सागरी मत्स्यव्यवसाय, नौका नयन, डिझेल इंजिनची देखभाल आणि परिचलण प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
मत्स्यव्यवसाय विभागामार्फत सहा महिने मुदतीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. यामध्ये सागरी मत्स्यव्यवसाय, नौका नयन व डिझेल इंजिनची देखभाल आणि परिचलण या बाबींचा समावेश आहे. प्रशिक्षण सत्र दिनांक 1 जानेवारी 2025 पासून सुरु होत आहे. मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्ग- मालवण येथे हे प्रशिक्षण पार पडणार आहे. प्रशिक्षण सत्रासाठी जिल्ह्यातील मच्छिमार युवकांनी दि.31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी र. मालवणकर यांनी दिली आहे.
तपशील पुढीलप्रमाणे:-
प्रशिक्षण कालावधी :- दि. 1 जानेवारी ते 30 जून 2025
आवश्यक पात्रता:- उमेदवारांचे वय 18 ते 35 असावे, (आधार कार्ड व रेशन कार्डची छायांकित प्रत जोडणे). उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक ( शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायांकित प्रत जोडणे आवश्यक) क्रियाशील मच्छिमार असवा, (विहित नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी.), उमेदवारास पोहता येणे आवश्यक.
प्रशिक्षण शुल्क :- सहा महिन्याचे रु. 2 हजार 700/- मात्र, दारिद्रय रेषेखालील असल्यास सहा महिन्याचे रु. 600/- मात्र (दारिद्रय रेषेखालील दाखला आवश्यक).
रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी:- राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC)अंतर्गत योजनेतून अर्थसाहाय घेऊन नौका बांधता येते. सागरी नौकेवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध होवू शकते.
इच्छुक युवकांनी या प्रशिक्षण केंद्राशी किंवा सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसायांचे कार्यालयास संपर्क साधल्यास विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्ज स्वत:च्या हस्ताक्षरात भरुन त्यावर संस्थेची शिफारस घेवून विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत कार्यालयाच्या वेळेत कामकाजाच्या दिवशी कार्यालयास सादर करावे. अधिक माहितीसाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी र.मालवणकर, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र मालवण मोबा. 94222116220 वर संपर्क साधवा.