You are currently viewing सामाजिक बांधिलकीचा सनदी अधिकारी : प्रशांत रोकडे IRS

सामाजिक बांधिलकीचा सनदी अधिकारी : प्रशांत रोकडे IRS

 

अमरावतीचे सुपुत्र श्री प्रशांत रोकडे सध्या प्रशासनामध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून मुंबईला कार्यरत आहेत. ते केवळ अधिकारी आहेत म्हणून मी हा लेख लिहीत आहे असे नाही. पण खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपणारा हा अधिकारी आहे. तन-मन धनाने या अमरावतीच्या अधिकाऱ्याने स्वतःला झोकून दिले आहे. जितने वाले कोई अलग काम नही करते व हर काम अलग ढंगसे करते है या न्यायाने प्रशांत काम करीत आहे. प्रशांत हा दूरच्या नात्याने आमचा विद्यार्थी. त्याचे वडील श्री ज्ञानेश्वर रोकडे व मी मित्र. हे टेलिफोन खात्यात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते. चळवळीमुळे आम्ही एकत्र आलो. प्रशांत तेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. पण त्याला आवड होती ती वादविवाद स्पर्धेची भाषण देण्याची. कुठली स्पर्धा असो. प्रशांत आघाडीवर असायचा. आणि मला असं वाटते की वादविवाद स्पर्धेतील त्याचे हे कौशल्य तसेच तो शैक्षणिक दृष्ट्या सक्षम असल्यामुळे तो सनदी अधिकारी होऊ शकला. त्यासाठी त्याला बरीच वाट पाहावी लागली. आयुष्यामध्ये बरेच चढ-उतार आले. यश प्राप्त होत नव्हते. पण तो थकला नाही. मला केव्हाही भेटला तर मी त्याला विचारात होतो प्रशांत काय सुरू आहे. त्याचे उत्तर ठरलेले होते .सर स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. त्याने चुकूनही मी नोकरी करीत आहे. नोकरीसाठी प्रयत्न करीत आहे. असे मला म्हटले नाही. स्पर्धा परीक्षेसाठी तो प्रामाणिक राहिला आणि कोण कहता है की आसमान मे सुराख नही होता _ एक तो पत्थर तबियत से उ उठा लो यारो . या न्यायाने त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयएएस या परीक्षेमध्ये यश संपादन केले. त्याने यश संपादन केले हे निश्चितच अभिनंदनास पात्र आहे .पण त्याहीपेक्षा प्रशांतने अधिकारी झाल्यानंतर समाजासाठी जे झोकून दिले ते खूपच महत्त्वाचे आहे. सुरेश भटांच्या भाषेत सांगायचं तर – ते लोक होते वेगळे गर्दीत जे गेले पुढे – मी मात्र मागे वळून पाहतो मागे किती जण राहिले. या न्यायाने अधिकारी झाल्यावरही प्रशांत समाजाभिमुख काम करीत होता आहे आणि राहिलही. तो जेव्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाची आयएएस ही परीक्षा पास झाला तेव्हा नेमके आमचे अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये आय ए एस चे एक हजार मुलांचे दहा दिवसांचे प्रशिक्षण शिबिर सुरू होते

मला मा. पालकमंत्री डॉ.श्री सुनील देशमुख यांचा फोन आला. त्यावर्षी भरपूर मुले महाराष्ट्रातून आयएएस झालेली होती. सुनील देशमुख यांनी माझे अभिनंदन केले आणि प्रशांत रोकडे अमरावती चा मुलगा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाला आहे असे सांगितले. लगेच मी माझ्या सहकारी सौ ज्योती तोटेवार यांना सांगितले की प्रशांतचा पहिला सत्कार आपल्याला करायचा आहे. तुम्ही माझी गाडी घ्या. प्रशांत कडे जा. त्याचा सन्मान करा. आणि या शिबिरामध्ये त्याला घेऊन या. त्याप्रमाणे त्यांनी माझ्या आज्ञाचे पालन केले.

प्रशांतचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे तो बहुजन समाजाला जागा करीत आहे. बौद्ध विहार मध्ये अभ्यासिका व ग्रंथालय ही अतिशय अभिनव कल्पना त्याने राबविली आहे. बौद्ध विहारामध्ये ग्रंथालय आणि अभ्यासिका हे समीकरण त्याला कसे सुचले काय माहित ? पण ते त्यांनी यशस्वी करून दाखवले. खरं म्हणजे लोक खूप बोलतात. पण तसे वागत नाहीत म्हटल्याप्रमाणे चालत नाहीत. पण प्रशांत मात्र याला अपवाद आहे .तो इतर अधिकारी जसे समाजाला विसरून जीवन जगतात तसे ऐशो आरामात जीवन जगू शकला असता .पण घार हिंडते आकाशी .लक्ष तिचे पिलापाशी. या न्यायाने शनिवार रविवार आला की त्याचे अमरावतीला आगमन ठरलेले आहे. अमरावतीला त्याने महात्मा फुले यांच्या नावाने अभ्यासिका व ग्रंथालय तयार केले.तिथल्या मुलांना तो तयार करीत आहे .याशिवाय नागपूर असो विदर्भ असो ज्या ज्या ठिकाणी त्याला संधी मिळाली ज्या ज्या ठिकाणी अनुकूलता मिळाली त्या त्या बौद्ध विहारांमध्ये त्याने अभ्यासिका आणि ग्रंथालय सुरू केलेले आहे आणि या अभ्यासिकांची आणि ग्रंथालयांची संख्या मोठी आहे. आज-काल अभ्यासिका आणि ग्रंथालय याच्या नावावर सर्वजण व्यवसाय करीत आहेत. मोठी मोठी फीस व अपुऱ्या सोयी सकारात्मक वातावरण नाही अशा अनेक अभ्यासिका आज अमरावती व इतर मोठ्या शहरात आहेत. पण प्रशांतची महात्मा फुले अभ्यासिका याला अपवाद आहे. गरीब मुलांच्या मदतीला तो आईच्या पोटतिडकीने धावत जातो. मध्यंतरी केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले यांचा तो विशेष अधिकारी होता. दिल्ली ते अमरावती अंतर फार मोठे आहे .पण एवढे मोठे अंतर विमानाने का होईना कापून तो अमरावतीला सामाजिक चळवळीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होता. अमरावतीकरांना जागा करीत होता. त्यांना जाणीव जागृती करून देत होता. नाहीतर बरेचसे अधिकारी बरेचशे प्राध्यापक बरेचशे व्यावसायिक मी माझी पत्नी माझा मुलगा आणि माझी मुलगी या चौकटीत जीवन जगत असतात .पण या चौकटीने प्रशांतला कधीही स्पर्श केला नाही आणि म्हणूनच प्रशांतवर लिहिले पाहिजे असे मला वाटले .

परवा नवीन आयएएस झालेल्या मुलांच्या सत्कारासाठी दिल्लीला गेलो होतो. दिल्लीच्या महाराष्ट्र सदन या अतिशय समृद्ध सुसंपन्न अशा इमारतीत मुक्काम होता. प्रशांतला फोन केला. प्रशांतले भेटीला बोलाविले. पण काही वेळातच मी जिथे थांबलो होतो त्या महाराष्ट्र सदनमध्ये तो आला. भेटीगाठी झाल्या .गप्पा झाल्या. विचाराची देवाण-घेवाण झाली .आमची देवाण-घेवाण सुरू असतानाच महाराष्ट्राचे मुख्य सचिव राहिलेले माननीय श्री जे .पी.डांगेसाहेब महाराष्ट्र सदनमध्ये आले. तेही आमच्या चर्चेत सहभागी झाले. माझा दुसरा विद्यार्थी मनीष गवई तो पण माझ्याबरोबर होता.

मागे प्रशांतने रहाटगाव रोडवरील एका मंगल कार्यालयामध्ये गोलमेज परिषद भरविली. अशा प्रकारची परिषद भरविणारा हा पहिला अधिकारी .सामाजिक गोलमेज परिषद भरवून त्यांनी संघटनावर भर दिला. आपण एकत्र आलो तर काय करू शकते याचे एक रेखाचित्र त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. ते अभ्यासपूर्ण होते .सर्वांनी हात वर करून त्याच्या प्रकल्पाला मान्यता दिली. शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता या प्रकल्पाची रितसर सुरुवात अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये होत आहे. त्या प्रकल्पाचे नाव आहे वुई क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी. बहुजन समाजातील सर्व अधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते शैक्षणिक कार्यकर्ते एकत्र आले आणि विचार विनिमयातून जन्म झाला तो वुई क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा. ही केवळ सुरुवात आहे .हा केवळ अंकुर आहे. आगे आगे देखो होता है क्या ? असेच या उपक्रमात म्हणावे लागेल. एकजूट काय करू शकते याचे हे मूर्तीमंत उदाहरण आहे. पहिलाच कार्यक्रम सांस्कृतिक भवनमध्ये घेणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. तुमच्याजवळ पैसा असून नाही चालत .प्रेक्षकही असले पाहिजेत .ते कौशल्य माझ्यानंतर प्रशांतमध्ये आले आहे. माझ्या सर्वच कार्यक्रम सांस्कृतिक भवन मध्येच होतात. प्रशांतचा नागरिक सत्कार झाला .तेव्हा सभागृहात पाय ठेवायला उभे राहायला जागा नव्हती. इतका प्रचंड दांडगा त्याचा जनसंपर्क आहे. तो सर्वांचा आवडता आहे .सर्वांशी बोलणारा आहे.

अधिकारपणाचा कोट त्याने केव्हाच खाली उतरवून ठेवलेला आहे. त्याचे वडील श्री ज्ञानेश्वर रोकडे म्हणजे देवमाणूस. विनम्रता विनयता त्यांच्या रक्तात भिणलेली आहे. फुले शाहू आंबेडकर चळवळीला ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर रोकडे यांनी वाहून घेतले .त्यांचाच वारसा प्रशांत पुढे चालवीत आहे . माझे खूप विद्यार्थी आयएएस झालेत आयपीएस झालेत आयआरएफ झालेत सनदी व राजपत्रित अधिकारी झालेत पण आमच्या अमरावतीच्या प्रशांतने जी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे ती माणुसकी जोपासणारा फक्त प्रशांतच आहे. आपल्या सर्व अमरावतीकरांना अभिमान वाटला पाहिजे असा प्रशांतचा लोकाभिमुख चेहरा मोहरा आहे. आपल्या अमरावतीच्या आयएएस करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्लीला त्याने पाठराखण केली आहे. तो अधिकारी असताना तो केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले यांचा कार्यकारी अधिकारी असताना कुठे का असताना त्याने माणुसकीचा हात कधी सोडला नाही आणि सोडणारी नाही. म्हणून अशा या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अधिकाऱ्याला त्याच्या नवीन उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा. प्रशांत यशस्वी हो . फुले शाहू आंबेडकरांचा वारसा तू पुढे नेत आहेस .याचा मलाच नाही तर अमरावतीच्या तमाम जनतेचा तुझा अभिमान होता आहे व राहिलही.

 

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा