You are currently viewing शब्देविण संवादू

शब्देविण संवादू

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री अंजली दीक्षित पंडित लिखित अप्रतिम लेख*

*शब्देविण संवादू*

एकमेकांशी तारा जुळलेल्या असल्या की ती दोघं अगदी समाधानी दिसतात. पुढच्या क्षणी तो काय म्हणणार आहे किंवा त्याला काय हवंय हे ओळखून चालणाऱ्या स्त्रिया खूप असतात कारण त्यांच्यावर संस्कारच तसे झालेले असतात. फक्त त्याचच नाही तर घरातल्या प्रत्येकाला काय हवंय काय नकोय हे त्यांनी सांगायच्या आधीच ओळखून त्या त्या गोष्टींची पूर्तता करण्यातच स्त्रियांच्या आयुष्याची इती कर्तव्यता असते असं मानलं जायचं. अशा गोष्टी त्यांच्यावर लहानपणापासून बिंबवलेल्या असायच्या. किंबहुना त्या आई आजी काकू मामी मावशी या सगळ्यांना तसं करतानाच पाहत लहानाच्या मोठ्या झालेल्या असायच्या आणि ते करताना त्या त्या कृतीत आनंद घेताना सुद्धा दिसायच्या. याला तारा जुळणं असं निश्चितच नाही म्हणता येणार. जेव्हा तोही तिच्याप्रमाणंच तिच्यासाठी तितकाच संवेदनशील असेल आणि ती पुढच्या वेळी काय म्हणेल, तिला काय हवंय नकोय हे बघून त्याप्रमाणे वागणारा असेल किंवा एखादी गोष्ट तिला आवडत नाही म्हटल्यावर ते न करणारा असेल तर आपण या तारा जुळलेल्या आहेत असं म्हणू शकतो. आयुष्य जगताना सहजपणे आपल्या पारड्यात हे दान पडलं असेल तर ही खूप खूप महत्वाची आणि सुंदर गोष्ट आहे.
जरुरी नसतं की प्रत्येक वेळीच आपण समोरच्याच्या प्रत्येक गोष्टीला तितक्याच उत्कटतेने प्रतिसाद दिला पाहिजे किंवा परिस्थितीनुसार देऊ शकतो, आणि या गोष्टीवरून लगेच नाराजी नाट्य सुरू व्हाव. पण कधीतरी एखाद्या निवांत क्षणी दोघंच बसलेले असताना त्या गोष्टीला आपण होऊन शब्दरूप दिलं आणि फक्त एवढच म्हटलं की नाही मला तुझ्या मनासारख त्यावेळी वागता आलं तरीही त्यात खूप समाधान सामावलेल असतं.
‘शब्देविण संवादू’ अस आपण ज्याला निर्विवादपणे म्हणू शकू असं नातं मिळणं आणि ते दोघांनीही तितक्याच आपुलकीच्या जाणिवेने सांभाळणं समृद्ध करण यापेक्षा सुंदर दुसरी कुठलीच कंपॅनियनशिप असू शकत नाही.
माझ्या एका मैत्रिणीचा नवरा ऑफिसला जाताना रोज काहीतरी घरात विसरून जायचा. कधी रुमाल विसरायचा, कधी गाडीच्या किल्ल्या विसरायचा, कधी पाकीटच विसरायचा, कधी डब्बाच विसरायचा असं काही ना काहीतरी रोजचं होतं.खाली दोन जिने उतरून गेट पर्यंत जायचा आणि मग त्याच्या लक्षात यायचं आणि तिथूनच जेव्हा तो वळून मागे बघायचा ना तेव्हा माझी मैत्रीण गॅलरीत उभी असायची; त्याची विसरलेली वस्तू घेऊन. मग तो पुन्हा वर जायचा अगदी हासत हासतच तीही छान पैकी दार उघडायची आणि त्याची वस्तू त्याला द्यायची. मग तिला जातानाच आठवण करता येत नव्हती का? की हे विसरले हे घेऊन जा म्हणून ? पण ती त्याला विसरु द्यायची आणि मग त्यांच्या नजरेतून त्यांच्या देहबोलीतून होणारा तो जो संवाद होता ना तो फुलत जायचा. हा संवाद निखालस सुंदर होता.. अजूनही आहे. जाणीवपूर्वक एकमेकांचा निरोप घेताना बाय करण्यासाठी काढून ठेवलेला वेळ म्हणता येईल त्याला, अतिशय रोमँटिक.
एखाद्या संध्याकाळी आपण छान पैकी जेवायला जातो. नेहमीसारखं जेवण तर छान होतंच पण येताना कॉर्नरपाशी गाडी थांबवून आपल्यासाठी मसाला पान घेऊन येणारा नवरा बघितला की त्या कळीचं केवढं मोठं फूल होऊ शकत हे तो अनुभव घेणार्यालाच माहिती.
दिवसभराच्या थकव्यानंतर एकमेकांचे हात पाय डोकं पाठ कंबर चेपून देणं हे काय फक्त कर्तव्य म्हणून किंवा करावं लागतं म्हणून करण्याच्या गोष्टी नाहीतच मुळी. त्या स्पर्शातून जी स्निग्धता आतपर्यंत पोहोचते त्यांनच माणूस ताजातवाना टवटवीत होऊन जातो. एकमेकांसाठी कष्ट करण्याची उभारी या मायेच्या स्पर्शातूनच मिळते. तीही कष्ट घेते त्याच्यासाठी, तो ही कष्ट घेतो तिच्यासाठी, ही जाणीव असणं आवश्यक. आणि ही जाणीव फक्त मनात ठेवून बऱ्याच वेळा भागत नाही. ती आपल्या कृतीतून कधी शब्दातून व्यक्त करत गेल तर ती पटकन पोहोचतेही आणि समोरच्याला वाटतं की आपली दखल घेतली जाते आहे. शेवटी आपण सगळे धडपडतो याचसाठी ना की आपली दखल घेतली जावी योग्य वेळी योग्य माणसाकडून.. तर काहीतरी नवीन जिद्दीनं करू शकू आपण? नाहीतर पैसा पद प्रतिष्ठा सर्वकाही असून सुद्धा दुर्मुखलेली माणसं आपण पाहतोच ना. काहीही कमी नसताना सुख आणि समाधान कशात मिळतं हेच न समजलेली कितीतरी व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजूला वावरत असतात. यामध्ये प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी तिसरी व्यक्ती कधीच जाऊ शकत नाही. ते प्रश्न, त्यांची उकल करणं यासाठी त्या दोघांचेच प्रयत्न आवश्यक आहेत.
कधीतरी अगदी शांत समुद्राच्या किनारी लाटां मागून येणाऱ्या लाटा बघत निवांत बसून राहावं.त्या अथांग समुद्राची गाज ऐकत ज्याच्या पोटात अगणित गुपित दडलेली असतात ती समजून घ्यायचा प्रयत्न करावा. नाहीत समजाणार काही गोष्टी पण प्रयत्न करायचा ऐकायचा. त्याच्या खाऱ्या वाऱ्याबरोबर आपल्या मनातले विचारही पोहोचवायचे आपल्या पार्टनर पाशी. बघितलय करून असं कधी? कुणीही काहीच बोलायचं नाही. फक्त शांत ठिकाणी समुद्राच्या लाटांचा आवाज आणि वाऱ्याचा आवाज, बस्स एवढंच. तरीही आपल्याला त्याच्या मनातले विचार कळायला लागतात आणि त्याला आपल्या मनातले. जर का असं कधी घडलं असेल ना तुमच्या बरोबर तर खरंच तुमच्या दोघांच्या तारा अगदी परफेक्ट जुळलेल्या आहेत नि:संशय! खूप सारं प्रेम, खूप सारी माया अगदी रीतं रीतं होईपर्यंत दुसऱ्याच्या झोळीत भरभरून टाकून द्यायची. मग पाहायचं नाही मागं की तो आपल्याला काय देतोय काय नाही. आपण फक्त देण्याचं काम करत राहायचं. नंतर एक क्षण असा येतो आयुष्यात की तुमची स्वतःची झोळी अगदी काठोकाठ भरून ओसंडून वाहत असते, कारण समोरच्यानंही देणाऱ्याचे हात घेतलेले असतात शेवटी. तोही त्याच्या झळीतलं दान भरभरून आपल्या झोळीत टाकून रीता झालेला असतो. खरंतर हे रीतं होणंच असतं भरून पावणं. खरै ना?

अंजली दीक्षित-पंडित
९८३४६७९५९६

प्रतिक्रिया व्यक्त करा