माणगाव येथे भीषण अपघातात चार गंभीर
महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच
मुंबई – गोवा महामार्गावरील माणगाव बायपासचे काम रखडल्याने वाहन चालकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे दिवसागणिक महामार्गावर अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भयावह अपघाताची दृष्य नेहमीच पहायला मिळत आहेत. ६ रोजी रात्री ११:१५ ते ११:३० च्या दरम्यान दोन मोटारी मध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून यामध्ये दोन्ही मोटारींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची माहिती घटनास्थळावरून प्राप्त झाली आहे.
हा अपघात माणगाव बाजारपेठेलगत एकता पेट्रोल पंपाच्या अलीकडे व मोतीराम प्लाझाच्या समोरील वळणावर घडला. या अपघात एक्सएल सिक्स कार व वॅगनर कार यांच्यामध्ये घडला आहे. अपघाताची भयावहता इतकी होती की यामध्ये दोन्ही कारचा अक्षरशः चुराडा झाला. यामध्ये गुहागरवरून मुंबईकडे जाणारी वॅगनर कार (क्र. एमएच ०१ सीआर ३५५३) व मुंबई कडून खेडकडे जाणारी मारूती नेक्सा गाडी एक्सएल सिक्स (क्र. एमएच ०८ एएक्स ६०६८) या गाड्यांमध्ये हा अपघात घडला. दोन्ही गाड्यांमध्ये चालका सहित ४-४ असे एकूण ८ प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये मुंबईकडून खेडकडे जाणाऱ्या एक्सएल सिक्स कारमध्ये चालक निलेश जोगळे, प्रवासी महिला अनिता गिल्डा, स्मिता बुटाला, वर्षा चिंडक (सर्व रा. खेड, जि. रत्नागिरी) तर गुहागरकडून मुंबईकडे जाणारी वॅगनर कारमधील कुटुंब चालक विकास भागवत, ज्योती भागवत, ऋग्वेद भागवत, चार्वी भागवत (सर्व रा. गुहागर व सध्या रा. मुंबई) अश्या ८ जणांचा समावेश आहे. या अपघातात व्हॅगनार कार मधील ४ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आलेले आहे. तर खेड येथील चार प्रवाशांवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची घटना समजताच माणगाव शहरातील स्थानिक युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. माणगाव पोलिस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. शि. भारत वामन, पो. शि. पिंपळे, यश गालिंदे व गृहरक्षक जवान यांनी स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना घटनास्थळावरून रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून पुढील तपास माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव हे करीत आहेत.