धाराशिव येथील शाळेच्या बसला अपघात, चार विद्यार्थी किरकोळ जखमी…
खाकशी येथील घटना; नळपाणी योजनेला गाडी धडकल्यामुळे रस्त्यावर पाणी…
देवगड
खाकशी मार्गे कुणकेश्वर कडे जाणाऱ्या शैक्षणिक सहलीच्या बसला खाकशी शाळेजवळील धोकादायक वळणावर अपघात झाला. सायंकाळी ४ च्या सुमारास ही घटना घडली. वळणामुळे चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटून बस डाव्या बाजूला पाच फूट खाली जाऊन नळयोजनेच्या पाईपलाईनला धडकली. या अपघातात चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली.
अपघातात एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. पाईपलाईन फुटून पाणी रस्त्यावर आले त्यामुळे देवगड जामसंडे शहराच्या पाणीपुरवठा बंद झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती समजताच देवगड आगार व्यवस्थापक व स्थानक प्रमुख व कर्मचारी यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील जयहिंद विद्यालय कसबे तडोळे या शाळेची सहल शुक्रवारी धाराशिव आगाराच्या एसटी बसने देवगडमध्ये आली होती. दुपारी मिठमुंबरी येथे जेवण करून ही सहल खाकशी मार्गे कुणकेश्वर कडे जाण्यासाठी रवाना झाली. मात्र खाकशी शाळेनजीक असलेल्या धोकादायक वळणावर चालक विभीषण गायकवाड यांचा बसवरील ताबा सुटला. सुदैवाने झाडेझुडपे आंबा बागायत व देवगड नळयोजनेची पाईपलाईन असल्याने त्या पाईपलाईनला जाऊन एसटी धडकून थांबली. गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी झालेली नाही.
बस मध्ये ४४ विद्यार्थी व ४ शिक्षक असे एकूण ४८ जण होते. अपघाताची माहिती समजतात स्थानिक ग्रामस्थांनी धावाधाव करून सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना अपघातग्रस्त एसटीतून बाहेर काढले. एसटी आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप, स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर, तसेच एसटी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विद्यार्थी शिक्षक चालक यांची तात्काळ खाकशी येथील साई मंदिरात तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. देवगड आगार व्यवस्थापक यांनी तात्काळ देवगड आगाराच्या बसची व चालकाची व्यवस्था करून विद्यार्थी शिक्षकांना पुढील प्रवासासाठी रवाना केले.