आपत्ती व्यवस्थापनामार्फत १५ डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन
- विद्यार्थ्यांना बचाव कार्य प्रशिक्षण
- NDRF चे 20 जणांचे पथक दाखल
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्गच्या सहकार्याने NDRF पथकामार्फत १५ डिसेंबरपर्यंत शाळा सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम आणि समुदाय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (NDRF) पुणे यांच्या २० जणांचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे.
या पथकामार्फत मालवण तालुक्यातील टोपीवाला हायस्कूल मालवण, राणी पार्वतीदेवी हायस्कूल अॅण्ड ज्यू. कॉलेज सावंतवाडी, शिवाजी इंग्लिश स्कूल व ज्यू. कॉलेज पणदूर येथे शालेय सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा १ हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अग्नी सुरक्षा, प्रथमोपचार, पाण्यातील बचाव कार्य इ.बाबत प्रात्याक्षिके दाखविण्यात आली. तसेच शाळेत आग लागल्यास किंवा भूकंप झाल्यास वर्गातील विद्यार्थ्यांना शिस्तबद्धरित्या शाळांतून बाहेर कसे काढावे याबाबतची रंगीत तालीम शाळांमध्ये घेण्यात आली. सर्व प्रशिक्षण कार्यक्रमात शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
समुदाय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत वेंगुर्ला मुठ बंदर येथे मच्छिमार यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. मालवण बंदर जेट्टी येथे मच्छिमार व जलक्रीडा व्यावसायिकांसाठी प्रादेशिक बंदर अधिकारी, यांच्या सहकार्याने पाण्यातील बचाव कार्याची माहिती देणारे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण NDRF पथकामार्फत आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा एकूण ६७ मच्छिमार व जलक्रीडा व्यावसायिकांनी लाभ घेतला. प्रशिक्षणात पाण्यातील बचाव कार्य, प्रथमोपचार, CPR इ.बाबत प्रशिक्षण देण्यात आले. वरील सर्व प्रशिक्षणास संबंधित तालुक्याचे तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते