*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जादू शब्दांची…*
जादू शब्दांची महान, शब्द चंदन सहाण
शब्द कपाळी लावावा, शब्द देवाला वहावा…
शब्द अभंग बनावा इंद्रायणीत तरावा
वेद मुखी प्रसंगी तो रेड्या मुखी वदवावा…
शब्द गाथा रामायण शब्द भागवत गीता
शब्द मुखी रावणाच्या जणू वन्हीच पेटावा
पुरश्चरण रामदासी गायत्री तो शब्द मुखी
तप करावे गोदेत व्हावी आयु तीच सुखी…
शब्द आहे सावधान, रामदास सावध ते
इंद्रायणीच्या पाण्यात गाथा अलगद तरते
आनंदाचे तरंग ते तुक्या मुखी प्रकटले
अणुरणिया थोकडा आसमंतास व्यापले..
कोरा कागद तो शब्द चांगदेवा हाती धाडे
पासष्टी वाचून ती लख्ख प्रकाश तो पडे
मुक्ताई ती झाली गुरू शब्द ओठी प्रसवले
हठयोग्या असाकसा मडके कच्चेच राहिले…
शब्द अमृताची वेल झाले पसायदान ते
विश्व कल्याणार्थ ज्ञानी योगी चारही ते होते
शब्द करूणा भाकती आग मांडे भाजतांना
शब्द वर्णावे कसे हो शब्दांनाच मांडतांना…
शब्दांनाच नाही शब्द शब्दातीत असतात
अनुसरती आपणा स्वभावेच वागतात
शब्द सांगती ओळख स्वभावही सांगतात
वेळ प्रसंगी ते शब्द तात गळी लावतात…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)