सुरुवात कोरोना उच्चाटणाची
विशेष संपादकीय
देशात कोरोनाची पहिली लस पुण्यात तयार झाली आणि म्हणता म्हणता त्याचे देशांतर्गत वाटपही सुरू झाले. राज्याराज्यात पोचलेली कोरोनाची लस सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आली आणि आरोग्य विभागाकडून कालपासून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
कोरोनाच्या खडतर काळात अनेकांनी कोरोना योद्धा बनून महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. आपला जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवले आहेत. आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्स आदींनी परिश्रम घेतले होते त्यामुळे जिल्हा कोरोनाशी समर्थपणे लढू शकला. त्या खडतर काळात कोरोनाच्या छायेत आलेल्या वयोवृद्ध आणि काही तरुणांना सुद्धा आपले प्राण गमवावे लागले होते. काहीजण मृत्यूच्या दाढेतून परत आले होते. आज जिल्ह्यात कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे, परंतु अजूनही कोरोना रुग्ण गावात शहरात काही प्रमाणात भेटत आहेत. त्यामुळे कोरोनाची लस उपलब्ध होणे ही काळाची गरज होती.
कोरोनामुळे अनेक आस्थापना मध्ये कामकाज बंद पडले, कित्येकांचे रोजगार गेले, बेरोजगारी वाढली आणि आजही अनेक उद्योगधंदे बंद आहेत, पब्लिक ट्रान्सपोर्ट, लोकल रेल सेवा देखील ठप्प आहेत. त्यामुळे काही ठिकाणी कामकाज सुरू होऊन देखील दळणवळणाची साधने उपलब्ध नाहीत. अशा अनेक समस्या लोकांसमोर उभ्या आहेत. कोरोनाची लस उपलब्ध झाल्यामुळे बऱ्याच प्रमाणात त्याचा फायदा होऊन समाजाची बिघडलेली व्यवस्था पुन्हा रुळावर येण्याची आशा निर्माण झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लसीकरण सुरू झाले. कोरोनाच्या काळात खडतर प्रयत्न केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना, पोलीस कर्मचारी, शासकीय कर्मचारी इत्यादींना सर्वप्रथम कोरोना लसीकरण करून कोरोना मुक्तीकडे प्रवास करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून कोरोनाचा समूळ नाश होण्यास सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात १०० जणांना लस देण्यात येईल असे सावंतवाडी कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उत्तम पाटील यांनी सांगितले. रुग्णालयाचे सर्जन डॉ पांडुरंग वजराठकर यांनी पहिली लस घेतली. शासनाच्या नियमाप्रमाणे लसीकरण मोहीम घेण्यात येणार असून लसीकरणास सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकारी यांनी केले आहे.