You are currently viewing अंती सोबत काय येते ?

अंती सोबत काय येते ?

*काव्य निनाद साहित्य मंच तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*

 

*अंती सोबत काय येते ?*

 

धरम करम या चित्रपटात मुकेशने एक गाणे गायले आहे. आज अचानक ते गाणे आठवले—

एक दिन बीत जायेगा माटीके मोल ,

जगमे रह जाऐंगे , प्यारे तेरे बोल ! मग ते गाणे मी मुद्दाम पुन्हा पुन्हा ऐकले !

अंती काय येते या प्रश्नाचे समर्पक उत्तरच या गाण्यात सांगितले आहे असे मला वाटते!

मनुष्य आयुष्यभर आपले जीवन सुखी होण्यासाठी धडपडत असतो, अतोनात कष्ट करतो, कुटूंबाच्या गरजा पूर्ण व्हाव्यात , त्यांना कधी काही कमी पडू नये ही त्याची आंतरिक इच्छा असते , मानवाच्या भौतिक गरजा पूर्ण होण्यासाठी पैशाची नितांत गरज असते. भौतिक सुखाच्या मागे लागून मनुष्य भ्रष्टाचारालाच शिष्टाचार कधी समजू लागतो हे त्याच्याही लक्षात येत नाही. आपले काम करून घेण्यासाठी वजन वापरणे ही सद्यस्थितीत संस्कृतीच बनली आहे. आपले जीवन सुखी होण्यासाठी पैशाची खूप गरज आहे असेच प्रत्येकला वाटतअसते (अपवाद वगळून) .

भौतिक गरजा पूर्ण होण्यासाठी पैशाची नितांत आवश्यकता असतेच असते. पण मानसिक सुख केवळ पैशाच्या जोरावर नाही मिळू शकत . राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या असं तुकडोजी महाराज उगाच नाही म्हणत! प्रत्येकाची सुख मिळविण्यासाठी अतोनात ,धडपड सुरू असते. कुटूंबाच्या गरजा पूर्ण कधीच होत नाहीत, मागणीच्या सिद्धांताप्रमाणे एक गरज संपली की दुसरी तयारच असते .गरजा कधीही संपत नाहीत, सगळे आयुष्य संपत येते तरीही काहीतरी मिळवायचे राहिले, कुटूंबाच्या सुखासाठी करायचे राहिले या विचारांना अंत नसतो .सूर्यास्त होण्याच्या आधी जितका चालशील तितकी जमीन तुझी होईल या गोष्टीप्रमाणे हाव संपत नाही, मनुष्य सुख मिळविण्यासाठी पैशाच्या मागे धावत असतो, शेवटी जीवनाचा सूर्यास्त होण्याची वेळ येते आयुष्यभर कष्ट करूनही पैशाचा, सुखसाधनांचा उपभोग घेण्याचे राहूनच जाते, पण पैशाची लालसा जात नाही, कमावलेल्या कमाईचा उपभोग दुसराच कोणी घेणार असतो, सुख केवळ भौतिक उपलब्धीवर अवलंबून असते हे न कळल्यामुळे , सुखाची खरी व्याख्या न समजल्याने मनुष्य कधीच सुखी समाधानी नसतो कधी भुकेलेल्यांना अन्न दिले नाही की, कधी दुखितांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला नाही , मुलाबाळासाठी आयुष्यभर झिजला, सुखाचे दोन घास कधी खाल्ले नाहीत, विश्रांती घेतली नाही, त्याला वय उतरणीला लागल्यावर स्वतःच कमावलेल्या पैशाचा उपभोग घेता येत नाही. जगाचा निरोप घेण्याची वेळ येते अंती सोबत काय येते? पैसा,जमीनजुमला? तर यातले काहीच नाही !एक सुताचा धागाही बरोबर नेता नाही येणार . बरोबर काय येणार? आपण केलेली चांगली कामे ! आपले सत्कर्म!

मरावे परी कीर्ती रूपे उरावे ह्या विधानात किती अर्थ आहे !पण लक्ष्यात कोण घेणार? असतील शिते तर जमतील भुते या न्यायाने लोक जवळ जमतात अन गरज सरो वैद्य मरो या उक्तीप्रमाणे काम संपले की विसरूनही जातात .सोबत काय येणार?येसी उघडा जासी उघडा हे सत्य विसरून नाही चालणार ,प्रत्येक जीव म्हणजे आत्मा ! शेवटी नश्वर देह सोडून जीव अनंतात विलीन होणार ! मट्टी ओढावन ,मट्टी बिछावन , मिट्टीमेही मिल जाना होगा, फिर वहांसे नही आना हॊगा,अशी स्थिती आपल्या प्रत्येकाचीच होणार आहे हे विसरू नये. म्हणून मायेच्या पाशात न गुंतता जिथे आपण जन्मलो :तिथल्या भूमीसाठी समाजासाठी काही करणे आपले कर्तव्य आहे . आपण केलेले चांगले काम हीच आपली खरी ओळख व हीच आपली जमापुंजी, जी आपण जग सोडल्यावरही कायम राहील हा विचार मनुष्याच्या मनात केंव्हा येत असेल ? सजन रे झूट मत बोलो या गाण्यात वर्णन केल्याप्रमाणे बालपण ;तरुणपण निघून गेल्यावर? अंती सोबत काय नेणार? हा विचार सामान्य मनुष्य करत असेल का?

मनुष्य इतका गहन विचार करु शकतो का? आजची जीवनशैली पाहत असता याचे उत्तर नकारात्मकच आहे हे खेदाने म्हणावे वाटते.सध्या जगात जी हेराफेरी, अनाचार सुरू आहे त्यावरून विवेक व विचारक्षमता कुणात उरलीय की नाही शंकाच आहे. कुणी कसाही वागला तरी आपण आपले वर्तन चांगले ठेवावे चांगल्या कामांना शाबासकी द्यावी, निदान दुसऱ्याचे मन दुखेल असे वर्तन कधीही करू नये . कारण तुम्ही ज्याचे मन दुखावले आहे त्याने दुरुत्तर केले नाही तरी त्या आत्म्याची हाय नक्कीच लागते! थोडक्यात माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, म्हणजे शेवटच्या क्षणी पश्चातापाची वेळ आपल्यावर येणार नाही ,इतके तरी पथ्य प्रत्येकाने पाळलेच पाहिजे. ईश्वराचे नामस्मरण, सत्कर्म, व सगळ्यांशी गोड वर्तन, दुसऱ्याला केलेली निरपेक्ष मदत हीच निर्मळ मधुर शिदोरी अंती सोबत येणार आहे. जगमे रह जायेगे प्यारे तेरे बोल या विधानाची सत्यता असणार आहे

 

 

प्रतिभा पिटके

अमरावती

९४२१८२८४१३

प्रतिक्रिया व्यक्त करा