कुडासेत कालव्यात कार कोसळून महिलेचा मृत्यू
चालकाला डुलकी आल्याने घडली दुर्घटना
दोडामार्ग
कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पतीसोबत आपल्या लहान मुलाला ठेवून गुरुवारी लक्ष्मीपूजन करण्यासाठी घरी परतणाऱ्या पत्नीवर काळाने घाला घातला. ती आपल्या मोठ्या मुलासोबत कारने येत असताना कार अचानक कालव्यात कोसळली व त्यात तिचा मृत्यू झाला. या अपघातात तिचा मुलगा किरकोळ जखमी झाला. शुभांगी शिवा परब (५५) असे तिचे नाव असून सचिन शिवा परब (दोघेही रा. वझरी, ता. पेडणे, गोवा) असे जखमी मुलाचे नाव आहे. साटेली भेडशी भोमवाडी येथे गुरुवारी मध्यरात्री २:३० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. चालकाला डुलकी आल्याने ही दुर्घटना घडली.
शुभांगी परब यांचे पती शिवा परब हे गोवा येथील शिक्षण विभागात कार्यरत होते. अलीकडेच ते सेवानिवृत्त झाले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोल्हापूर येथील एका खाजगी रुग्णालयात चार दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल केले होते. त्यांचा मोठा मुलगा सचिन परब हा गोव्यातील पोलीस खात्यात कार्यरत आहे. वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करावी व मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार असल्याने लक्ष्मीपूजन करण्यासाठी आईला घरी आणावे यासाठी सचिन हा आपल्या लहान भावाला घेऊन मामाच्या महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीने बुधवारी कोल्हापूरला गेला होता. त्यानंतर सायंकाळी शुभांगी परब यांनी आपल्या लहान मुलाला आपल्या पतीसोबत ठेवून मोठ्या मुलासह घरी येण्यास निघाल्या. मात्र सायंकाळची वेळ असल्याने त्यांनी रात्री कुडासे वानोशी येथे आपल्या माहेरी मुक्काम करण्याचे ठरविले. त्या दिशेने जात असता साटेली भेडशी येथील भोमवाडी मुख्य रस्त्यावरील कालव्याजवळ त्यांची गाडी आली असता सचिनचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट कालव्यात कोसळली.
कालव्यातून पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने गाडी वाहून जाऊ लागली. सचिन धिटाईने गाडीतून बाहेर पडला व आईलाही गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर लगतच्या घरातील लोकांना मदतीसाठी बोलविले. सचिनने स्थानिकांच्या मदतीने शुभांगी परब यांना तात्काळ लगतच्या साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र शुभांगी परब यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला. शिवाय सर्व हकीकत सांगून कालव्यातील पाणी बंद करण्याची विनंती केली. अधिकाऱ्यांनी देखील वेळ न दवडता कालव्यातील पाण्याचा प्रवाह बंद केला. मात्र अपघातामुळे गाडी तब्बल ५० मीटर वाहून गेली होती. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच तेदेखील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांचे जाबजबाब नोंदवून पंचनामा केला.