बांदा येथे दत्तप्रसाद युवक कला क्रीडा मंडळ नेतर्डे व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सावंतवाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.२९ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन
बांदा
दत्तप्रसाद युवक कला क्रीडा मंडळ नेतर्डे व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सावंतवाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २९ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबीर येथील पीएम श्री बांदा केंद्रशाळा नं.१ येथे संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शैलेश लाड यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
गोवा बांबोळी मेडिकल रुग्णालयाची रक्तपेढी रक्त संकलन करणार आहे. लग्नसराई,सण,उत्सव यामुळे शासकीय रक्तपेढीत सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे. बांबोळी रक्तपेढीत केवळ ३५ टक्के रक्त पिशव्या उपलब्ध आहेत.अपघात तसेच दैनंदिन रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी रक्ताची आवश्यकता असते.हि तूट भरून काढण्यासाठीच बांद्यात रक्तदान शिबीर घेण्यात येत असल्याचे श्री लाड यांनी सांगितले.
या शिबिरासाठी सिंधुदुर्गसह संपूर्ण राज्यात रक्तदान, अवयवदान व देहदान हि संकल्पना प्रत्यक्षात राबविणारे सिंधु रक्त प्रतिष्ठान सहकार्य करणार आहे.रक्तदान हे सामाजिक बांधिलकीचा एक भाग असून या पवित्र कार्यात जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करून हे शिबीर यशस्वी करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर,सावंतवाडी तालुका कार्यकारिणी सदस्य अक्षय मयेकर, युनिक फाउंडेशनचे अध्यक्ष पत्रकार निलेश मोरजकर,लाड मित्रमंडळाचे सचिव संदीप नार्वेकर,कर सल्लागार समीर परब, राकेश परब आदी उपस्थित होते.