You are currently viewing जिमखाना मैदान खेळपट्टीसह १५ दिवसांत उपलब्ध करून देणार – मुख्याधिकारी सागर साळुंखे 

जिमखाना मैदान खेळपट्टीसह १५ दिवसांत उपलब्ध करून देणार – मुख्याधिकारी सागर साळुंखे 

जिमखाना मैदान खेळपट्टीसह १५ दिवसांत उपलब्ध करून देणार – मुख्याधिकारी सागर साळुंखे

ॲड. परिमल नाईक यांच्यासह शिष्टमंडळाने केली मागणी

सावंतवाडी

सावंतवाडी जिमखाना मैदानाच्या दुरावस्थेबाबत सावंतवाडी नगर परिषदेचे माजी क्रीडा सभापती ॲड. परिमल नाईक यांनी आवाज उठविला होता. मैदानाची खेळपट्टी तसेच मैदानाचे रखडलेले सपाटीकरण याबाबत आवाज उठवितानाच त्याबाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास क्रिके प्रमी व अन्य क्रीडा प्रेमींच्या माध्यमातून नगरपरिषदेवर मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

 

 

दरम्यान, या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या दालनात मैदानविषयक भेडसावणाऱ्या विविध मुद्द्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी
येत्या पंधरा ते वीस दिवसात सर्व अडथळे दूर करून प्राधान्याने खेळपट्टीसह मैदान खेळण्यासाठी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही मुख्याधिकारी यांनी दिली. यावेळी ॲड. परिमल नाईक यांच्या समवेत जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी बाळ चोडणकर, राजन नाईक, बाबल्या दुभाषी यांच्या सहित क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदान हे एतिहासिक मैदान असून या मैदानाने असंख्य क्रिकेट पटू घडवले आहेत. जगप्रसिद्ध क्रिकेटपटू व क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासह माजी कसोटीपटू विनोद कांबळी, प्रवीण आमरे, समीर दिघे यांच्यासह भारतीय संघातील अनेक नामवंत खेळाडू या मैदानावर खेळून गेले आहेत.

 

 

निखील नाईक यासारखे अनेक स्थानिक खेळाडू देखील याच मैदानावर धडे घेऊन नावारुपास आले आहेत.
असे असताना ज्या मैदानाने राज्याला अनेक खेळाडू दिले असे मैदान आज दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्यामुळे आजीमाजी क्रिकेटपटूंसह प्रशिक्षकांनी देखील याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांचाच आवाज ॲड. परिमल नाईक यांनी नगरपरिषद प्रशासनाच्या कानी घातला होता.
प्रशासनाची अनास्था बेजबाबदारपणा व असंवेदनशीलता या बाबी अतिशय चिंताजनक आहेत. सदर मैदानावर देखभाली करिता लाखो रुपये खर्च केले जातात व त्या खर्चाचा प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष रित्या सहजासहजी अपव्यय होत असून जनतेच्या पैशाची पायमल्ली करण्यासारखा हा प्रकार आहे.

 

 

दरम्यान, केवळ क्रीडा या विषयासाठी असलेले हे मैदान नगरपरिषद प्रशासन खाजगी कार्यक्रमांना भाड्याने दिल्याने सदर मैदानाची दूरावस्था झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने भविष्यात खाजगी कार्यक्रमांसाठी मैदान भाड्याने देऊ नये अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती.
तसेच येत्या पंधरा दिवसात जिमखाना मैदान सुस्थितीत उपलब्ध करून न दिल्यास शहरातील सर्व क्रिकेट प्रेमीसह युवावर्ग यांच्या समवेत नगरपरिषदेवर नागरी मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देखील माजी क्रीडा सभापती ॲड. परिमल नाईक यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत येत्या १५ दिवसात मैदान उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही दिली असल्याची माहिती ॲड. परिमल नाईक यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा