मालवण :
प्रति पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांच्या नवसास पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा २२ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. गुरुवारी सकाळी देवीचा हुकूम घेऊन सदर तारीख निश्चित करण्यात आली. आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो. यावेळी सुमारे दहा लाखापेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जत्रेची तारीख आता जाहीर झाल्याने पूर्वतयारीस लवकरच प्रारंभ होणार आहे. जत्रेची तारीख ठरविण्याचा कौल झाल्यानंतर श्री देवी भराडी मंदिर आज १२ डिसेंबर ते १४ डिसेंबर तीन दिवस धार्मिक विधीसाठी बंद राहणार आहे. कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे.