जेष्ठ रंगकर्मी संजय जोशी यांना ६३ व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेचा प्रथम क्रमांक
कवठणीच्या ‘गावय’ नाटकासाठी केली होती रंगभूषा*
सावंतवाडी
महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट रंगभूषाकार म्हणून मळगाव गावचे सुपुत्र जेष्ठ रंगकर्मी संजय जोशी यांना राज्यस्तरीय प्रथम पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे.
सातार्डे मध्यवर्ती संघ कवठणी संस्थेच्या ‘गावय’ या नाटकातील रंगभूषेसाठी त्यांना या पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे. ६३ वी महाराष्ट्र राज्य उशी मराठी नाट्य स्पर्धा १ डिसेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह वेंगुर्ला व मामावरकर नाट्यगृह मालवण येथे अतिशय जल्लोषात संपन्न झाली. या स्पर्धेत एकूण १२ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. यात सिंधुदुर्ग केंद्रातून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा मालवण या संस्थेच्या वयासिस या नाटकाला प्रथम तर सातार्डे मध्यवर्ती संघ कवठणी संस्थेच्या गावय या नाटकास द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. गावय या नाटकासाठी रंगकर्मी संजय जोशी यांनी रंगभूषा केली होती.
रंगकर्मी संजय जोशी हे गेली अनेक रंगभूषाकार म्हणून काम करीत आहेत. अनेक हौशी नाट्य स्पर्धांमध्ये त्यांनी रंगभूषाकार म्हणून काम केले आहे तसेच अनेक वेळा त्यांचा सन्मानही झाला आहे. ज्येष्ठ रंगकर्मी कै. आबा कोंडये यांच्या मार्गदर्शनाखाली ते रंगभूषा करीत असत. आता त्यांचाच वारसा ते चालवीत आहेत, असे ते आवर्जून सांगतात.
संजय जोशी हे जेष्ठ दशावतार कलाकार असून जिल्ह्यातील अनेक नामवंत दशावतार नाटक कंपनीमध्ये त्यांनी आपली कला सादर केली आहे. विशेषतः त्यांनी सादर केलेल्या खलनायकाच्या अनेक भूमिका अजरामर झाल्या आहेत. हौशी नाट्य मंडळाच्या अनेक नाट्यप्रयोगांमध्ये देखील त्यांनी खलनायकाच्या तसेच विनोदी भूमिका साकारल्या होत्या. सद्यस्थितीत ते रंगकर्मी म्हणून अनेक नाटक कंपनीसाठी काम करीत आहेत. बाल दशावतार नाट्य मंडळ घडविण्यात देखील त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. त्यांनी नारायण आसयेकर, रत्नाकर मांजरेकर, रमेश शिरोडकर, साहिल तळकटकर असे अनेक कलाकार त्यांनी घडविले आहेत. रंगकर्मी म्हणून मिळालेल्या राज्यस्तरीय प्रथम पारितोषिकाबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी देखील पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________