*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा स्वप्नगंधा सतिश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मी स्वप्न स्वप्न झाले*
मी स्वप्न स्वप्न झाले
मी मनी डोकावून आले
मज काही न उमगले
न मी मम मना समजले
जागेपणी मी स्वप्नाळले
निजेत जागी कां जाहले?
न कळे मनी काय आले?
वेड्या या मनाला
कशी साद घालू?
न सावरता ये मलाही
कुठे आवरून ठेवू?
कधी भरकटते उगा
मिरवीत स्वप्नांच्या ढगा
मला दाखवित ठेंगा
फिरुन साद घाली उगा।
कंटाळले मी मनाच्या
अवखळ वागण्याला
रुसले मी की, येई
येई उगा हसवायला
मलाच सांगे काही बाही
उमजून कां घेत नाही?
मी रागावता मला समजवे
बट्टी करीत मज बोलावे
स्वप्नकळ्यांना उमलवित
मला सुगंधकुपी देत सांगे
ओंजळीत माझ्या मोहरून
आज मी आले गे बहरून
अन् मी बावरी गहिवरून
साठलेली स्वप्ने नयनी उतरवून
आनंदाच्या वर्षावात न्हाऊन!
मनमयुर कधी नाचे मनात
सप्तरंगी इंद्रधनू मनाकाशात
सुखावते प्रेम वर्षावात
स्वतःशी लाजता कळते
हा खेळ भुलवित्या मनाचा
आभास हा स्वप्निल मनाचा
जेंव्हा मनास जाग येई
प्रचिती सत्य दर्पणाचा!
भरकटल्या मनास थांबवावे
मनावरचे दडपण दूर सारावे
नको उगा या खेळास खेळावे
सुंदरस्म़ृतीस जपत गंधावे
हृदयाच्या कप्प्यात साठवावे
मनाला खुशाल फिरू द्यावे
दुःखलहरींस दूर लोटून द्यावे
मनमौजी पांखरास उडू द्यावे।
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
मुंबई विरार