मध्यस्थामार्फत प्रकरणे निकाली काढण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात “मध्यस्थ कक्षाची” स्थापना करण्यात आलेली असून या आयोगाकडे सद्यिस्थितीत एकूण 05 प्रशिक्षित मध्यस्थ कार्यरत आहेत. तक्रारदार व विरुध्द पक्ष या दोघांच्यात सामंजस्याने तडजोड घडवून आणण्याचे महत्त्वाचे काम या मध्यस्थांमार्फत करण्यात येते. गुंतागुंतीची व क्लिष्ट स्वरुपाची प्रकरणे या मध्यस्थांमार्फत अतिशय सफाईदारपणे सोडविली जात असल्याची माहिती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रबंधक यांनी दिली आहे.
जिल्हा ग्राहक आयोगामध्ये तक्रारदाराने अर्ज क्र. 6/2024 दाखल केला होता. तक्रारदाराने बिल्डरकडील कणकवली येथील अपार्टमेंट मध्ये सदनिका बुक केली होती. त्यासाठी त्यांनी बिल्डरला रक्कमही अदा केली होती. परंतु बिल्डरने तक्रारदाराला साठेखत पूर्ण करुन दिलेले नव्हते. सदनिकेचा ताबाही दिलेला नव्हता अगर त्याची रक्कमही परत केली नव्हती, त्यामुळे तक्रारदारने या जिल्हा आयोगाकडे तक्रार अर्ज दाखल केला होता.
सदरचे प्रकरण जिल्हा आयोगाने सिंधुदुर्गातील जेष्ठ व नामांकीत विधिज्ञ एस. एन. भणगे यांच्याकडे मध्यस्थीसाठी सोपविले होते. या प्रकरणात ‘मध्यस्थ म्हणून जेष्ठ व नामांकीत विधिज्ञ एस.एन. भणगे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. माहे सप्टेंबर 2024 मध्ये एस. एन. भगणे यानी यशस्वी मध्यस्थी केलेली असून सदरचे प्रकरण हे या जिल्हा आयोगाकडील मध्यस्थामार्फत निकाली होणारे पहिलेच प्रकरण आहे. तक्रारदार आणि बिल्डर यांच्या परस्पर समजुतीने आणि संमतीने तडजोडनामा तयार करण्यात आला. तक्रारदाराला त्यांची रक्कम बिल्डरकडून परत मिळाली. अतिशय कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेत दोन्ही पक्षकारांना न्याय मिळाला त्याबाबत संबंधित पक्षकार व जेष्ठ व नामांकीत विधिज्ञ एस.एन.भणगे यांचा जिल्हा आयोगाच्या अध्यक्षा इंदुमती मलुष्टे व सदस्य योगेश खाडिलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या जिल्हा आयोगाकडील प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांमधील संबंधित पक्षकार यांना आवाहन करण्यात येते आहे की, आपणसुध्दा आपल्या प्रकरणामध्ये मध्यस्थाची नेमणूक करुन आपली प्रकरणे लवकरात लवकर निकाली होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा आयोगामार्फत करण्यात येत आहे.