आमचे मित्र श्री अरुणकुमार डोंगरे हे नांदेडला जिल्हाधिकारी असतानाची ही गोष्ट .माझ्या मी आय ए एस अधिकारी होणारच या कार्यक्रमासाठी मी नांदेडला गेलो होतो .डोंगरेसाहेबांना फोन केला आणि सांगितले. मी तुम्हाला सायंकाळी तुमच्या बंगल्यावर भेटायला येणार आहे. सोबत माझे आठ दहा मित्र राहतील .
ठरल्याप्रमाणे आम्ही सर्वजण बंगल्यावर गेलो .साहेब आमची वाटच पाहत होते .मी माझ्या नांदेडच्या सर्व मित्रांचा त्यांचा परिचय करून दिला. साहेबांनी व सौ अंजली वहिनी साहेबांनी सर्वांचे स्वागत केले व सर्वांना भरपेट अल्पोपहार दिला. तो अल्पोपहार इतका होता की आम्हाला त्यादिवशी रात्रीचे जेवण रद्द करावे लागले. चेहऱ्यावर सतत हास्य असणाऱ्या या माणसाने माझेच नाही तर माझ्या सर्व मित्रांचे मनापासून स्वागत केले होते. विशेष म्हणजे आमचा निरोप घेताना साहेब आम्हाला फाटकापर्यंत सोडायला आले.
साहेब सोलापूरला जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी होते. तिथल्या हुतात्मा स्मारकमध्ये माझा मी आयएएस अधिकारी होणार कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कार्यक्रम संपल्यानंतर मी व सौ विद्या डोंगरेसाहेबांना फोन करून त्यांना त्यांच्या बंगल्यावर भेटावयास गेलो .साहेब मला व सौ. विद्याला घेऊन आय ए एस अधिकारी श्री मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या गावाला घेऊन गेले.सोबत सोलापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री वीरेश प्रभू होते. त्यांच्या आईच्या सन्मानार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते .कार्यक्रमातून आल्यानंतर साहेबांनी आम्हाला आग्रहाने जेवण करायला लावले व मुकाम करायला लावला .
सौ अंजली वहिनी साहेबांनी सौ विद्याचे मानपान केले.
डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आम्ही त्यांच्यावर युगनिर्माता नावाचे नाटक बसविले होते. आम्हाला या नाटकाचे ठिकठिकाणी प्रयोग करायचे होते . श्री अरुण कुमार डोंगरे तेव्हा दारव्हा येथे उपजिल्हाधिकारी होते. मी त्यांना शब्द टाकला .त्यांनी लगेच तो मान्य केला. व दारव्हा येथील सभागृहामध्ये युगनिर्माता ह्या नाटकाचा प्रयोग घडवून आणला. हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी साहेबांनी सर्वतोपरी सर्व मदत केली .
साहेबांचा नोकरीचा बराचसा कालखंड अमरावती विभागात गेला .अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय तसेच मनपा आयुक्त म्हणून त्यांनी अमरावती येथे काम केले आहे. मला आठवते 26 :11 :हा मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांना व शहिदांना श्रद्धांजली कार्यक्रम आम्ही अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये आयोजित केला होता .श्री डोंगरे साहेब प्रमुख पाहुणे होते. पण काही कारणामुळे ते येऊ शकणार नव्हते .पण त्यांनी निर्णय घेऊन तेव्हाचे अमरावती महानगरपालिकेचे उपायुक्त श्री दिलीप स्वामी यांना त्या कार्यक्रमाला पाठविले. साहेबांचा स्वभाव तर चांगला आहेच .पण सन्माननीय वहिनीसाहेब देखील तेवढ्याच चांगल्या आहेत.
परवा मी दिल्लीवरून आलो. विमानतळावर उतरलो. माझ्या चालकाने गाडी कुठे पार्क केली त्याचा शोध घेत होतो. तेवढ्यात माझ्या फोनची घंटा वाजली. पाहिले तर डोंगरे वहिनींचा फोन होता .अंजलीवहिनी मला म्हणाल्या काठोळे सर विमान तळावर कुठे फिरत आहात ? मी कार घेऊन वेदांतीला घ्यायला आले आहे. तुम्ही माझ्या कारजवळ या .मी तुम्हाला जिथे पाहिजे तिथे सोडून देते .मी वहिनींच्या कार जवळ गेलो. त्यांना भेटलो. वेदांती आणि मी एकाच विमानाने दिल्लीवरून नागपूरला आलो होतो .वहिनींना मी माझी गाडी आणली आहे हे सांगितले व त्यांचा निरोप घेतला. विमानतळावरच्या एवढ्या भाऊ गर्दीतही मला पाहून अंजली वहिनींनी मला फोन केला होता. हे या सगळ्यात महत्त्वाचे आहे.
साहेबांच्या एक जवळच्या नातेवाईक कु. सपना माझ्याकडे स्पर्धा परीक्षेच्या तयारी करीत होत्या .साहेब तेव्हा अमरावतीला मनपा आयुक्त म्हणून कार्यरत होते. एक दिवस त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी माझे अभिनंदन केले. कशाबद्दल असे विचारताच ते म्हणाले की सर तुमची विद्यार्थिनी सपना पीएसआयची परीक्षा पास झाली आहे .तुम्ही तिला व्यवस्थित मार्गदर्शन केले .त्याबद्दल तुमचे अभिनंदन करण्यासाठी मी फोन केला आहे .मला चांगले वाटले. आज सपना पुण्याला पोलीस खात्यात उच्च पोलीस अधिकारी म्हणून काम करीत आहे.ती साधारणपणे दोन वर्ष आमच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस एकादमी मध्ये अभ्यास करीत होती. ती स्पर्धा परीक्षा पास व्हावी यासाठी आम्ही सर्वांनी तिच्याकडे विशेष लक्ष देऊन तिच्याकडून वेगवेगळे पेपर घेतलेले होतेच .
त्याचाच परिणाम म्हणून सपना पहिल्याच पीएसआय ची परीक्षा पास झाली होती. निकाल आल्याबरोबर साहेबांनी सर्वप्रथम माझेच आभार मानले ही गोष्ट माझ्या अजूनही लक्षात आहे .
लहानांपासून मोठ्यांपर्यंत साहेबांचे सर्वांशी चांगले ऋणानुबंध आहेत .याचा अनुभव मागे वेदांतीच्या साक्षगंधांच्या वेळेस आला. शासनातील व प्रशासनातील महत्त्वाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी या साक्षगंधाला आवर्जून उपस्थित होते .विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही वेळातला वेळ काढून वेदांतीच्या साक्षागंधाला उपस्थिती दर्शविली होती. एवढ्या मोठ्या दोन दिग्गजांनी डोंगरेसाहेबांवरील कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून डोंगरे परिवारावरील आपले प्रेम व्यक्त केले होते. याला कारण म्हणजे डोंगरे साहेब यांचे वागणे हेच म्हणावे लागेल.
परवा साहेबांचा फोन आला. साहेब म्हणाले. माझ्या मुलीचा लग्न समारंभ 24 तारखेला आहे. तुम्हाला यायचे आहे .पत्रिका मी ओमप्रकाश चर्जन साहेबांबरोबर पाठवत आहे. आणि तुम्हाला न चुकता या कार्यक्रमाला यायचे आहे. कार्यक्रमाची पत्रिका साहेबांबरोबर पाठवत आहे .एका आयएएस अधिकाऱ्याने मला फोन करून लग्नाला या असा आग्रह करणे म्हणजे ही एक आगळीवेगळी गोष्ट आहे .
डोंगरेसाहेब अमरावतीला असताना आमची त्यांची साधारणपणे दररोज भेट व्हायची. त्यांना फिरण्याचा छंद आहे. त्यामुळे ते प्रा.अंबादास मोहिते या मित्राला घेऊन विद्यापीठात फिरायला यायचे. आम्ही पण विद्यापीठात नियमितपणे फिरायला जात असू.त्यामुळे आमच्या नियमित भेटी व्हायच्या. साहेबांच्या वेळोवेळी बदल्या होत्या तरी आमचे ऋणानुबंध कायम होते आहेत आणि राहतीलही.
प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003