You are currently viewing सिंधुदुर्ग विभागास तात्काळ नियमित विभाग नियंत्रक मिळावा

सिंधुदुर्ग विभागास तात्काळ नियमित विभाग नियंत्रक मिळावा

सिंधुदुर्ग विभागास तात्काळ नियमित विभाग नियंत्रक मिळावा

भाजपा कामगार मोर्चा अध्यक्ष अशोक राणे यांचे ना. नितेश राणे यांना निवेदन

देवगड :

सिंधुदुर्ग विभागास तात्काळ नियमित विभाग नियंत्रक मिळणेबाबत भाजपा कामगार मोर्चा अध्यक्ष अशोक राणे यांनी बंदर विकास व मत्स्योद्योग मंत्री नामदार नितेश राणे यांना आज कणकवली येथे निवेदन सादर केले आहे.

यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग विभागास माहे ऑक्टोबर 2024 मध्ये विभाग नियंत्रक श्री. पाटील यांची बदली झाल्यानंतर नियुक्त झालेले श्री. हुले (विभाग नियंत्रक) आजारी असल्यामुळे वैद्यकीय रजेवर गेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत विभागाचे कामकाज पाहण्यासाठी श्री. देशमुख (विभागीय वाहतूक अधिकारी) यांच्याकडे प्रभारी विभाग नियंत्रक म्हणून पदभार देण्यात आला.

मात्र, ते कार्यालयात नियमितपणे उपलब्ध नसून दौऱ्यांमध्ये किंवा बैठकीसाठी बाहेर असतात. तसेच, अंतिम निर्णय देण्यास ते टाळाटाळ करतात. दि. 16.12.2024 पासून ते देखील रजेवर आहेत. परंतु, त्यांच्या रजेबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही.

मुळ विभाग नियंत्रक व प्रभारी विभाग नियंत्रक पदे रिक्त असल्यामुळे कार्यालयीन कामकाजावर तसेच प्रवाशांच्या सोयीसुविधांवर परिणाम होत आहे. बस चालू करणे, बसेसची उपलब्धता सुनिश्चित करणे, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे यांसारखे महत्त्वाचे विषय प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे रा.प. महामंडळाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 04 लिपिक वर्गीय आणि 03 चालक/वाहक पदांवरील अनुकंपा तत्वावरील नोकरी प्रकरणांमध्ये संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाली आहे. मात्र, नियुक्ती प्रक्रियेस विलंब होत असल्यामुळे उमेदवार व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट आले आहे.मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रिय कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत 22 भूमिपुत्र उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. परंतु, आचारसंहितेनंतरदेखील नियुक्त्या न झाल्याने उमेदवार अन्यायग्रस्त आहेत.

नामदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यासाठी 6 शयनयान बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्या मुंबई, बोरिवली आणि लातूर मार्गांवर यशस्वीरित्या चालत असताना अचानक बंद करण्यात आल्या आणि दोन महिने उभ्या ठेवून कोल्हापूर जिल्ह्यात पाठवण्यात आल्या. ही बाब गंभीर असून, या बसेस तातडीने परत आणून पुन्हा सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे.यामुळे प्रवाशांचे हाल होत असून सिंधुदुर्ग विभागातील एस.टी.च्या प्रशासकीय व प्रवासीभिमुख कामकाजावर विपरित परिणाम झाला आहे.त्यामुळे, सिंधुदुर्ग विभागासाठी कायमस्वरूपी निर्णयक्षम विभाग नियंत्रकाची नेमणूक तात्काळ करावी, अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात येत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा