*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावच्या सदस्या लेखिका कवयित्री सौ.स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम ललितलेख*
*प्रेरणा साहित्य संमेलन*
*ललित लेख स्वरूपात*
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या, वेंगुर्ला तालुक्यातील ‘शिरोडा’ हा निसर्गरम्य गाव…
ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. स. खांडेकर आणि जयवंत दळवी यांच्या लेखणीने पावन झालेली ही भूमी… साहित्याचा वरदहस्त लाभलेली अन् अलौकिक निसर्ग सौंदर्याने नटलेली…महात्मा गांधींच्या मीठ सत्याग्रहासारख्या ऐतिहासिक वारसाला अंगाखांद्यावर खेळवणारा हा शिरोडा गाव..
उसळणाऱ्या अरबी समुद्राच्या लाटा… शिरोडा गावाच्या साहित्यिक संस्कृतीचे मर्म सांगत किनाऱ्यावर येऊन धडकतात अन् शिरोडा गावाच्या साहित्यिक परंपरेचे गुणगान क्षितिजा पल्याड जाऊन गातात..
आजही प्रेरणा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिक परंपरा असलेला जयवंत दळवी आणि वि.स. खांडेकर यांच्या लेखणीतून अंकुरलेला साहित्याचा वटवृक्ष पाळेमुळे घट्ट रोऊन फोफावताना दिसत आहे.
२४ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी सुरू असलेली प्रेरणा साहित्य संमेलनाची पूर्वतयारी मोठी देखणी आणि विलोभनीय होती. ११८ वर्षाची साहित्यिक परंपरा लाभलेली खटखटे ग्रंथालयाची वास्तू जणू बोलू लागली होती. सर्वांच्या प्रयत्नांनी ती सुद्धा देखणी दिसू लागली होती
२५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी साडेनऊ वाजता गुलाबी थंडी पांघरलेल्या कोवळ्या सोनसळी किरणांच्या साक्षीने संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या लोकसाहित्याच्या अभ्यासक तथा लेखिका, प्रा.सौ.पौर्णिमा राजेंद्र केरकर, गोवा यांचे आगमन झाले. आणि सुवर्ण अक्षरांनी लिहावे अशा प्रेरणा साहित्य संमेलनाची सुरुवात झाली.
उद्घाटन सोहळा मोठा मंगलमय होता. सरस्वती मातेला वंदन करत दीपप्रज्वलन केले. सर्व मान्यवर व्यासपीठावर स्थानापन्न झाले आणि शेखर पणशीकर यांच्या स्वमधुर ईशस्तवनाने वातावरण जणू भक्तिमय, मंगलमय झाले. खिडकीतून हळुवार आत येणाऱ्या वाऱ्याच्या झुळूकेवर सूत्रसंचलन करणाऱ्या सचिन दळवींचा आवाज बहरू लागला.. आणि ती ध्यानस्थ असलेली वास्तू जणू ध्यानभंग होत जागृत झाली. त्या वास्तूत निवास करत असलेली सत्तेचाळीस हजार पुस्तके अंगावरची धूळ झटकून विस्फारल्या नजरेने तो आनंद सोहळा “याची देही याची डोळा” पाहू लागली,…प्रत्येक शब्द कान टवकारून ऐकू लागली… शब्दामधला जिवंतपणा अनुभवू लागली…
मान्यवरांचे स्वागत प्रस्ताविक श्री विनय सौदागर यांनी केलं.
मान्यवरांचा परिचय श्री.सचिन गावडे यांनी पुस्तक भेट देऊन केला.
प्रेरणा साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी.. सदैव आधारवड होऊन खंबीर उभे असणारे आदरणीय रघुवीर उर्फ भाई मंत्री यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. मान. राजन शिरोडकर यांनी आपल्या मोजक्या शब्दात कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. नंतर कोमसाप जिल्हाध्यक्ष सन्मा. श्री मंगेश मसके यांनी आपले अनुभव सांगत ४७ हजार पुस्तके असलेल्या ११८ वर्षे पूर्ण झालेल्या खटखटे वाचनालयाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. मान. सचिन हजारे यांनी मौलिक असे मार्गदर्शन करत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.. त्यानंतर संमेलनाध्यक्ष पौर्णिमा ताईनी बोलायला सुरुवात केली.. सारे जण जणू श्वास रोखून स्तब्ध होऊन ऐकू लागले… साक्षात सरस्वती त्यांच्या मुखातून वदत होती..
ज्येष्ठ पत्रकार श्री अनिल निखार्गे यांनी जया काकाच्या आठवणींना उजाळा देत सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
संमेलनाचा शिरोमणी असलेला परिसंवाद…. वाचन वृद्धीसाठी मी केलेले प्रयोग…. या परीसंवादात मान.श्री सुरेश ठाकूर सरांनी वाचन वृद्धीसाठी आपण केलेले विविध प्रयोग पुराव्यासहित सादर केले. त्यांचे लाभलेले मौलिक मार्गदर्शन हे मराठी साहित्यिकाच्या, मराठी मनाच्या ,आणि मराठी वाचकाच्या, अनुभव कक्षा वाढविणारे असे होते.
त्यानंतर प्रा. गजानन मांद्रेकर सरांनी आपण वाचन वृद्धीसाठी केलेले प्रयोग पुराव्यासहित सादर केले. त्यावेळी त्यांचेही मौलिक असे मार्गदर्शन लाभले. त्यांच्याच साहित्य संगम संस्थेकडून प्रेरणा घेऊन साहित्य प्रेरणा कट्टा सुरू झाला…आणि आज त्यांच्याच मार्गदर्शनाने प्रेरणा संमेलन यशस्वी झाले.
मान. विजय फातर्पेकर सरांनी आपले अनुभव सांगत ..अनेक दाखले..उदाहरणे देत… गोष्टी रुपात वाचन वृद्धीसाठी काय करता येईल हे सांगितले.
सौ. स्नेहा नारिंगणेकर यांनी या परिसंवादात भाग घेऊन आपले मौलिक मार्गदर्शन केल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले..
प्रेरणा साहित्य संमेलनाचे कर्ते करविते.. साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक.. आणि नामवंत मालवणी कवी विनय सौदागर यांच्या..’ मुबाई’ या काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. सतीश लळीत हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. तर शिरोडा गावच्या सरपंच सौ.लतिका रेडकर या अध्यक्ष होत्या.
कवी विनय सौदागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
श्री सुभाष शेटगावकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
भोजन करत असताना सर्वजण यसुफ यांच्या सुमधुर अशा गाण्यांच्या तालावर डोलत होते.
बागलकर सरांचा ‘रायगडाला जाग येते तेव्हा’ यातील एकपात्री प्रयोग पाहून सर्वजण मंत्रमुग्ध झाले.
प्रेरणा साहित्य संमेलनाचा गाभा..
म्हणजे कवी संमेलन…
या कार्यक्रमाच्या मान्यवरांचे स्वागत, प्रास्ताविक, परिचय व पुस्तक भेट.
श्री सचिन दळवी यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या डॉ.सुधाकर ठाकूर यांच्याकडे सूत्रे प्रधान केली.. त्यांनी खऱ्या कवीने गद्यात व्यक्त न होता कवितेतूनच व्हावे.. खरी कविता कशी असावी? याविषयी मार्गदर्शन केले.. आणि आपल्या कविता वाचनाने काव्य संमेलनाला सुरुवात केली. अनेक कवींच्या काव्य सादरीकरणानंतर अध्यक्षांच्या कवितेने समारोप झाला.
श्रीमती सरोज रेडकर यांनी काव्यमय पद्धतीने आभार व्यक्त केले.
कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने सुप्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने काढलेल्या ‘कनक रंग वाचा’ विशेषांकाचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष सौ.पौर्णिमा केरकर यांच्या हस्ते व आचरेकर प्रतिष्ठानचे वामन पंडित यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
स्मरण जयवंत दळवींचे या कार्यक्रमात त्यांची पुतणी शुभा कुलकर्णी या जया काकांच्या आठवणींना उजाळा देत व्यक्त झाल्या.
सौ सोनाली परब यांनी ‘वाट ही सरेना’ या कथेचे अभिवाचन केले.
जयवंत दळवींच्या पुस्तकावर होत असलेल्या साप्ताहिक खुल्या साहित्य चर्चेविषयी श्री.सचिन गावडे बोलले.
मुलांना लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले.
र ग खटखटे ग्रंथालयाच्या ग्रंथपाल श्रीमती अर्चना लोखंडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचा समारोप
या सदरात तीन ठराव पास करण्यात आले.
मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदनचा ठराव श्री.सोमा गावडे यांनी मांडला.
आरवली शिरोडा परिसरात कै. दळवीचे चिरंतन स्मारक व्हावे असा ठराव श्री.शेखर पणशीकर यांनी मांडला
वाचन वृद्धीसाठी प्रयत्न करण्याचा संकल्प कु. संध्या आरोलकर यांनी केला.
कै.जयवंत दळवींचा सन्मान:-
सौ. पौर्णिमा केरकर, संमेलनाध्यक्ष सन्मान :-श्री राजन शिरोडकर, संमेलनाध्यक्षांची ओटी:- सौ.अनिता सौदागर यांनी भरली अन् संमेलनाध्यक्ष सौ.पौर्णिमा ताईंच्या भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
सरतेशेवटी प्रेरणा साहित्य कट्ट्याचे समन्वय विनय सौदागर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
संमेलन संपलं तरीही श्रोते मंत्रमुग्ध झाल्यागत .. तिथे दरवळणारा साहित्याचा सुगंध नेत्रांजनीच्या पापणी आड दडवून ठेवत होते..आणि आपल्याबरोबर आनंदाची आणि समाधानाची शिदोरी घेऊन जात होते.
सौ.स्नेहा धोंडू नारिंगणेकर
शिरोडा सिंधुदुर्ग