You are currently viewing माझे गाव कापडणे..

माझे गाव कापडणे..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*४७)माझे गाव कापडणे..*

 

तर मंडळी ..

सेवाग्रामला भाऊंची बदली झाली ….

 

भाऊ म्हणतात…तेथे २५ विद्यार्थी होते. (मंडळी.

४१ साली २५ विद्यार्थी फार झाले.)त्यांस खादीचे विणकाम शिकविले.वैयक्तिक सत्याग्रही म्हणून पू.विनोबा भावे यांचे सेवाग्रामचे सभेला मी हजर होतो. गांधींच्या सायं प्रार्थनेसाठी आम्ही हजर राहत असू.

 

गांधीजी सायंकाळी फिरून परत येत असता

माझा मुलगा यशवंत गांधींजवळ गेला.त्यांनी त्याचे समोर एक मोसंबी फेकला. यशवंतने तो लगेच उचलला व गांधीजींना द्यावयास गेला.गांधीजी हिंदीत म्हणाले..”लावो”…

आम्ही वर्षभर माझी पत्नी सुंदरा बाई,यशवंत व

सुमन(माझी मोठी मुलगी),श्रीमती गंगू आत्या

हिरापूरकर असे सर्व सेवाग्राम येथे हरिजन वाड्यात भाड्याने घर घेऊन राहात होतो.वर्षभर

तेथे काम केले. ( वर्षभर सेवाग्रामला … वा.

मला किती अभिमान वाटतो आहे … जगत् विख्यात गांधीजींच्या सहवासात …१ वर्ष)

(आता नुसत्या पुतळ्यजवळ फोटो काढला

तरी आम्हाला धन्य वाटते!).

 

१९४२ साली चरखासंघाने माझी बदली कापडणे गावी खादी कार्यालयाचे व्यवस्थापक म्हणून केली.तेथे अंबर चरखा सुरू केला.खादी उत्पत्ती ही हरिजनवाड्यात सुरू करून पाच विद्यार्थी विणकाम शिकण्यासाठी घेतले.१९३० पासून आश्रमीय जीवन सुरू होते.सकाळ सायंकाळ प्रार्थना आठ तास काम अशा रितीने दिवस जात होते.

अस्पृश्यता निवारण या दृष्टीने माझे घरी

हरिजनांना जेवण दिले.व मी त्यांचे घरी जाऊन

जेवण केले.गावात त्यांच्या लग्नाच्या नवरा नवरीच्या घोड्यावर मिरवणूक काढल्या.

 

१९४२…भारत छोडो …..

 

मुंबई कॅांग्रेस अधिवेशनात महात्माजींनी …

चलेजावची घोषणा केली. जनतेला संदेश दिला… “करा आणि मरा …” ९ ॲागष्ट १९४२ रोजी पहाटे देशातले सर्व पुढारी पकडले गेले.कापडणे येथील माधवराव दिवाण पाटील यांनाही पकडून नेले.नंतर आठ दिवसांनी भिला रावजी पाटील, उत्तमराव नथ्थू पाटील,बळीराम काशिराम पाटील,राजाराम पाटील,या चौघा पुढारींनाअटक करून प्रथम धुळे व नंतर नाशिक तुरूंगात नेले. गावात ९ ॲागष्टला निषेधाची मोठी मिरवणूक निघून सभा झाली.१४४ कलम लागू केले.रोज

सत्याग्रह करून कलमांचा भंग होऊ लागला.

६०० कार्यकर्ते पकडले गेले.चळवळ थांबेना….

म्हणून … कापडणे गावी ५०००/- रूपयांचा

सामुदायीक दंड सक्तीने वसूल केला.मी मात्र

भूमीगत झालो नि बाळूभाई मेहता मुंबई येथूनच भूमिगत झाले व दलवाडे गावी येऊन १३-१४ ॲागष्ट १९४२ च्या सुमाराला कार्यकर्त्यांची सभा घेतली.मला ही त्यांचे बोलावणे आले. रात्री दलवाडे गावचे जवळच देवमनदादा यांचे मळ्यात ४०-५० कार्यकर्त्यांची सभा झाली. चर्चा झाली.हिंसा-अहिंसा प्रश्न उपस्थित झाला.

 

अहिंसा चळवळीत भूमिगत राहता येते का?

तारा तोडणे,रल्वेचे रूळ उखडणे,आगगाड्या

पाडणे,सरकारी इमारती जाळणे,सरकारी पैसा

लुटणे,हे कार्यक्रम अहिंसेत येतात का..?

याचे मार्गदर्शन महात्मा गांधीजींचे शिष्य

किशोरलाल भाई मशरनवाला यांचे घ्यावयाचे

असे बाळूभाई म्हणाले.माझेजवळ पत्र दिले व मी सेवाग्राम येथे जाऊन किशोरलाल भाई यांना भेटलो.मला पाहिल्याबरोबर ते म्हणाले, काय विष्णू पाटील …? आज अचानक येथे कसे..? मी लगेच बाळूभाईंचे पत्र व लखोटा त्यांचे हाती दिला …..

 

तर मंडंळी … स्वातंत्र्याच्या या यज्ञा मध्ये हे

देशभक्त भाजून निघत होते. पण हटत नव्हते.

रात्रंदिवस भूमिगत राहून विष्णू भाऊ ह्या

चळवळीचे नेतृत्व करत होते.. सळसळते रक्त,

तारूण्याचा जोष आणि ब्रिटिश सत्तेविरूद्धची चीड ह्या तरुणांना सदैव ताजेतवाने ठेवत होती.

मदत मिळो ना मिळो जनतेच्या सहकार्यांने

अडचणींवर मात करत ह्यांच्या कारवाया चालूच होत्या…. असो…..

 

भाऊ पुढे म्हणतात …

 

(हो , आपण सध्या भाऊंचे हस्तलिखित वाचतो

आहोत ….).

 

दे.भ. देवमनदादा दलवाडेकर शिंदखेडे तालुक्यात माझे नेतृत्वाखाली काम पहात होते.

कमखेडे खजिना लुटला,बोराडी बंगला जाळला. आपण वाचलेच.मग नंतर ….

पुढे ते म्हणतात, विटाई, ता. शिंदखेडे येथे गांधी भूमिगत कार्यकर्त्यांची सभा होती.सभेत ठरले की, भुसावळ ते सुरत मार्गावरच्या मालगाड्या

पाडाव्यात …(तुमचे ही रक्त सळसळले नां…!)

त्या साठी “पाने” (नटबोल्ट काढायला) मिळवण्याचे ठरविले.मुंबईस जाऊन अण्णासोा. सहस्रबुद्धे यांची भेट घेऊन रूळ काढण्याचे पाने मिळवले.पोपटराव चिंधू मराठे यांच्यावर हे काम सोपविले.परंतु त्यांनी जळगांव स्टेशनवर “पान्यांचे गाठोडे” उतरवून न घेता पुढे तसेच जाऊ दिले.त्या मुळे गाड्या पाडण्याचा कार्यक्रम झाला नाही ….

 

बॅांम्ब आणून इमारती उध्वस्त करणे….

 

अण्णासोा.सहस्रबुद्धे यांचे कडून टाईम बॅांम्ब

मिळवले.(केवढे धाडस हो… बॅांम्ब .. बाप रे

ऐकलं की धडकी भरते आपल्याला)…

ते फकिरा अप्पा देवरे यांनी प्रथम शिरपूर येथे

आणले.मी रानात राहात होतो.फकिरा अप्पा

देवरे व अण्णासोा.यांची मी मुंबईस गाठ घेऊन

त्यांची ओळख करून दिली होती.

 

धुळे शहरात बॅांम्ब ठेवण्याचे दोन प्रयोग झाले.

धुळे पोष्ट ॲाफिस जाळणे, त्यात श्री.सोलकर

भाजले.निजाम हद्दीत त्यांना नेऊन बरे केले.

(त्या काळी फारशी औषधे ही नव्हती हो … नि

असली तरी यांना सहजासहजी कशी मिळणार?) कल्पनेने ही डोळ्यात पाणी येते).

कोर्टाची इमारत जाळणेसाठी एक बॅांम्ब घेऊन

जात असतांना वाटेतच एका सायकलस्वाराचा

धक्का लागून स्फोट झाला.त्यात सदर एलमार

जखमी झाला व पकडला गेला. तीन वर्ष शिक्षा

झाली…. ही सर्व कामे माझ्या नेतृत्वाखाली…

चालली होती….

 

… मुंबईत भेटी गाठी ….

 

भूमिगत पुढारी एस् एम् जोशी,नाना साहेब गोरे,अण्णासोा.सहस्रहुद्धे,पूज्य साने गुरूजी,

शंकरराव ठकार,यांच्या बरोबर अनेकदा भेटी

गाठी होत असत व त्यांना धुळे जिल्ह्याच्या

भूमीगत चळवळीचा रिपोर्ट मी देत असे.श्री.

एस् एम् जोशी यांच्याकडून ५-६ महिने भूमिगत

चळवळी साठी मासिक २००-३०० रूपये मिळत होते. ते पकडले गेले. मग आर्थिक मदत बंद झाली.

 

मजजवळ १०-१२ भूमिगत कार्यकर्ते होते.त्यांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था करावी लागत असे.देवमन दादा यांना दराणे येथील नथू भटजी यांनी पकडून दिले.टोणगांवकर अण्णा अंमळनेर येथे १९४३ मध्ये पकडले गेले. बोरकुंड येथील श्रावण पाटील हे शिवराम आबा यांचे मामा होते.त्यांचेकडे शंकर पांडू ..३-४ कार्यकर्त्यांची व्यवस्था ६ महिने करावी लागली. तेथील ओंकार बापू यांची मदत होती.वडजई गावी फकिरा अण्णा देवरे यांची फार मोठी मदत झाली.कार्यकर्ते येथे अधूनमधून राहात असत. नासिक येथे फकिरा अप्पा देवरे यांच्यासह सहा महिने भूमिगत होतो.ॲागष्ट ४३ मध्ये आटपाडी येथे खादी कार्यालयाचे व्यवस्थापक धुडकू भाऊ ठाकरे यांचेकडे पत्नीसह महिनाभर मुक्काम करून रिव्हॅाल्व्हर मिळवण्याचा प्रयत्न केला.श्री. जी डी लाड , नागनाथ नायकवाडी यांच्या भेटी झाल्या.त्यांनी रिव्हॅाल्व्हर द्यावयाचे कबूल केले.

 

पुढे भाऊ म्हणतात ,….

रिव्हॅाल्व्हर मिळणार होतेच शिवाय धुळे जिल्ह्यात सरकारी पैसा लुटण्याचा कार्यक्रमही

ठरला.योग्य वेळ मी निवडावी असे ठरले.धुळे

येथे परत वडजई गावी येऊन फकिरा अप्पा यांना धुळे जिल्ह्याचा सरकारी पैसा लुटण्याचा

कार्यक्रम सांगितला. पोलिस खात्यातील मित्र

मिळवा असे मी म्हणालो. ते म्हणाले, मित्र तयार आहेत काळजी करू नका.

 

शिंदखेडे तालुक्यात भ्रमण. रात्री एकटा सायकलीने प्रवास करून शिंदखेडे

येथील राम बुवा तर्फे ३०० रूपये,दोंडायचा येथील अर्जुन ठाकूर यांचे कडून १००/- रूपये,

नासिक वायपूर येथून १००/- रूपये,असे ५००/-

रूपये मिळवून,व्यंकटराव धोबी यांना आटपाडी

येथे रिव्हॅाल्न्हर विकत घेणेसाठी पैसे देऊन धुडकू ठाकरे यांचेकडे पाठवले.श्री.जी डी लाड

याजकडून फक्त एक रिव्हॅाल्व्हर घेऊन व्यंकटराव धोबी परत वडजई गावी आले.पण ते रिव्हॅाल्व्हर जुने व काम देईना. परत आटपाडी …..

 

मी माझी पत्नी व मुलगी सुमन यांचेसह पंढरपूर

मार्गे आटपाडी येथे जाऊन दोन रिव्हॅाल्व्हर घेऊन आलो. (मंडळी, ४३/४४ साली बायको मुलांसह प्रवास.. जरा विचार करून पहा.आपण नातलगांसाठी काही करत नाही तर देशासाठी? एवढ्या हालअपेष्टा? तिथे विष्णुभाऊच पाहिजेत हो..)

 

चहार्डी शेतसारा लुटण्याचा प्रयत्न…

 

जळगांवी श्री.हंसराज दादा(माधवराव दिवाण

यांचे जावई)हायस्कूल मध्ये शिक्षक होते.त्यांचे

कडे मुक्काम करून व्यंकटराव धोबी , शंकर माळी यांचेजवळ एक एक रिव्हॅाल्व्हर देऊन

चहार्डी शेतसारा लुटावा असे ठरले.चहार्डी येथे

मुक्काम करून चोपडा मध्यभागी पाटील तलाठी यांची बैलगाडी मिळवली व गोळीबार केला….गाडीतील पाटील तलाठी घाबरले.गाडीत पैसा मिळून आला नाही.

 

चिमठाणा लूट प्रकरण आपण वाचले असले तरी विष्णू भाऊंच्या शब्दात ऐकू या …..

फकिरा अप्पा देवरे यांना सातारकर मंडळी यांना धुळे येथे घेण्यासाठी चिठ्ठी देऊन धुडकूभाऊ ठाकरे यांचेकडे आटपाडी गावी पाठविले.फकिरा अप्पा देवरें सह १७ मंडळी रिव्हॅाल्व्हर सह सर्व तयारी नुसार आले.त्यांचा काही दिवस मुक्काम वडजई

गावी झाला.नंतर काही दिवस बोरकुंड जवळ

वरवाडे गावी होता.त्या वेळी मी ही तेथे होतो.

फकिरा अप्पांचे दोन मित्र पोलिसखात्यात

नोकरीला होते.वडजई येथील रामराव पाटील

हेडक्वार्टर,धुळे येथे हवालदार होते.दुसरे कुसुंबे

येथे भाऊराव शिंदे सी.आय्.डी.खात्यात नोकरीला होते.या दोघांचे मदतीने धुळे येथून

नंदुरबार येथे जाणाऱ्या खजिन्या बद्दल बातमी

बरोबर मिळाली.

 

बरंय् मंडळी, राम राम.

जयहिॅद.. जय महाराष्ट्र..

 

आपलीच,

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा