*’मराठी साहित्य व कला सेवा’ आणि ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’ यांची अविरत साहित्य सेवा*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
“कविता एक चिंतन, आराधना सरस्वतीची, उपासना शब्दांची, अनुभूती समाधानाची” अशा भावना आपल्या अध्यक्षीय मनोगतातून डॉ. मानसी पाटील यांनी व्यक्त केल्या. ‘मराठी साहित्य व कला सेवा’ आणि ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १०व्या कविसंमेलनाच्या निमित्ताने त्या बोलत होत्या. सारस्वतांनी तयार केलेल्या उत्तम रचनांचा आस्वाद घेत, एकमेकांना दाद देत तर वेळप्रसंगी हास्याचे फवारे उडवत मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून आलेल्या निवडक निमंत्रित सारस्वतांनी दादर येथील राजा शिवाजी विद्या संकुलात दिवाळी निमित्त उत्तमोत्तम रचनांचा नजराना सादर केला.
“मराठी साहित्य व कला सेवा” आणि “शोध आनंदाचा फाऊंडेशन” आयोजित कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मानसी पाटील विराजमान होत्या. त्यांचे ज्येष्ठ कवयित्री जयश्री चुरी यांच्या हस्ते तसेच ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’चे अध्यक्ष नितीन सुखदरे आणि ‘मराठी साहित्य व कला सेवा’चे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर यांच्या उपस्थितीमध्ये मानाची शाल आणि ग्रंथभेट प्रदान करून स्वागत करण्यात आले.
कविसंमेलनाच्या पहिल्या सत्रामध्ये नंदा कोकाटे, रविंद्र शंकर पाटील, जयश्री हेमचंद्र चुरी, वैभवी विनीत गावडे, कल्पना दिलीप मापूसकर, संजीव उंडाळकर, अनील खेडेकर, सानिका ज्योतीकुमार कुपटे, गौरी यशवंत पंडित, संतोष धर्मराज मोहिते, राजेश साबळे ओतूरकर, बालकवी वेदान्त यशवंत पंडित, ॲड. सुजाता त्रिंबककर टिपणीस, प्रफुल अनंत साने, आश्विनी सोपान म्हात्रे, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, विक्रांत मारूती लाळे आणि डॉ. प्रविण विठ्ठल शिर्के यांनी आपल्या सुंदर रचना सादर केल्या आणि उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली. पहिल्या सत्राची शेवटची रचना कविसंमेलनाध्यक्ष डॉ. मानसी पाटील यांनी सादर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
मध्यंतरामध्ये सानिका कुपटे यांनी आणलेल्या अल्पोपहारासोबत संमेलनाध्यक्ष डॉ. मानसी पाटील यांनी आणलेल्या बर्फीचा आस्वाद सर्वांनी घेतला. दुसर्या सत्रात सर्व कवींनी त्यांच्या स्वरचित विषय विरहित रचना सुंदररीत्या सादर केल्या.
संमेलनाध्यक्ष डॉ. मानसी पाटील यांनी सादर केलेल्या गजलेला सर्वांनी मनमुराद दाद दिली. मनोगत व्यक्त करताना अध्यक्षांनी उपरोक्त विचार मांडले. नेहमीप्रमाणेच आजचा कार्यक्रम देखील दर्जेदार झाला. सर्वांच्या कविता नावीन्यपूर्ण व आशयायुक्त अशा होत्या. त्यामुळे दोन्ही ही सत्रे अगदी श्रवणीय आणि सुखदायक ठरली. नियोजन, आयोजन सर्व अगदी छान होते. आपण करत असलेली साहित्य सेवा अशीच अखंडित चालू राहो व मराठी भाषेची साहित्य संपदा वाढत राहू दे अशा शुभेच्छाही त्यांनी आयोजकांना दिल्या.
कवितांचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या कवयित्री गीताश्री नाईक यांना मनोगतासोबतच कविता सादर करण्याची संधीदेखील देण्यात आली. आस्वादक ममता चंद्रकांत तांबिरे, आर्या कुपटे आणि सुनिल भिकाजी मानकर ह्यांनी कार्यक्रमा विषयी आपल्या भावना मोकळ्या केल्या. कवितांचा आस्वाद घेण्यासाठी सुनिल कुळकर्णी, डॉ. रुपाली प्रविण शिर्के, उमाली प्रविण शिर्के, कार्तिकेय प्रविण शिर्के आवर्जून उपस्थित होते. सर्वांनी कार्यक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तर संपूर्ण कार्यक्रमाचं ध्वनीचित्रमुद्रण आणि छायांकन रविंद्र पाटील आणि विक्रांत लाळे यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता करताना “शोध आनंदाचा फाऊंडेशन” चे अध्यक्ष नितीन सुखदरे यांनी सर्वांचे आभार मानले. ‘मराठी साहित्य व कला सेवा’ आणि ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’ यांच्या वतीने सर्व सारस्वतांना सहभाग सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
११वे मासिक कविसंमेलन शनिवार १९ जानेवारी २०२५ (अंदाजित) होणार असून त्याच्या अध्यक्षपदी युवा कवी विक्रांत मारुती लाळे असणार आहेत. कविसंमेलनाचे समयोचित सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले.
कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी नितीन सुखदरे, विद्याधर शेडगे, सनी आडेकर, विक्रांत लाळे, रविंद्र पाटील आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.