे सांगितले. सीए सुनील सौदागर, अँड अमोल सामंत यांनीही लायन्सच्या कार्याचा आढावा घेतला. फेस्टिवलमध्ये लायन्सचे मानद सदस्य म्हणून आमदार निलेश राणे यांची निवड करण्यात आली. या फेस्टिवलची सुरुवात लायन्स पदाधिकारी डॉ विवेक पाटणकर यानी गणेश वंदनाने केली, तर लायन्स पदाधिकारी शोभा माने यांनी ईशस्तवन सादर केले. आभार लायन्स पदाधिकारी सीए सागर तेली यांनी मानले. वंदे मातरम या राष्ट्रगीताने या उद्घाटन सोहळ्याची सांगता करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा