मालवण चिवला बीच येथे २१, २२ डिसेंबरला १४ वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा
स्पर्धेनिमित्ताने कबड्डी, व्हॉलीबॉल स्पर्धेचेही आयोजन ; डॉ. दीपक परब, राजेंद्र पालकर यांची माहिती
मालवण :
महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या मान्यतेने आणि सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने २१ व २२ डिसेंबर रोजी १४ वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा चिवला बीच मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. सिंधुदूर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने सागरी जलतरण क्षेत्रातील नवनवीन प्रयत्नांना सतत प्रोत्साहन देणाऱ्या आणि सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांनी स्पर्धेस उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण (दिपक) परब, सचिव राजेंद्र पालकर यांनी केले आहे. या स्पर्धेसाठी ‘सागरी जलतरणाच्या नवोन्मेषाच्या दिशा’ अशी टॅगलाईन देण्यात आली आहे.
मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. परब व श्री. पालकर बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष बाबा परब, निल लब्दे, समीर शिरर्सेकर, खजिनदार अरूण जगताप, सहसचिव किशोर पालकर, सदस्य सुनील मयेकर, मिलींद राणे, प्रमुख सल्लागार डॉ. राहुल पंतवालावलकर, कायदेशीर सल्लागार अॅड आर. एम. नाखवा, अॅङ संदीप जिनसेवाले, चारुशिला आचरेकर, माजी नगरसेवक दिपक पाटकर, रूजारिओ पिन्टो तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. २० रोजी महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या वतीने १० किमी., १ व २ किमी. फिन्स स्विमिन्ग, आणि दिव्यांग व ५०० मीटर (६ व ७ वर्ष) स्पर्धकांची नोंदणी दुपारी २ वाजल्यापासून काळबादेवी एक्सओटीका रिसॉर्ट, चिवला बीच, मालवण येथे सुरु होईल. सायंकाळी ५.०० वाजता मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ काळबादेवी एक्सओटीका रिसॉर्ट तसेच बीच कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन समारंभ सायंकाळी ७.०० वाजता चिवला बीच, मालवण येथे होणार आहे. २१ रोजी सकाळी मान्यवरांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करुन महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या स्पर्धेला सकाळी ६ वाजता १० किमी स्पर्धेची सुरुवात होईल. सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने १, २, ३, व ५ किमी स्पर्धकांची नोंदणी दुपारी ३ वाजल्यापासून व सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व उद्घाटन समारंभ काळबादेवी एक्सओटीका रिसॉर्ट, चिवला बीच येथे सुरु होईल. तसेच बीच व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन समारंभ सायंकाळी ७ वाजता चिवला बीच, मालवण येथे होणार आहे. २२ रोजी सकाळी मान्यवरांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करुन सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या स्पर्धेला सकाळी ६ वाजता ५ किमी स्पर्धेची सुरुवात होईल. २१ व २२ रोजी दुपारी १ वाजल्यापासून स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ होईल व २२ रोजी दुपारी ४ वाजता स्पर्धेचा समारोप केला जाईल, असे परब यांनी सांगितले.