*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी विगसा यांच्या कवितेचे साहित्यिक विनय पारखी यांनी केलेलं रसग्रहण*
*तिन्हीसांजा*
जगता जगताच सहजपणे
आठवेच गंधाळत राहीली
बोल बोलता पाणावलेली
वैखरीही निःशब्द जाहली
जीवा केवळ तुझीच ओढ
दुरत्व इतुके भेट न जाहली
मीच धुंडित राहिलो चराचर
शोधिले तुज पावलोपाऊली
मनी आज फक्त एक आशा
कधीतरी घेशील तूच जवळी
अस्ताचलीचे सारेच रंग तुझे
मी कवटाळीतो त्या प्रभावळी
जाहल्या बघ नां ! तिन्हीसांजा
तेजाळल्या दीपज्योत राऊळी
कवी – वि.ग.सातपुते
मानवाच्या वाढत्या वयानुसार त्याच्या आयुष्यात तिन्हीसांजेचे महत्व प्रत्येक वेळेला बदलत जाते आणि एक वेळ अशी येते की मानवाला या भौतिक जगापासून विरक्त व्हावेसे वाटते आणि त्याला परमात्म्याची आस लागते.
भावकवी असलेल्या विगसा सरांनी या कवितेत “जाहल्या बघ नां ! तिन्हीसांजा, तेजाळल्या दीपज्योत राऊळी” असा उल्लेख केलेला आहे. वास्तविक पाहता आपलं ज्याच्याशी अधिक सख्य आहे त्यालाच आपण ‘बघ नां !’ असा शब्द प्रयोग वापरतो, आणि दुसरे म्हणजे सरांनी या ओळीत ‘तिन्हीसांज’ असा शब्द न लिहिता अनेकवचनी असलेला शब्द ‘तिन्हीसांजा’ हा शब्द वापरला आहे, म्हणजेच अशा अनेक तिन्हीसांजा रोज आपल्या आयुष्यात घडत असतात पण आपल्याला त्याची जाणीव नसते. ही जाणीव ज्यावेळी नेणीवे पर्यंत पोहचते त्याचवेळी अंधाराचे आणि प्रकाशाचे मिलन होते.
अंधार आणि प्रकाश यांच्यातील हा चिरंतन संघर्षाचा इतिहास सर्वश्रुत आहे परंतु अंधार हळूहळू सरतो आणि प्रकाश जगण्याची इच्छा शतपटींनी वाढवतो. जर अंधारावर मात करायची असेल, तर प्रकाश हा हवाच असतो. बाहेर जरी भरपूर अंधार पसरला असला, तरी प्रत्येकाच्या अंतर्मनात एक दिवा सदैव जळत असतो. एकदा का हा मनातील ज्ञानदीप प्रजवलीत झाला की आपल्या अज्ञानाचा अंधकार क्षणात नाहीसा होतो. एकदा का अंतर्मनातील ही ज्ञानज्योत तेजाळायला लागली की मग मोह ममता, वासना, आकांक्षा, अपेक्षा, अहंकार, घृणा, असे सारे भ्रम क्षणार्धात नाहीसे होतात. डोळ्यांवर आलेले मायेचे, मोहाचे पटल हळूहळू दूर होऊ लागतात. गोंधळलेली मनःस्थिती हळूहळू स्थिर व्हायला लागते. सर्व शरीराला धारण करणारे तत्व म्हणजे आत्मा आहे. अशी असंख्य शरीरे या एकाच तत्वाने धारण केली आहेत आणि तोच ह्या विश्वाचा पालनकर्ता आहे हे सत्य समजायला लागतं. थकलेल्या मनाचा शेवटचा आधार म्हणजे देव… जो दिसत नाही आणि भेटतही नाही परंतु त्याचे अस्तित्व या संपूर्ण चराचरात सामावलेले आहे. त्याची आता भेट व्हावी हीच एक सुप्त इच्छा मनाला लागून राहते. त्याच्या नुसत्या असण्यानेच या देह मंदिरातील दीपज्योती तेज, आनंद, चैतन्याने उजळलेल्या आहेत, त्या नुसत्याच उजळल्या नाहीत तर त्या तेजाने त्या झळाळून निघाल्या आहेत. ज्ञान, कर्म आणि भक्तीच्या साहाय्याने जणू अंधारावर मात करण्यासाठी या मिळालेल्या तेजाच्या प्रकाशाने देवाचे अस्तित्वच सिद्ध केलं आहे. दिवे माणसांना जगण्याची नवी आशा देतात. ते तेजाळत असतात आणि सारा आसमंत आपल्या तेजाने उजळून टाकतात, ‘देह देवाचे मंदिर’ या उक्तीनुसार सरांनी ‘तेजळाल्या दीपज्योती राउळी’ असा उल्लेख इथे केलेला आहे.
मानवी मनाचे वैशिष्ट्य असे आहे की मन ज्या गोष्टींसाठी प्रवास करते तेच मन परमात्म्याच्या चरणी स्थिरावते आणि त्याची आपल्याला तशी अनुभूती येते. चांगल्या आठवणी या मनात आनंद, उत्साह, चैतन्य निर्माण करतात, मनाला परमेश्वराची आस लागून राहते. ज्याप्रमाणे सूर्य अस्ताला जाताना निरभ्र असलेल्या आकाशात आपले अनेक रंग मुक्तहस्ताने उधळून देतो, त्याचप्रमाणे मानवाच्या वृत्तीत बदल होऊ लागतो. त्या अस्ताचलीच्या रंगांना त्या प्रभावळीला कवटाळावेसे वाटू लागतं. मनात त्या परमात्म्याविषयी असलेल्या असंख्य आठवणी दाटून येतात. आठवणी नुसत्या दाटून येत नाहीत तर त्या परमात्म्याची स्तुती करताना मुखातून बाहेर पडणारे साधे बोलही निःशब्द होऊन जातात. ते तोंडातल्या तोंडात तिथल्या तिथे थिजून जातात. डोळ्यांच्या कडा पाणावतात आणि आस लागते ती त्याला फक्त भेटण्याची.
© विनय पारखी