आझम कॅम्पसचे कुलगुरू डॉ. पी ए इनामदार
काही वर्षांपूर्वी पुण्याचे सुप्रसिद्ध न्यायमूर्ती श्री कोळसे पाटील यांच्या मला फोन आला. ते मला म्हणाले महाराष्ट्रातील काही निवडक सामाजिक कार्यकर्त्यांची सभा पुणे येथे आजम कॅम्पसमध्ये ठेवलेली आहे. तुम्हाला या सभेसाठी यावयाचे आहे. तोपर्यंत मी फक्त आझम कॅम्पसचे आणि पी ए इनामदार सर यांचे नाव ऐकले होते. प्रत्यक्ष जेव्हा मी आझम कॅम्पसमध्ये गेलो तेव्हा एवढा मोठा परिसर आणि त्यामध्ये मोठ्या मनाचे कुलगुरू डॉ. पी ए इनामदार यांना भेटून मन प्रसन्न झाले. इनामदार साहेबांची माझी ती पहिलीच भेट. पण त्या पहिल्या भेटीत ते आले त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले या गोष्टीचा मला प्रत्यय आला. या सभेला न्यायमूर्ती कोळसे पाटील व्यतिरिक्त श्री आ.ह.साळुंखे नरेंद्र दाभोळकर निळू फुले गोविंद पानसरे के.ई.हरिदास न्यायमूर्ती शेळके नागेश चौधरी एडवोकेट फाळके भारत पाटणकर सुनील सरदार पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासारखी मान्यवर मंडळी उपस्थित होती. खरं म्हणजे ती एक गोलमेज परिषदेच होती. महाराष्ट्रातील सामाजिक विचाराच्या लोकांनी एकत्र येऊन काहीतरी चांगले करायची गरज आहे यासाठी ती सभा बोलावली गेली होती. न्यायमूर्ती कोळसे पाटील यांच्या सूचनेवरून श्री इनामदार साहेबांनी या कामी पुढाकार घेतलेला होता.
पुढे या ना त्या कारणामुळे इनामदार साहेबांच्या भेटीसाठी होत गेल्या. त्या कालही होत्या आजही आहेत आणि उद्याही राहणार आहेत. आजम कॅम्पस हे जगाच्या नकाशावर आहे. आता तर या कॅम्पसला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. समाजातील सर्वसामान्य गोरगरीब माणसाला शिक्षणाची दारे खऱ्या अर्थाने उघडून देणारी ही संस्था स्थापन करून इनामदार सरांनी परोपकाराचे काम केले आहे. या माणसाला जर आपण भेटला तर एका विद्यापीठाचा कुलगुरू कसा असावा त्याचा आदर्श चेहरा मोहरा त्यांच्या वर्तनूविकीवरून आपल्या हृदय पटलावर छायांकित होतो. चेहऱ्यावर स्थितप्रज्ञ भाव .तुम्हाला सहकार्य करण्याची भावना आणि तुमचे आदरतिथ्य ह्या घटना तुम्हाला आकर्षित करून जातात. जितने वाले कोई अलग काम नही करते वे हर काम अलग ढंगसे करते है हे म्हणतात ते ततोतंत इनामदार साहेबांना लागू होते.
आज कुठलीही संस्था चालवायची म्हणजे तारेवरची कसरत आहे. पण ही तारेवरची कसरत श्री पि ए इनामदार यांनी कौशल्याने पूर्ण केली आहे. पुण्याला खरं म्हणजे शिक्षणाचे माहेरघर म्हणतात आणि ते खरेही आहे. आणि आता तर या संगणकीय कार्यकाळात पुण्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे .या सर्वांमध्ये आझम कॅम्पसचे एक आगळे वेगळे महत्त्व आहे. सबके लिए खुला है मंदिर हमारा .इनामदार सरांनी समाजाचे सर्व स्तरांसाठी या परिसराची स्थापना करून गरिबांपर्यंत तळागाळातील माणसापर्यंत दुर्लक्षित लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रमाणिक प्रयत्न केलेला आहे. केजी पासून पीजीपर्यंत सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय या ठिकाणी आहे आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी गरीब होतकरू मुलांची सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात येते. शिक्षण आहे . निवास व्यवस्था आहे आणि गरीब मुलांसाठी ट्रस्ट मधून मदत पण करता येते.
आझम कॅपस केवळ शैक्षणिक कार्यापुरता मर्यादित राहिलेला नाही तर ते महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीचे एक आश्रयस्थान झालेले आहे. या कॅम्पस मध्ये असलेल्या सभागृहामध्ये वेगवेगळे उपक्रम सातत्याने सुरू असतात. आम्हा पुरोगामी विचाराधारा असणारा लोकांना माहित आहे की इनामदार साहेबांकडे गेले आणि त्यांना सामाजिक कार्यासाठी सभागृह निवास व्यवस्था भोजन व्यवस्था यासाठी म्हटले तर ते कधीच नाही म्हणत नाही. उलट अजून काय मदत करू हा त्यांचा भाव असतो.
परवा आम्ही मित्रमंडळींनी पुण्याला साहित्य संमेलन द्यायचे ठरवले. माझे मित्र व जीएसटी चे उपायुक्त श्री महबूब कासार यांना आमची कल्पना सांगितली .आम्ही सगळे मित्र एकत्र आलो. संमेलन आझम कॅम्पसमध्ये घ्यायचे ठरवले. त्याप्रमाणे आम्ही सर्वजण कॅम्पसमध्ये पोहोचलो. गाड्या पार्क केल्या. आणि आमची पावलं इनामदार सरांच्या केबिनकडे वळली. आम्हाला माहीत होते की इनामदार सर नाही म्हणणार नाही. आम्ही आमचा प्रस्ताव श्री इनामदार साहेबांजवळ मांडला. साहेबांनी लगेच होकार दिला आणि ते म्हणाले पुरोगामी विचारसरणीचे साहित्य संमेलन आहे .हे संमेलन भारतातल्या नव्हे तर जगातील सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमचे सगळे चॅनेल्स काम करतील. इनामदार साहेब म्हणाले आपल्या भारतातील मराठी लोक सर्व देशात विखुरलेले आहेत आणि मराठी माणूस पण मोठ्या प्रमाणात पर देशात आहे त्या लोकांपर्यंत आपले विचार पोहोचले पाहिजेत. आपले उपक्रम पोहोचले पाहिजेत .यासाठी आपण तुमचे साहित्य संमेलन सगळ्या देशांमध्ये लाईव्ह दाखविणार आहोत. आमच्या सगळ्या साहित्यिकांची राहण्याची जेवणाची कार्यक्रमाची मानसन्मानाची सगळी व्यवस्था इनामदार साहेबांनी केली. विशेष म्हणजे ते पूर्णवेळ कार्यक्रमाला उपस्थित होते. एका स्वायत्त विद्यापीठाचा कुलगुरू पूर्ण वेळ कार्यक्रमाला उपस्थित राहतो आणि रसिकांमध्ये बसून मराठी साहित्याचा आस्वाद घेतो हे खरोखरच नोंदणीय बाब आहे.
माझी एक विद्यार्थिनी आहे. कुमारी राधिका हस्तक तिचे नाव. तिचा मला फोन आला. सर मला पीएचडीसाठी आझम कॅम्पस मध्ये प्रवेश पाहिजे आहे. तुमचे इनामदार साहेबांशी चांगले संबंध आहेत .तुम्ही माझ्याविषयी एक शब्द टाकू शकाल का ? राधिका माझी आवडती विद्यार्थिनी. हे आमचे विद्यार्थिनी आता मिशन आयच्या शिबिरामध्ये प्रशिक्षक म्हणूनही काम करते. व्यक्तिमत्व अभ्यास या सर्व बाबतीत ती परिपूर्ण आहे. तिने कॅम्पस मध्ये पी एच डी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुलाखत दिली होती. मी इनामदार साहेबांना फोन केला.वस्तुस्थिती सांगितली .इनामदार साहेब म्हणाले मी पाच मिनिटात फोन करतो . साहेबांचा मला फोन आला. त्यांनी माझे अभिनंदन केले .साहेब म्हणाले अहो तुमची शिफारस आली नसती तरी तिची निवड झाली असती. आत्ताच मी त्या समितीचा रिपोर्ट पाहिला. तुमच्या विद्यार्थिनीचा क्रमांक पहिल्या पाचमध्ये आहे. तुम्ही काळजी करू नका .अजून रितसर यादी जाहीर व्हायची आहे. मी हे राधिकाला सांगितले. तिला इतका आनंद झाला की मी पुण्याला ज्या ठिकाणी थांबलेलो होतो त्या ठिकाणी ती पेढे घेऊन आली. आज आमच्या मलकापूरची राधिका हस्तक आमले संशोधन कार्य करीत आहे. विदर्भातील एक विद्यार्थिनी आजम कॅम्पसमध्ये विकसित होत आहे.
गतवर्षीची गोष्ट. जीएसटीचे उपायुक्त श्री मेहबूब कासार यांचा मला फोन आला. इनामदार साहेबांनी त्यांच्यावर गणराज्य दिनाच्या उद्घाटनाची जबाबदारी सोपवली होती .उद्घाटनासाठी आयएएस अधिकारी पाहुणा म्हणून पाहिजे होता. कासार साहेबांनी मला फोन केला. त्यांना माहीत होते की काठोळे सरांनी अनेक आयएएस आयपीएस अधिकारी जवळचे मित्र आहेत. मी त्यांना सांगितले की गणराज्य दिवसाचा कार्यक्रम आहे. जे कार्यरत आहेत अधिकारी आहे ते उपलब्ध होऊ शकणार नाहीत. सेवानिवृत्त आयएएस अधिकारी यांना मात्र आपण निमंत्रित करू शकतो. इनामदार साहेबांनी होकार दिला. मी माननीय मुख्यमंत्र्यांचे माजी सल्लागार पुणे येथील माजी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसकर यांना फोन केला. त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशाला मी नुकताच जाऊन आलो होतो. त्यांनी आनंदाने निमंत्रण स्वीकारले. इनामदार साहेबांनी आमच्यावर ही जबाबदारी सोपवून आपण आझम परिवारात एक घटक आहात याची आम्हाला जाणीव करून दिली.
आम्ही पुण्याला गेलो म्हणजे नकळत आमची पावले आजम कॅम्पस कडे वळतात. काही काम असो वा नसो आम्ही आझम कॅम्पस मध्ये जातो. इनामदार सरांना भेटतो. सामाजिक विषयावर चर्चा करतो. चहापाणी घेतो आणि साहेबांचा निरोप घेतो.
परवा आम्ही आझम कॅम्पस मध्ये गेलो. साहेबांचे सहकारी म्हणाले साहेबांना काही लोक भेटायला आलेले आहेत. त्यांनी आम्हाला स्वागत कक्षात बसवले आणि आमचे कार्ड घेऊन तो आतमध्ये गेला. आणि लगेच परत आला. साहेबांनी आम्हाला ताबडतोब बोलावले होते. आम्हाला पाहून साहेब म्हणाले अहो तुम्हाला कार्ड पाठवण्याची गरज नाही. तुम्ही सरळ आतमध्ये येऊ शकता. आम्ही त्यांना म्हणालो सर आपल्याकडे काही मंडळी बसली असल्याचं आम्हाला तुमच्या स्वीय सहायकाने सांगितले .त्यामुळे आम्हाला संकोच वाटला. इनामदार साहेब म्हणाले अहो तसं नाही. तिथे सर्वच जण सारख्याच विचारसरणीचे आहेत. तुम्ही आल्यामुळे या सर्वांचा तुम्हाला परिचय मला करून देता येऊ शकतो .आता यानंतर पुढे येताना कार्ड पाठवण्याची गरज नाही. आझम कॅम्पसची दारे तुमच्यासाठी सदैव मोकळी आहेत.
साहेब आज परदेशातील देशातील राज्यातील विविध शासकीय निमशासकीय समित्यावर कार्य करीत आहेत. आझम कॅम्पसचा व्याप सांभाळून ते या समितीचे काम करीत असतात. केंद्र सरकारने व राज्य शासनाने त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य लक्षात घेऊन त्यांना वेगळ्या पदावर नेमले आहे. नकळत श्री इनामदार साहेबांचा जो सामाजिक वारसा आहे तो वारसा या निमित्ताने केंद्रात व राज्यात त्या त्या विभागात जात आहे ही एक जमेची बाजू आहे.
साहेब आहेत ते असे. वयाची 75 वी त्यांनी केव्हाच गाठली आहे. पण सकाळपासून सायंकाळपर्यंत ते कॅम्पसमध्ये राहतात .सर्वांना भेटतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे पुणे असो विदर्भ असो मराठवाडा असो की भारतातील कुठलीही संस्था त्यांना भेटली आणि आझम कॅम्पस मध्ये काही कार्यक्रम ठेवण्याचा त्यांचा मानस असला तर इनामदार साहेब समर्पित भावनेने त्यांना सर्व मदत करतात .असा हा असामान्य माणूस. आज आझम कॅम्पसला संपूर्ण जगामध्ये मानाचे स्थान मिळवून देत आहे आणि देत राहिलही.
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003