You are currently viewing द शो मस्ट गो ऑन

द शो मस्ट गो ऑन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*द शो मस्ट गो ऑन*

पुष्प चौथे 

*शीर्षक ~ आव्हान*

 

द शो मस्ट गो ऑन या सदरात आयुष्याचा खेळ चालत असताना जीवनाची अनेक अंगे आपण पहिल्या पुष्पात पाहिली. त्यातील

*Life is a challange, meet it, म्हणजेच जीवन हे एक आव्हान आहे, ते आनंदाने स्वीकारा या मदर टेरेसाने सांगितलेल्या अंगाचा सविस्तर विचार होणे मला गरजेचे वाटते.

जन्माला आल्यावर जगणे हे प्रत्येक सजीवापुढे फार मोठे आव्हान आहे.नवजात बालकालाही जगण्यासाठी आपले पोट कसे भरावे याची अक्कल जन्मतःच त्या विधात्याने दिली आहे.बालक रडून त्याला भूक लागल्याची सूचना देते आणि पोट भरले की शांतपणे झोपी जाते. काही दुखले खुपले तरी रडायचे हे एकच अत्यंत प्रभावी अस्त्र बाळाकडे असते, या अस्त्रानेच त्याला त्याची आव्हाने सहज पेलणे शक्य होते.

बालपण, तारूण्य आणि जरा हे जीवननाट्याचे तीन अंक आहेत.बालपणाचे मुख्यत्वे करून सहा/सात वर्षापर्यंतचे निष्पाप,निरागस आयुष्य आणि पुढे विद्यार्थीदशा असे दोन भाग करता येतील.

 

विद्यार्थीदशेत तर सर्वच विद्यार्थ्यांना किती आव्हानांना सामोरे जावे लागते. शाळा कॉलेजमधील परीक्षा, स्पर्धात्मक परीक्षा, या परीक्षेत उत्तम गुण मिळवून पुढे जाण्याची महत्त्वाकांक्षा. आजच्या पिढीतील मुलांना तर, आधीच्या पिढ्यांपेक्षा जास्तच तणाव आहे या आव्हानांचा! त्यात आई-वडिलांच्याही त्यांच्या पाल्यांकडून अपेक्षा वाढलेल्याच दिसतात. सर्वच क्षेत्रात माझा मुलगा/ मुलगी चमकले पाहिजेत अशा त्यांच्या अपेक्षा असतात, त्यांच्यासमोर आव्हानांचा ढीग पालकांनी ठेवलेला असतो. कित्येक मुलांना आई-वडील अटीही घालतात. ” तुला अमुक टक्के मार्क मिळाले नाहीत तर तुझे शिक्षण बंद किंवा तुला घरात प्रवेश नाही.” अशी आव्हाने ज्या मुलांना पेलवत नाहीत

त्या मुलांनी आई-वडिलांच्या भीतीने

आत्महत्या केल्याच्या बातम्या आपण किती वेळा वाचतो, ऐकतो. मी पास होणार नाही या भीतीने मुलाने निकाल कळायच्या आधीच स्वतःला संपवावे आणि रिझल्ट लागल्यानंतर त्याला फर्स्ट क्लास मिळालेला असावा अशीही अनेक उदाहरणे आहेत.

जीवनात आव्हाने जरूर असावीत, परंतु ती व्यक्तिमत्व घडविण्यासाठी, संपविण्यासाठी नक्कीच नव्हे.

बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या मैत्रिणीची मुलगी दुसऱ्या किंवा तिसऱ्या इयत्तेत शिकत असेल, म्हणजे आठ ते नऊ वर्षांची. हुशार, चुणचुणित, (खरं सांगायचं तर मैत्रिणीचं संपूर्ण कुटुंबच अतिशय बुद्धिमान.) तिचा वर्गात अर्थातच सतत पहिला क्रमांक असायचा. एकदा मात्र एका परीक्षेत तिचा नंबर दुसरा आला. सहाजिकच माझ्या मैत्रिणीने विचारले, “काय ग,यावेळी तुझा नंबर खाली का घसरला?” तिने आईला काय उत्तर द्यावे? “मग काय झालं? पहिला नंबर माझ्या मैत्रिणीचाच तर आला. तुला वाईट वाटू नये.” मला तिचे उत्तर फारच आवडले. आयुष्यात स्पर्धेत उतरण्यासाठी आव्हानं नक्कीच असावीत, पण ती पेलताना, असूया मत्सर, द्वेष कधीही नसावा. पालकांनी हे समजले पाहिजे. पहिला नंबर खाली गेला म्हणून पाल्याला कधी धाकदपटशा दाखवू नये. तेव्हाच मोठे होताना व्यक्तित्वाचा विकास सर्वांगीण होऊ शकतो.

एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या दोन भावंडांतही खूप फरक असू शकतो. एक भावंड अतिशय तीक्ष्ण बुद्धीचे तर दुसरे बेताचे असू शकते, पण म्हणून दोघात कधीही तुलना करू नये. सतत प्रोत्साहन देणे हे पालकांचे काम आहे. दोघांना त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे काम दिले तर दोघेही ते आनंदाने पार पाडतील आणि अशा प्रकारे त्यांच्यातील आत्मविश्वास वृद्धिंगत होईल, जो त्याला भविष्यात मोठेपणी उपयुक्त ठरेल.

तारूण्यात संसाराची जबाबदारी पार पाडताना समोर किती आव्हाने असतात? मला डिपार्टमेंटच्या परीक्षा

दिल्याच पाहिजेत, नाहीतर प्रमोशन मिळणार नाही, पगार वाढ होणार नाही. घरात वृद्ध आई आजारी आहे, तिचा औषध पाण्याचा खर्च कसा निभावणार? मुलांच्या मागण्या कशा पुरवणार? एक ना दोन!

स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्याचे प्रश्न आणखी निराळे. प्रतिस्पर्ध्याचे विक्रीचे भाव मला देता येत नाहीत, माझ्या मालाचा खप कसा व्हावा? काय उपाययोजना कराव्यात या आणि अशा चिंतेत एखादा बुडून गेलेला असतो. बाजारात आपली प्रतिमा टिकून राहण्यासाठी त्याची धडपड चालू असते. हे सर्व करताना कोणी आपल्याला फसवत तर नाही ना? यासाठीही सतर्क रहावे लागते आणि पुढ्यातील आव्हानांना पेलण्याचे सामर्थ्य अंगी बाळगावे लागते.

वृद्धत्व प्राप्त झाल्यानंतरच्या व्यथा अजूनच निराळ्या. सर्वच बाजूंनी आलेली शिथिलता मनाला त्रास देते.आपण आता काहीच करू शकत नाही म्हणून नैराश्यही येते. परंतु श्वास आहे तोपर्यंत मला आनंदाने जगायचे आहे, हा दृढ विश्वास कधी ढासळू देऊ नये.प्राप्त परिस्थितीत जगणे हे फार मोठे आव्हान आहे, ते स्वीकारलेच पाहिजे.

उमेद सोडली नाही तर मार्ग नक्कीच सापडतो.परमेश्वराचे चिंतन केले तर तोच पुढचा मार्ग दाखवतो.

आव्हानांवाचून जीवन नाही. संन्याशाची मुले म्हणून ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांना तत्कालीन समाजाचा किती रोष पत्करावा लागला? परंतु तीच भावंडे त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आज सातशे वर्षानंतरही आपल्याला परमेश्वराच्या ठिकाणी वंदनीय आहेत.

भर सभेत द्रौपदीची अवहेलना झाल्यानंतर तिने तिच्या मोकळ्या सोडलेल्या केसांची वेणी दुःशासनाच्या रक्तानेच घालण्याची प्रतिज्ञा केली हे केवढे मोठे आव्हान!

प्रभू रामचंद्रांना चौदा वर्षे वनवासाचे आव्हान स्वीकारावे लागले. ते त्यांनी आनंदाने स्वीकारले आणि रावणाची हत्या करून पारही पाडले.

थोडक्यात माणसाचं जीवन हेच एक मोठे आव्हान आहे. ते न डगमगता प्रत्येकाने जपून पावले टाकत पेलले पाहिजे, कोणत्याही प्रकारचा पळपुटेपणा नको. जेथे देवांना आव्हाने सुटली नाहीत,तेथे आम्हा सामान्य माणसांची काय कथा?एक मात्र नक्की सांगेन

*मन सुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची*

*तू चाल पुढं तुलाा रं गड्या भीति कशाची पर्वा बी कुनाची*

( क्रमशः)

 

अरुणा मुल्हेरकर

मिशिगन

प्रतिक्रिया व्यक्त करा