You are currently viewing हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी..

हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी..

आंबोलीच्या जत्रेत सुरू अंदर बाहर जुगार..

सिंधुदुर्ग :

जुगार, पट हे गेली काही वर्षे जत्रोत्सवात बंदच होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर जत्रा सुद्धा होणार की नाहीत या द्विधा परिस्थितीत होत्या. सुरुवातीला काही जत्रा गाव मर्यादित स्वरूपात झाल्या, परंतु हळूहळू कोरोनाची भीती कमी झाली आणि लोक बिनधास्त वावरू लागले त्यात जत्रोत्सव देखील मोठ्या प्रमाणावर भरू लागले. *देवाकडे मास्क लाव नोको, कोरोना देवळात येत नाय* अशा प्रकारची बोलणी सुद्धा काही जणांकडून बोलली जाऊ लागली. एकीकडे जत्रोत्सव जोरदार सुरू झाले त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही जत्रोत्सवांमध्ये जुगार, अंदर बाहर सुद्धा जोशात सुरू झाले.

 

आंबोली येथे सुरू असलेल्या जत्रोत्सवात देखील आज अंदर बाहर पट जोरात सुरू आहे. आंबोली जत्रोत्सवापासून पोलीस चौकी ही हाकेच्या अंतरावर आहे, त्यामुळे आंबोलीत राजरोसपणे सुरू असलेला जत्रोत्सवातील जुगार कोणाच्या आशीर्वादावर सुरू आहे? असा प्रश्न आंबोलीतील नागरिकांना, भक्तांना पडलेला आहे. 

आंबोलीतील जत्रोत्सवातील पट चिंतेचा विषय बनला आहे. गावातील कष्टकरी लोक जुगारासाठी सावकारांकडे आपल्या पत्नीचे दागिने, मंगळसूत्र देखील गहाण ठेवतात आणि व्याजाने पैसे घेऊन  बक्कळ पैसा मिळेल या आशेवर जुगारात नशीब आजमावतात आणि शेवटी सर्वस्व हरतात. काही जुगाऱ्यांच्या बायकांच्या गळ्यात जत्रोत्सवात जाताना देखील मंगळसूत्र नसतं कारण ते सावकाराकडे गहाण ठेवलेलं असतं. जुगाराच्या पायी अनेक संसाराची राखरांगोळी होते, तरी देखील अवैध धंद्यांना आळा घालण्यापेक्षा त्यांना सूट दिली जाते ही कोणाच्या भल्यासाठी?

दीपक केसरकर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना खुलेआम जुगार सुरू नव्हते, केसरकरांच्या काळात अनेक अवैध धंदे बंद होते. केसरकरांचा वचक नव्हता असं म्हटलं गेलं तरी खुलेआम गैरधंदे होत नव्हते. महिलांच्या हातांना काम देण्यासाठी प्रयत्न झाले होते, बचतगट उभे राहिले होते, पण आज त्यांची स्थिती काय आहे? सरळ मार्गी चालणाऱ्या उद्योगांना चालना मिळण्यापेक्षा गैर धंद्यांना ऊत येताना दिसत आहे. असेच प्रकार सुरू राहिले तर सिंधुदुर्ग सारख्या निसर्गसंपन्न जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणण्यापेक्षा गैरधंद्यांचा जिल्हा म्हणून ओळखले जाईल आणि याची जबाबदारी असेल ती फक्त सत्ताधाऱ्यांवरच….!!

प्रतिक्रिया व्यक्त करा