*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*सौंदर्य म्हणजे काय ?*
एक चित्रकार मनलावून एक चित्र काढत होता.
बराच वेळ लोकांना कळत नव्हतं की तो नक्की
काय चितारतो आहे. लोकांची उत्सुकता वाढीस
लागली होती. तो मात्र एकाग्र होता. बघता बघता चित्र आकाराला येऊ लागले नि पूर्णही
झाले. ते होते एका भिकारणीचे चित्र.
लोक म्हणाले “ वाह रे वा! काय सुंदर चित्र
आहे! मंडळी , यातली भिकारीण सुंदर होती का? नाही. पण चित्रकाराने ज्या कौशल्याने
तिला जशीच्या तशी उभी केली होती त्या त्याच्या हातांना तो सलाम होता.म्हणजे पहा
चित्रकाराने काढलेला गुलाब सुंदर असतोच
पण भिकारीणही सुंदर असते. सौंदर्य हे बघणाऱ्याच्या डोळ्यात असते, वस्तूत नसते.
आपण आपल्या घरातील छोट्या नग्न बाळाला
आनंदाने अंगाखांद्यावर मिरवतो. ते हसरं सुंदर
बाळ नग्न आहे हे कधीतरी तुमच्या मनात येतं? नाही, कारण तुमची दृष्टी साफ असते, पूर्वग्रह
दूषित नसते.म्हणून त्याची नग्नता मनात सुद्धा
येत नाही. आपल्या मनावर खूप काही अवलंबून
असते. खरेतर सौंदर्य बघणाऱ्याच्या दृष्टीतच
असते.
आमच्या कॅालेज मधल्या प्राध्यापक जोडीच्या
लहान मुलाचे लग्न झाले. घरी अगदी छोटेखानी
समारंभ ठेवला होता व अगदी मोजक्याच लोकांना जेवायला बोलावले होते. मुलगा हायली क्वालिफाईड, मोठ्या पगारावर नोकरीला होता. आम्ही गेलो. बफे होतं. माझी
नजर वधूला शोधत होती पण तत्सम मला तिथे कोणीही दिसेना. मी आमच्या साहेबांना विचारले. त्यांना ही कळेना. थोड्या वेळाने
यजमानांनीच वधूला सामोरी आणली, जी तिथेच होती, तिला पाहून मला प्रचंड धक्का
बसला. अगदी आदिवासी शोभावी( आदिवासीतही सौंदर्य असते) अशी ती
वधू पाहून सारेच हबचक झाले होते. पण दाखवू
ही शकत नव्हते. आईवडील हैराण होते पण प्रेमापुढे करणार काय? मुलगा मात्र अगदी राजबिंडा हो! थोडक्यात, कुणाला कशात सौंदर्य
दिसेल काही सांगता येत नाही. व्यक्ति तितक्या
प्रवृत्ती हेच खरे.
आमची रासेगांवला झोपडी आहे. लोक म्हणाले,
बंगला बांधा. म्हटले, नाशिकला बंगल्यातच राहतो की? इथे कॅांक्रिट कशाला? आभाळाला
स्पर्श करणाऱ्या गर्द झाडांच्या राईत ती हिरवीकंच झोपडी अशी काही सुंदर दिसते की
विचारू नका. बाजूला झुलता झोपाळा, समोरच
मोठा पारिजात, डोक्यापार वाढलेले आंबे, निळ्या नभाशी स्पर्धा करणारे कदंब, साग, वड,
सिल्व्हर ओक वारे वा.. नजर ठरत नाही हो त्या
फार्महाऊसवर.. आणि संध्याकाळी टेकडीवर
एकाच वेळी मावळतीला जाणारा सूर्य आणि
दिमाखात उदयाला येणारा, दुधाळ किरणांनी
न्हाऊ घालणारा चंद्र पाहताच स्वर्ग खाली अवतरल्याचा भास होतो.कदाचित ह्यात काय
सौंदर्य आहे? असे म्हणणारे महाभागही सापडतील यात काय आश्चर्य?…
एखाद्याचं सुंदर कोरीव देखणे हस्ताक्षर पाहिले
की हेवा वाटतो आपल्याला. सहज म्हणतो आपण, वा.. काय सुंदर अक्षर आहे हो?
एखाद्या महालाची पायरी चढणारी, चापूनचोपून नऊवार नेसलेली, अंबाड्यावर गजरा माळलेली,
पैंजण मासोळ्या, कमरपट्टा ल्यालेली सुंदरी ही
लक्ष वेधून घेतेच. कुण्या सरदाराची नार आहे बरे
ही? मनात येतेच.आमचे ड्रॅाईंचे वाणी सर मी पहिल्याच बेंचवर असल्यामुळे वर्गात फिरता फिरता माझ्या कागदावर मांजर एवढी जिवंत
काढत की वाटे ही कागदावरून आता उडीच
मारणार. माझ्या एका क्लासमेटचे अक्षर एवढे
मोती होते की,सारे व्याकरण पातळ तावांवर
त्याच्या हस्ताक्षरात उतरले होते.मला तर भर
पावसात डोक्यावर इरली घेऊन चिखलभऱ्या
शेतात भाताची लावणी करणाऱ्या त्या आदिवासी स्त्रिया व ती हिरवीगार छोटी छोटी
भाताची खाचरं फार आवडतात.
सौंदर्य तुमच्या दृष्टीत आहे हो.. नाही तर मग
काश्मिरचे गोंडुला काय, चिनार काय, शिकाऱ्यातला मुक्काम काय, दलसरोवरातील
कमले व बाजारपेठ काय? तुम्हाला काहीच
सुंदर दिसणार नाही. आस्वादक वृत्ती असेल तर
दिल्लीच्या भयंकर धुक्यात तुम्हाला आग्र्याचा
किल्ला हलूच देणार नाही. फत्तेपूर शिक्रीतून
तुमचा पायच निघणार नाही व जयपूरचा हवामहल माझा का नाही असे ही क्षणभर वाटून
गेले तर आश्चर्य नाही.म्हणतात ना..” जशी दृष्टी
तशी सृष्टी”. तुम्ही चष्मा कोणता लावता यावर
बरेच काही ठरते.मला तर दारात कुंडीत आलेली
दोन चिनीगुलाबाची लालचुटुक फुले व पहाटे आंब्यावर बोलणारा बुलबुल दोन्ही मोह घालतात.
सौंदर्य शोधावे लागत नाही, ते नजरेत लगेच
भरते. हवी फ…क्त… दृष्टी!
बरंय् मंडळीं.. राम राम.
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)