शशिकांत पेडणेकर यांचे अचानक निघून जाणे हे केवळ एक या व्यक्तीचे जाणे नाही तर शेकडो कुटुंबे निराधार झाल्यासारखे आहे-शैलेश नाईक
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने वाहिली श्रद्धांजली.
सावंतवाडी
काल सायंकाळी अचानक आमच्या सामाजिक बांधिलकीचे रवी जाधवने पेडणेकर साहेबांच्या मृत्यूची पाठवलेली बातमी वाचून धक्का बसला. गलबलून आले, त्यांच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण डोळ्यासमोर तरळून गेले.मरण म्हणजे निव्वळ जैवरासायनिक प्रक्रिया आहे असे जरी म्हटले तरी किंवा प्रत्येकाला मृत्यू नावाच्या अंतिम सत्याला सामोरे जायचेच आहे असे म्हटले तरी, आपल्या जिवलग व्यक्तीचे मरण चटकन आपल्याला स्वीकारता येत नाही हेच खरे. कारण समोरची व्यक्ती दीर्घकाळ आपल्या सहवासात असणार आहे हे मनी निश्चित करूनच भविष्यातील योजना आपण आखलेल्या असतात. लाखो स्मृतींचे धागे आपण विणत गेलेले असतो. चिरस्थायी मैत्रीचे विणलेले धागे मृत्यूच्या आघाताने अचानक तुटून जातात तेव्हा जीवाभावाच्या माणसाला गमावल्याच्या दुःखाने अवसान गळून जाते आणि शक्तिपात झाल्यासारखे वाटते. पण मृत्यू शाश्वत आहे ते अंतिम सत्य आहे.
आमचे परममित्र *शशिकांत पेडणेकर* यांचे अचानक निघून जाणे हे केवळ एक या व्यक्तीचे जाणे नाही. शेकडो कुटुंबे निराधार झाल्यासारखे आहे. केवळ कमाई ,पैसा हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कधीच व्यवसाय केला नाही. शेकडो राजकीय व्यक्तींशी त्यांचे सलोख्याचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते परंतु, राजकारणापासून त्यांनी स्वतःला अलिप्त ठेवलं. आपल्या सभ्य, सालस, सोज्वळ आणि सुसंस्कृत प्रतिमेला धक्का लागेल असे वर्तन त्यांच्या हातून कधी घडलं नाही. बालपणी अतिशय गरिबीचे चटके सहन करत परिस्थितीशी झुंज देत दारिद्र्यातून आलेला हा एक योद्धा होता. त्यामुळेच त्यांना गोरगरिबांबद्दल कळवळा होता. निरवडे येथे त्यांनी साकारलेल्या सिल्वर एकर प्रोजेक्ट मधून मिळालेल्या नफ्यामधून त्यांनी सुंदर अशा वृद्धाश्रमाची निर्मिती केली आणि ही इमारत त्यांनी दान म्हणून दिली. त्यांच्याजवळ गेलेली प्रत्येक व्यक्ती ही कधी रिकाम्या हाताने परतलीच नाही. गोरगरीब आणि अपंगांच्या मदतीसाठी त्यांचा हात नेहमीच पुढे असायचा. दूरदृष्टी आणि कठोर परिश्रम हे त्यांचे जीवनाचे ब्रीद होते. त्यांच्या अचानक जाण्याने आमच्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला जबरदस्त धक्का बसला आहे. आमच्या परिवारातील एक खंदा बुरुज अचानक ढासळला आहे. अगदी मर्यादित काळासाठी ते आमच्या सोबत जोडले गेले परंतु कधी विसरता येणार नाही अशी छाप सोडून गेले.
_अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती….!_
त्यांच्या पवित्र आत्म्याला चिरशांती लाभो पेडणेकर कुटुंबीयांवर कोसळलेल्या या संकटात सावरण्याचं बळ त्यांना देवो अशी सर्व शक्तिमान परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.