*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*देव शोधतो शोधतो…*
देव शोधतो शोधतो, सद् गुण माणसात
माफ करतो करतो, अवगुण एकसाथ..
देव क्षमाशील आहे, सदा असतो पाठीशी
मागत तो काही नाही,देव गंगा आणि काशी…
निर्गुण नि निराकार आम्ही भजतो सगुण
कल्पिताच येत नाही,जोडतो त्यास गुण
चराचरात तो आहे भिरभिर वाऱ्यातही
स्पर्शून तो जातो अंगा,आम्हा कळतही नाही…
बांधावरच्या शाळूत पारवा तो माडावर
वेळूतून घाले साद फुंकर ती मनावर
यमुनेच्या गूढ जळी कालिंदीच्या खोलडोही
गोपिकांची रासक्रीडा वृंदावनात मोहवी…
तो नाही कुठे सांगा श्वासा श्वासात बोलतो
दोन पाय दोन हात भराभरा तो चालतो
त्याच्या वाचून हालेना पान एक ही झाडाचे
रसदार मलई नि गोड पाणी शहाळ्याचे..
कोण भरेल हो सांगा गोड पाणी नि मलई
ढग पालख्या आभाळी शुभ्र धुक्याची दुलई
धारा सहस्र जीवन फुलवते वसुंधरा
कडाडतो नभात नि पाचोळा तो गरागरा…
प्रा. सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)