कणकवली येथे लागलेल्या आगीत ऑफिस मधील साहित्यासहित घरातील अनेक वस्तू जळून खाक
समीर नलावडे यांच्यासह अनेकांकडून मदतकार्य
कणकवली :
शहरातील सोनगेवाडी येथील लवु पवार यांच्या घरात आज बुधवारी पहाटे ३ वाजल्याच्या सुमारास आग लागून घरातील साहित्य जळून बेचीराख झाले. घरातील ऑफिसमधील काही कागदपत्र देखील आगीच्या भक्षस्थानी पडले. तर घरातील टीव्ही सहित अन्य साहित्याचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी मदत कार्यात सहभाग घेतला. श्री नलावडे यांनी तातडीने नगरपंचायतच्या बंबाला पाचारण केले. त्यानंतर काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सोनगेवाडी येथील लवु पवार यांच्या घरात आग लागल्याची माहिती तीन वाजण्याच्या सुमारास स्थानिकांना मिळाली. त्यानंतर स्थानिकांनी याबाबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याशी संपर्क साधत नगरपंचायत चा बंब पाठविण्यात ची मागणी केली. त्यानंतर तेथील भाजपा कार्यकर्ते निखिल आचरेकर, स्थानिक नागरिक श्री पराष्टेकर यांच्यासह अन्य अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्यात सहभाग घेतला. काही वेळाने शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी सुजित जाधव हे घटनास्थळी दाखल झाले. कणकवली नगरपंचायत च्या बंबाद्व द्वारे तातडीने आगी वर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र तोपर्यंत आगीत घरातील हॉलमधील साहित्य जळून बेचिराख झाले. या प्रकाराने लवु पवार यांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीमुळे पहिल्या मजल्यावर अडकलेले लवु पवार व त्यांचां मुलगा उदय पवार यांना शिडीच्या सहाय्याने खाली उतरवण्यात आले.