*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्वास....*
श्वास घेऊनी जन्मा येतो,
एक जीव तो जगण्यासाठी!
अखंड त्याची सोबत असते,
‘मी कोण’ हे जाणण्यासाठी!.१
जेव्हा कधी तो कोंडतो तेव्हा,
जाणीव होते जगण्यामध्ये!
विसरलेल्या ‘श्वासास’ शोधतो,
आपण आपल्या देहामध्ये!..२
पंचप्राण हे चालू राहती,
श्वासाचे अस्तित्व असे!
फुकाच आहे देह बापडा,
श्वासाविण त्या अस्तित्व नसे!..३
दिली बासरी देहाची ही,
परमेशाने आपुल्या हाती!
हवा लागते फुंकायाला,
तेव्हा होतसे स्वरनिर्मिती!..४
स्वर मधुर बासरीचा येई,
त्या श्वासाच्या हिंदोळ्यातून!
नसते जेव्हा साथ वायूची,
श्वास थबकतो अंतरातून!..५
कृपा तुझी ही देवा आगळी,
एकेका श्वासातून पाझरते!
तूच आधार असे देहाचा,
सत्य मना तेव्हाच उमगते!..६
उज्वला सहस्रबुद्धे