You are currently viewing माझे गाव कापडणे

माझे गाव कापडणे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*४६) माझे गाव कापडणे*

 

मंडळी ….

 

पुढे विष्णूभाऊ म्हणतात..( होय, आपण

भाऊंचे हस्तलिखित वाचत आहोत.)

 

१९३४ साली अधिवेशनात हजर होतो. दे.भ.

अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांनी सवाई मुकटीस

भेट देऊन खादी विणाई,वस्रस्वावलंबन कामांची पाहणी केली.माझे विणाईचे काम त्यांना पसंत पडले.त्यांनी मला अनंतपूर, जिल्हा सागर येथील महात्मा गांधींचे शिष्य जेठालाल भाई यांचे वस्र स्वावलंबनाचे काम पाहाणेसाठी पाठविले.तेथील काम पाहून आलो.व सवाई मुकटी गावी पंचक्रोशित वस्रस्वावलंबनाचा प्रचारक म्हणून

महाराष्ट्र संघातर्फे काम केले.सवाई मुकटी या

गावी ५ वर्षाचा काळ मोठ्या आनंदात घालवला

 

जीवनातले मोठे परिवर्तन …..

 

२६ जून १९३४ साली लग्न झाले. हिरापूर, ता.

चाळीसगांवची सासुरवाडी.पत्नी माझे कामात

साथ देणारी व पूर्ण खादी वापरण्याची तयारी

असलेली मिळाली.माझे विवाह प्रसंगी चरखा

संघाचे अध्यक्ष जाजूजी,महात्माजींचे पुतणे

कृष्णदास गांधी,बाळूभाई मेहता हजर होते

व त्यांचे आशीर्वादाने मोठा आनंद वाटला.

 

जुलै १९३५ मध्ये दलवाडे( ता.शिंदखेडे)

गावची मी निवड केली.तेथे जिल्हा कॅांग्रेस

कमिटी तर्फे कामाची नेमणूक झाली.दे.भ.

नानासाहेब ठकार धुळे जिल्हा कॅांग्रेसचे अध्यक्ष होते. दरमहा २५ रूपये पगार मिळत होता. दलवाडे गावच्या आजुबाजूच्या गावांना भेटी, वस्रस्वावलंबन प्रचार,ग्रामसफाई,अस्पृश्यतानिवारण,शाळेतील लहान मुलांची सफाई,स्वदेशी मालाचा प्रचार कार्यक्रम लोकांना सांगत असे व स्वत: करीत असे.खादी कामाची पाहणी व दलवाडे गावास भेट अण्णासाहेब सहस्रहुद्धे, नानासाहेब ठकार,श्रीमंती. पार्वती बाई ठकार, बाळूभाई मेहता,रावसाहेब पटवर्धन, पूज्य सानेगुरूजी,शिवाजीराव भावे ,इ.देशभक्तांनी काम पाहिले .

 

पूज्य सानेगुरूजींची दलवाडे, विरदेल,चिलाणे

इ. ठिकाणी व्याख्याने घडवून आणली.मधून

मधून नवलभाऊ पाटील दोंडाईचे येथील

स्वोद्धारक विद्यार्थी गृहाचे विद्यार्थी येत असत

व मार्गदर्शन करीत. थोरामोठ्यांच्या संगतीत

व मार्गदर्शनाने २ वर्षे मी दलवाडे गावी काम केले.१९३६ साली पेनेजपूर कॅांग्रेससाठी प्रचार,

ग्रामोद्योगी वस्तू मिळवणे.रावसाहेब पटवर्धन

यांची दलवाडे गावी मोठी सभा होऊन प्रचार

कार्य झाले.पेनेजपूर कॅांग्रेस अधिवेशनात माझी पत्नी सौ. सुंदरबाई व इतर अनेक स्त्रियांनी प्रेमाताई कंटक यांचे नेतृत्वाखाली स्वयंसेविकांचे काम केले .

 

१९३७ साली नवलभाऊ,नथूभाऊ लोहार,

शालीग्रामजी शेट,कॅांग्रेसचे उमेदवार शिंदखेडे

तालुक्यातून निवडायचे होते.त्याचे साठी मी

प्रचारकार्य केले.जुलै १९३७ मध्ये चरखा संघाचा कार्यकर्ता म्हणून माझी श्री.अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांनी नेमणूक केली. वर्ध्याजवळ नलावाडी येथे १ महिना सशास्र पिंजण शिक्षण घेणेसाठी राहिलो. नंतर चांदा आजच्या चंद्रपूर जिल्ह्यातील

शिंदेवाडी येथे खादी कार्यालयात पिंजण शिक्षक म्हणून माझी नेमणूक झाली.तेथे

२५/३० स्रियांना पिंजंण करून पेळू तयार करण्याचे शिक्षण दिले. श्री.सहस्रबुद्धे हे महाराष्ट्र चरखासंघाचे चिटणीस होते.माझ्या

कामावर ते खूष होते.

 

८/१० कार्यकर्ते माझ्या हाताखाली देऊन सावली, मूल, मड ,बेंबाड ह्या व आजुबाजूच्या

गावातून काम केले.

(मंडळी … गावांची नावे ऐकली ना? )कुठे सावली, मूल, चांदा व कुठे कापडणे? पण देशभक्ती नसानसांतून इतकी वहात होती की,

आपण कुठे राहतो, कुठे खातो पितो याचा

काहीही फरक पडत नव्हता. देशासाठी काम

हाच एक विचार फक्त डोक्यात होता बस्स!

या गावांना सूत कातणाऱ्या कारागिरांना पिंजण व पेळू तयार करण्याचे, शिकविले.हे काम मी एक वर्षभर करत होतो. १९३८ साली माझी बदली विरदेल येथील खादी

कार्यालयाचा व्यवस्थापक म्हणून चरखा संघाने केली.विरदेल गावी १०० चरखे माझे हाताखाली देऊन त्याचा प्रसार शिंदखेडे,पाटण,भडणे, चिलाणे, दलवाडे इ. गावी केला.. मंडळी, किती निष्ठेने ह्या मंडळींनी वाहून घेतले होते! हो … ! स्वदेशी म्हणजे स्वदेशी …! गांधीजींनी सांगितलं … म्हणजे शब्द प्रमाण !

१४/१५ वर्ष वयाचा गरीब घरातला मुलगा

कसलीही पर्वा न करता देशक्रांतीत उतरतो

ही सामान्य वाटली तरी सामान्य गोष्ट नव्हती.

ह्या झपाटलेपणामुळेच सावरकर भगतसिंग,राजगुरू असे स्फुल्लिंग पेटले.

इंग्रजांना या देशभरातल्या तरूणांनी आपल्या

अततायी कारवायांनी जेरीस आणले.विष्णू

सारखा सामान्य घरातला मुलगा देशप्रेमाने

झपाटून बालवयातच देशकार्य करू लागतो

केवढे हे देशावरचे प्रेम ….!

 

आज आपण फक्त ते, टीका करत बसण्या ऐवजी टिकवून ठेवायचे आहे… एवढे जमले

तरी खूप आहे.. आपल्याला वाटते प्रत्येक

गोष्ट सरकारने करावी .. ? मग आम्ही काय

कामाचे आहोत ? हा प्रश्न प्रत्येक भारतीयाने

स्वत:ला विचारला पाहिजे . हे क्रांतिकारक

देशाला देत होते … घेत काहीच नव्हते ..

आपण देत काहीच नाही … सतत मागण्या

करत असतो … का करतो असे आपण ..?

 

 

विष्णूभाऊंनी पडेल ते नि मिळेल ते काम केले.

अमुक काम नको, असे ते म्हणालेच नाहीत..

आणि बरं का, तुम्हाला आश्चर्य वाटेल

स्वातंत्र्यानंतरही मी सातवीत / आठवीत असे पर्यंत (हिशोब करा वर्षांचा) अखंडपणे सुतकताईचे काम कापडण्यात, चरख्यावरती

चालू होते. मी पण त्या बायकांजवळ अधून मधून जाऊन बसत असे. व चरखा चालवायला

शिकत असे. सातवीला तर सुतकताई हा विषय आम्हाला परीक्षेलाच होता. परीक्षेत कापड विणुन (हातमागावर) दाखवावे लागायचे. इतका चरखा हा विषय त्या वेळी महत्वाचा होता.

 

(आम्ही कपाशीचा कचरा काढून, बाजारपेठेत

दुकानात सरकी काढायला जात असू .

तो सरकी काढलेला कापूस घरीच धनुकलीने

पिंजायचा, मग त्याचे लांब लांब पेळू बनवायचे

व चरख्यावर सुत कातायचे, हे सारे शाळेत

आम्ही शिकलो .)

संध्याकाळी बायका तयार सुताचे तागे घेऊन

येत. ते तराजूवर मोजून घ्यायचे. त्यांना पैसे

द्यायचे. काम मोठ्याप्रमाणात असल्यामुळे

चरखा शिकवायलाही माणसे नेमलेली होती.

कधी कधी अप्पा मला चिल्लरच्या गड्ड्या करायला ॲाफिसमध्ये घेऊन जात मग मी

त्यांना रूपया , पैसा , एक आणा , अशा गड्ड्या

करून देई ते त्यांना मोजायला सोपे पडे.

 

 

माणसाने कोणत्याही कामाला नाही म्हणू नये,

त्यामुळे माणूस अधिक अनुभव संपन्न होऊन या अनुभवांचा फायदा जीवनात त्याला नक्की कुठे न् कुठे होतो.(थोडं विषयांतर होईल पण…

या संदर्भातला इंग्लंड मधील एक अनुभव सांगते. १९९७ साली माझा मोठा मुलगा डॅा. अजय पवार , मानसरोग तज्ज्ञ , याला इंग्लंडचे

बोलावणे आले. अर्ज केलेला

होताच.फेब्रूवारीत तो सुनबाई सह गेला व मी १३ जून ९७ ला एकटी इंग्लंडला गेले .(आता मला आश्चर्य वाटते) मॅंचेस्टर विमानतळावर

घरमालकाची गाडी (त्यांचे नाव अजिज भाई)

(तेंव्हा अजयकडे गाडी असणे शक्यच नव्हते)

घेऊन तो मला घ्यायला आला. अर्थात गाडी

अजीज चालवत होते .

 

ह्या अजीज भाईंचीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. हे पाकिस्तानी मुसलमान गृहस्थ फार पूर्वी इंग्लंड मध्ये आले व स्थाईक झाले. असे खूप पाकिस्तानी व बांगलादेशी इंग्लंडमध्ये आहेत. शिक्षण शून्य. फक्त ड्रायव्हिंग येत होते. त्यावर त्यांनी उपजिविका सुरू केली. एक दिवस त्यांनीच दिलेल्या भाड्याच्या घरात (अजय रहात होता) काही खिळे ठोकायचे व दुरूस्तीचे काम निघाले व सुनबाईने त्यांना फोन केला. काही ही न शिकलेला हा माणूस उत्तम इंग्रजी बोलतो. आम्ही आपले तत .. पप…

आम्ही हिंदीतूनच त्यांच्याशी बोलत होतो.

फोन केल्याबरोबर दुरूस्तीसाठी लागणारा

अवजारांचा बॅाक्स घेऊन ते ताबडतोब आले व

फटाफट सारे काम चोखपणे त्यांनी करून टाकले . भारतात मी लगेच इलेक्ट्रिशियनला

फोन केला असता. पण नाही , इथला प्रत्येक

माणूस प्रत्येक काम करतो. सोफा दुरूस्ती पासून घरात कार्पेट टाकेपर्यंत कोणतेही काम

त्याच्याकडून करून घ्या.

 

फक्त ड्रायव्हिंगवर गुजारा करणाऱ्या माणसाची आज इंग्लंडमध्ये तीन घरे आहेत.वागायला अतिशय चांगला.सुसंस्कृत .मलाही जेवायला बोलावले होते. तर … मुद्दा हा होता की, माणसाने सारे शिकून घ्यावे. स्वत: केल्यामुळे अजिजचे पैसे तर वाचतातच , पण कुणावर अवलंबून रहावे लागत नाही व कामाच्या क्वालिटी(दर्जा) चाही प्रश्न रहात नाही . या संदर्भात आणखी एक किस्सा आठवला. थोर गायक पंडित भीमसेन जोशी यांची गाडी एकदा भर आडरानात बिघडली आणि त्यांना बराच त्रास झाला . त्यानंतर भिमसेन जोशींनी काय करावे .?

ते थेट एका गॅरेजमध्ये गेले नि १५ दिवसात

मोटारीचे सगळे काम शिकूनच घरी परतले. निश्चय असावा तर असा.. त्यानंतर

त्यांना प्रवासात कधी प्रश्नच आला नाही.

 

 

भाऊंनीही सगळ्या कामांचा अनुभव घेतला.

सगळे शिकून घेतले . त्यामुळे विश्वासाने नेमणूक होत होत ते वरच्या पदाकडे जात

राहिले. वरच्या माणसांचा विश्वास संपादन केला.अरे , हा पोरगा कामाचा दिसतो …!

काम कधीही वाया जात नाही. माणूस गुणांवर

प्रेम करतो कातडीवर नाही .. किंबहुना गुणांवरच प्रेम करावे. कामावरूनच माणसाची पारख करायला शिकले पाहिजे…..

तर .. चिलाणे दलवाडे इ. गावी चरख्याचा

प्रचार करून सुतकताई सुरू करून दोनशे चरख्यांवर सुतकताई व मालपूर गावी खादी

विणण्याचे काम सुरू केले.खादी उत्पत्तीही चालू होती. ही खादी धुळे येथे खादी भांडारात विकली जाई. मालपूरचे कन्हैयालालभाई यांचे खादी कशी तयार होते ? यावर लक्ष होते.१९४० साली दोंडायचे खादी भांडाराचे व्यवस्थापक म्हणून माझी बदली झाली. (आजकाल आपली बदली झाली की, आपण लगेच गळा काढतो).तेथे वर्षभर काम केले.

 

आणि १९४१ साली म.गांधींच्या सेवाग्रामच्या

आश्रमात विणकाम शिक्षक म्हणून माझी बदली झाली. ( वा… मंडळी… कापडणे … ते.. सेवाग्राम) . क्या बात है ..! येथे २५ विद्यार्थी होते. एक लक्षात घ्या ह्या सगळ्या खडतर कालखंडात, धडपडीच्या काळात माझी आई सतत त्यांच्या बरोबर होती .

 

राम राम…

जयहिंद.. जय महाराष्ट्र…

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा