*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*नव्या वर्षातील माझ्या संकल्पना व त्याचा पाठपुरावा…*
आपण ठरवतो काही व होते भलतेच असे म्हणतात त्यात किती तथ्य आहे मला माहित
नाही, पण खरोखर तुम्ही ठरवले असेल तर
गोष्टी तशा घडायला हव्यात, कारण…
. . “निश्चयाचे बळ
. .तुका म्हणे हेची फळ”
शेवटी तुमचा निश्चय किती पक्का आहे, यावर
सर्व गोष्टी अवलंबून असतात. करोना आला. जग हादरले, रस्ते सुनसान झाले. दिवसाही चिटपाखरू दिसेना. लोक दिवाभीतासारखे घरात
दडून बसले. खूप पडझड झाली. हिरे मोती माणके हरवली.घरे ओस पडली. दु:खाला पारावार उरला नाही. खूप दर्दभऱ्या कहाण्या आहेत त्या! आठवण काढू नये अशा. पण म्हणून जग थांबले का? थांबून चालतच नाही.
नवी परिमाणे संकल्पना निर्माण झाल्या. काळ कधीच थांबत नाही. त्याला पुढे चालावेच लागते. नाहीतर जग ठप्प होईल. जुने जाते पण नवे काही सोबत घेऊनच येते लक्षात ठेवा. करोना आला पण दूर अंतरावरचे लोक मीडियाने मोबाईलने असे काही जवळ आले की ती एक
प्रचंड मोठी क्रांति ठरली. घरात बसून लोक
जवळ आले. न बघता एकमेकांशी बोलू लागले.
ह्या एका मोबाईलमध्ये सारे विश्व सामावले म्हटले तरी चालेल. तुम्ही किती ही बोंबाबोंब करा पण तुमच्याही हातात मोबाईल आहेच व
शेजारी कोण बसले याचे भान न ठेवता तुम्ही
लांबच्या माणसाशी चॅट करता हे लक्षात ठेवा.
या मोबाईलने तुम्हाला ॲाब्शन ठेवलाच नाही, तुमची इच्छा असो वा नसो तुम्ही तो वा प र ता चं..
मी हे का सांगितले? याला कारण आहे. सारे जग जेव्हा स्तब्ध होते तेव्हा मोबाईलच एकटा
फक्त प्रचंड काम करत होता. त्यांच्यामुळे ॲानलाईन शाळेत मुले शिकत होती, अभ्यास
करत होती. घरोघरची माणसे संपर्कात होती.
बातम्या कळत होत्या. प्रचंड संखेने ग्रूप स्थापन
होऊन लोक एकत्र जोडले गेले होते. सारे व्यवहार मोबाईल थ्रू चालू होते.
मी नुकतीच मोबाईल वापरायला लागले होते.
माझ्या कविता रोज ह्या ग्रूपवरून त्या ग्रूपवर
जात होत्या. एक दिवस मेसेज आला, अनोळखी
असा. तुमच्या कवितेचे अभिवाचन करू का?
म्हणाले, करा. नि दररोज माझ्या कवितेचे अभिवाचन होऊन तो ॲाडिओ महाराष्ट्रभर फिरू
लागला विचार करा दोन वर्ष हा क्रम अव्याहत
चालला व माझे ॲाडिओ आले नाहीत तर लोक विचारू लागले आज कविता का आली नाही.
बघा, जे काम वर्तमानपत्रांनी कित्येक वर्षे केले नाही ते अवघ्या तीन महिन्यात महाराष्ट्रभर पसरले. दोनच वर्षांत माझी सात पुस्तके निघाली सहा पद्य व एक गद्य जे मी कधी लिहिल असे मला वाटले नव्हते ते ही निघाले.
अशी दरवर्षी तीन याप्रमाणे माझी तीस पुस्तके प्रकाशित झाली. ज्या कवितांचे ॲाडिओ महाराष्ट्रभर गेले त्याच कविता पुस्तक रूपाने अक्षरवाड्.मय बनल्या. ललित गद्याची तीन पुस्तके निघाली ज्यांचा मी कधीच विचार केला
नव्हता. मी हे नेटाने चालू ठेवले नसते तर…?
विचार करा आज मी तीस पुस्तकांची धनीण
झाले असते का? आत्ता आज मी पुढच्या तीन
पुस्तकांचे प्रूफरिडिंग करते आहे. लवकरच ती
तयार होऊन प्रकाशात येतील.
बघा, रोज कविता लिहिणे.( सुचतात म्हणून हो)
ते काही येरागबाळ्याचे काम नाही. त्या ॲाडिओ
रूपाने ग्रूपला पाठवणे. मध्ये मध्ये लेख लिहिणे
चालूच होते. ते माध्यमांपर्यंत पोहोचवणे. धुळ्याच्या आपल्या महाराष्ट्रासाठी वर्षभर
“माझे गांव कापडणे” मालिका लिहिणे, रेडिओ
विश्वाससाठी “नातवंडांशी गप्पा” कार्यक्रम
रेकॅार्ड करून पाठवणे, अधून मधून प्रस्तावना
लिहून द्या म्हणताच सखोल अभ्यास करून त्या
लिहून देणे( मागच्या व या वर्षीही लिहितेच आहे.) शिवाय घर ही सांभाळणे. पुस्तकांवर बोलू काही कार्यक्रमाला उपस्थित राहणे. कुठे व्याख्यानाला बोलावले की तेथे जाणे, ॲानलाईन संमेलने अटेंड करणे, अबबबबबबबब. केवढी मोठी यादी आहे हो, मलाही माहित नव्हते. तर अशा असतात माझ्या
संकल्पना ज्यांची मलाही कल्पना नसते पण त्या
कागदावर उतरतात व मला वाटते, दिवसाला चोवीस तासच का आहेत? अठ्ठेचाळीस का नाहीत. माझ्या मेंदूला एक मिनिट उसंत नाही हो? सतत बिचारा कुठले नि कुठले काम करत
असतो मग तुम्हीच सांगा वेळ कसा पुरणार?सध्या माझी एकच तक्रार असते, माझ्याकडे
वेळच नसतो. कुठून आणायचा तो? मला संकल्प करावेच लागत नाहीत. माझ्या हातून सतत कामे घडत असतात. सध्या अकाशवाणी
नाशिकवरून दर रविवारी एक गाणे प्रसारित
होते आहे, ते ही काम आहेच की! तुम्ही जितके स्वत:ला गुंतवून घ्याल तेवढ्या योजना तुमच्या
हातून पूर्ण होतातंच, प्रश्न फक्त तुम्ही किती क्रियाशील व उत्साही आहात तो आहे. आळशी
माणसाकडून काय काम होणार सांगा.
अधून मधून कामवाल्या बायकांच्या मुलांनाही मी दररोज शिकवले. आज ते नोकरीत आहेत.
ॲडमिशन घेऊन द्यायचे कामही मला ओळखीमुळे करून द्यावे लागते ते वेगळेच.
माझ्या कमांना, संकल्पनांना कुठल्याही सीमा नाहीत. मला जमेल तेवढे योगदान मी देतच असते. नाही म्हणणे माझा स्वभावच नाही.
असे वर्षानुवर्षे माझे काम चालू आहे. संकल्प
न करताच अनेक कामे मी पूर्णत्वाला नेते व त्यात माझे सुख व समाधान आहे. मला कधी कधी कामाचा प्रचंड लोड येतो व हातावेगळे
झाले की हायसे वाटते. टेन्शन कमी होते. त्यात
मला रासेगावच्या शेताकडेही लक्ष द्यावे लागते.
गवत काढून घेणे, खत पाणी इ. बघावेच लागते.
आनंद आहे मला ती सुंदर झाडी पाहून.डोक्यापार त्या झाडांना वाढवणे, त्यांचे
संगोपन करणे हा संकल्प मी सात वर्षांपूर्वी केला त्याला आता इतकी मधुर फळे आली आहेत की वाटते प्रत्येक झाडाचीच दृष्ट काढावी. साहित्यिकांच्या सहली तिथे वय व
भान विसरून नाचतात गातात व निदान अर्धा
दिवस तरी घरदार विसरून ताजेतवाने होऊन
जातात ते पुन्हा येऊच या निश्चयाने.
आपल्या संकल्पना राबवतांना आपण आनंदनिधान झाले पाहिजे व ती संकल्पना नि:स्वार्थीपणे राबवता आली पाहिजे तरच ती
निखळ आनंद देऊ शकते. महत्वाचे म्हणजे माझे
समाधान हाच माझा फायदा हा दृष्टिकोन हवा.
जिथे पैसा व कमाई हे दोन शब्द येतात तिथे त्याची हवाच निघून जाते.
आजकाल आम्ही पुस्तके काढतो ते ही कमाई साठी. लगेच घरपोच साठी आमंत्रणे सुरू होतात. तुम्ही स्वान्त सुखाय लिहिले ना? तुम्ही
समाजाचे काही देणे लागता ना? की पैसा हेच
तुमचे जीवनाचे उद्दिष्ट आहे? कुठे न्यायचा आहे तो बरोबर? नेताच येत नाही. पुढची पिढी सुखात
असेल, कमवत असेल तर कशासाठी या नश्वर
गोष्टींचा लोभ ठेवायचा हो? त्या पेक्षा लिहा व स्वत: बरोबर इतरांना आनंद द्या. दोन आवृत्या
खपल्या, तीन खपल्या पण तुम्ही त्यासाठी किती
खपले हे लिहिता का तुम्ही? अहो, बुकस्टॅालवाले पन्नास टक्के कमिशन मागतात.
कशाला आपले दात विचकायचे नि हांजी हांजी
करायची? त्या पेक्षा गिफ्ट द्या नि घेणाऱ्याच्या
चेहऱ्यावरचा आनंद बघा. तीस पुस्तके काढून मी अजून एकही विकले नाही ना रॅायल्टी मागितली.
माझ्या पेन्शनवर माझे झकास चालते. मी कुणाकडून पैसेही मागत नाही. गरजच नाही हो,
कशाला मागायचे? बॅंकेत थप्पी लावून एक दिवस निघून जायचे? त्या पेक्षा आपल्या जगण्याच्या व आनंदाच्या संकल्पना बदला व सुखाचा मार्ग शोधा. माझा प्रत्येक दिवस काय काय करायचे, लिहायचे बाकी आहे हा विचार
करण्यात जातो त्यामुळे बाकी फालतू विचार
करायला व काड्या कोरायला मला वेळच नसतो. होय हो,” रिकामा न्हावी नि भिंतीला तुमड्या लावी” अशी एक म्हण आमच्या लहानपणी होती. रिकामा माणूस उगाच विध्वंसाचा विचार करत बसतो. त्या पेक्षा कामात गढून राहणे किती चांगले नाही का?
तर मंडळी, लिहा तुमचे संकल्प, संकल्पना व
काम करत रहा, इतके की फालतू विचार करायला वेळच मिळू नये. बघा मग कसे माझ्या
सारखे तरतरीत रहाल तुम्हीपण..
तो… शुरू हो जाव …
All the best आणि Well in advance
नव्या वर्षाच्या खूपखूप शुभेच्छा….
आपलीच,
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)