You are currently viewing माणुसकीचा झरा : बबनदादा मेटकर 

माणुसकीचा झरा : बबनदादा मेटकर 

3 डिसेंबर जयंतीनिमित्त तत्कालीन राष्ट्रपती महामहीम श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे सहकारी व माजी आमदार श्री बबन मेटकर यांच्या जयंतीनिमित्त.

 

माणुसकीचा झरा : बबनदादा मेटकर 

 

श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात गाडगे महाराजांच्या नावाने अध्यासन आहे. या अध्यासनाचे प्रमुख म्हणून श्री बबनराव मेटकर यांनी काम केले. शासकीय नियमानुसार त्यांना चांगले पैसे मिळू शकले असते. पण ते त्यांनी नाकारले आणि महिन्याला फक्त ते एक रुपया मानधन घेऊन गाडगे महाराजांचा खरा वारसा पुढे चालवीत राहिले. आज बबनराव मेटकर आपल्यामध्ये नाहीत. पण त्यांनी आमदार म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे अध्यासनाचे प्रमुख म्हणून अमरावतीच्या भारतीय महाविद्यालयाचे कार्यकारिणीचे सदस्य म्हणून आणि एक माणूस म्हणून जे काम केलेले आहे ते शब्दातीत आहे.

दैनिक हिंदुस्थानचे संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी श्री बाळासाहेब मराठे यांचे आणि बबनराव दादांचे ऋणानुबंध खूप निकटतम होते. आणि म्हणूनच जेव्हा बबनराव दादांचे लग्न ठरले तेव्हा त्यांनी याला त्याला न बोलता सरळ लग्न लावण्यासाठी त्यांनी चक्क दैनिक हिंदुस्थानचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी श्री बाळासाहेब मराठे यांना निमंत्रित केले. एका संपादकाच्या व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाच्या हातून त्यांनी आपला आगळा वेगळा विवाह समारोह घडवून आणला.

अमरावतीच्या काँग्रेसनगरमध्ये महामहिम राष्ट्रपती राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे घर आहे. त्यांच्याच ओळीमध्ये माजी राज्यपाल श्री रा सू गवई यांच्या शेजारी श्री बबनराव मेटकर यांचे घर आहे. हे घर खऱ्या अर्थाने बबनराव दादा असताना सामाजिक चळवळीचे केंद्र होते. माझा त्यांचा परिचय खूप जुना. प्राचार्य अण्णासाहेब वैद्य प्राचार्य बाळासाहेब कुलकर्णी बाबासाहेब सोमवंशी बबनराव मेटकर यांच्याबरोबर काम करण्याचा खूप अनुभव माझ्या गाठीशी आहे. आमदार प्रा. बी टी देशमुख यांचे नुटाची सगळी कामे आमच्या भारतीय महाविद्यालयातून चालायची. प्रा. बी टी देशमुख हे तेव्हा नुटाचे अध्यक्ष होते. तेव्हा नुटाने आपले कार्यालय स्थापन करावयाचे होते. नुटाचे जिल्हास्तरीय कार्यक्रम असो सभा असो की राज्यस्तरीय सभा असो. ही आमच्या भारतीय महाविद्यालयामध्येच होत होती.त्या कामांमध्ये प्राचार्य अण्णासाहेब वैद्य प्राचार्य श्रीधर चिंचमलातपुरे बबनराव मेटकर प्राचार्य बाळासाहेब कुलकर्णी आमदार बाबासाहेब सोमवंशी यांचा पुढाकार राहायचा. नूटा बुलेटीनच्या वितरणाचे काम काही काळ माझ्याकडे होते. हे काम करताना मध्यरात्र केव्हा होऊन जायची ते कळायचे नाही.

बबनदादांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असल्याने ते नेहमी प्रसन्नचित्त दिसायचे. त्यांच्याकडे कोणी गेला आणि काम झालेले असे कधी झाले नाही आणि तो माणूस कधी रिकाम्या हाताने परतही गेला नाही. आमच्या अमरावतीच्या पद्मश्री दाजीसाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या तपोवनमध्ये बबनदादांचा राबता होता. आमच्या तपोवनात भारत नकाशे नावाचा अनाथ विद्यार्थी होता. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील राष्ट्रीय विद्यालयामध्ये अध्यापकाची जागा निघाली. तिथले मुख्याध्यापक भन्साळी हे बबनदादांचे मित्र. मी बबन दादा जवळ शब्द टाकला. एक रुपये खर्च न करता भारतला तिथे अध्यापकाची नोकरी मिळाली.

श्री बाबासाहेब सोमवंशी आमदार पदासाठी उभे होते. मी तेव्हा धामणगाव रेल्वे येथील आदर्श महाविद्यालयामध्ये मराठीचा प्राध्यापक म्हणून कार्यरत होतो. धामणगाववरून आल्यानंतर मी मध्यरात्रीपर्यंत अण्णासाहेब वैद्य बबन मेटकर बाबासाहेब सोमवंशी या सर्वांबरोबर निवडणुकीची प्रसिद्धीची कामे करायचा. आमदार बाबासाहेब सोमवंशी यांची प्रसिद्धीची जबाबदारी बबनराव मिटकर यांनी माझ्यावर सोपवली होती. बाबासाहेब सोमवंशी तेव्हा शिक्षक मतदार संघातून आमदार म्हणून फक्त 36 मतांनी निवडून आले. निवडणुकीनंतर आमची जी कौटुंबिक सभा झाली सभा झाली. त्यामध्ये मी न मागताही मला बाळासाहेब कुलकर्णी यांच्या सौभाग्यवती सेवानिवृत्त झाल्यानंतर भारतीय महाविद्यालयामध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून घेण्याची ठरले. प्रत्यक्ष जेव्हा कुलकर्णी सेवानिवृत्त झाल्या आणि वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात आल्या.अमरावती शहरातील भारतीय महाविद्यालय हे प्रतिष्ठित महाविद्यालय आहे .या जागेसाठी भरपूर अर्ज आले. लोकांनी ओळखी पाळखी काढल्या. बबनराव दादांकडे देखील महानुभाव पंथातील आमची मराठीत एम ए असलेली मैत्रीण गेली. बबनराव दादांनी तिला चक्क सांगितले की आम्ही काठोलेना घ्यायचे ठरवले आहे.. ती म्हणाली काठोळे तर धामणगावच्या कॉलेजमध्ये आहेत. दादांनी स्पष्ट सांगितले आम्ही त्यांना अमरावतीला आणणार आहोत .आमच्या महाविद्यालयामध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून घेणार आहोत. त्या माझ्या मैत्रिणींने तिला घेण्यासाठी खूप आग्रह धरला. बबनराव दादा महानुभाव पंथाचेर. ती पण पंथीय होती. पण बबनदादांनी नम्रपणे नकार दिला.

रोज सकाळी दादा फिरायला जायचे. एक वेळ फिरायला गेले असताना त्यांना एक कुष्ठरोगी रस्त्यात दिसला. दादा घरी आले. गाडी काढली. त्या कुष्ठरोग्याला गाडीमध्ये बसवले. आणि त्याला घेऊन श्री शिवाजीराव पटवर्धन यांच्या तपोवन या कुष्ठधामात घेऊन आले व तिथे त्याचा प्रवेश करून दिला. तो काळ असा होता की त्या काळात कुष्ठरोग हा अतिशय गंभीर आजार समजला जात होता. तपोवनत रिक्षावाला देखील जायला तयार नसायचा. अशा काळात त्या महारोगी रुग्णा जवळ जाऊन त्याला गाडीत बसवून तपोवनात घेऊन येणारा बबनदादा सारखा माणूस निराळाच.

अण्णासाहेब वैद्य बाळासाहेब कुलकर्णी बबनदादा मेटकर बाबासाहेब सोमवंशी ही मंडळी जरी भारतीय महाविद्यालयाची कार्यकारणी सदस्य होते आणि मी जरी प्राध्यापक होतो. तरी आमच्या सर्वांचे नाते एका कुटुंबाप्रमाणे होते.

एक वर्ष नागपूर आकाशवाणीचे श्री बबन नाखले हे अमरावतीला आले होते. मी त्यांना घेऊन बबन दादांकडे गेलो. आमची चर्चा झाली. मी जायला निघालो. दादा म्हणाले जेवण करून जा. तो दिवस कुठल्यातरी सणाचा होता. पण दादांकडे पुरणपोळ्या केलेल्या होत्या. आम्हाला त्यांनी जेवण करूनच पाठवले.

भारताच्या माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्या जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात होत्या. तेव्हा त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली. या काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी त्यांनी श्री बबन दादा मेटकर यांची नियुक्ती केली. एवढा त्यांचा बबनदादावर विश्वास.

बबनदादांबरोबरच त्यांच्या पत्नी विद्यालक्ष्मी. चिरंजीव यदुराज कन्या मंजू व राजश्री यांच्यामध्ये बबनरावदादांचा सेवाभाव नकळत उतरला आहे. बबनराव नसताना त्यांच्या अनुपस्थित आपण त्यांच्या घरी गेलात तरी योग्य आदरतीथ्य ठेवायचे. विचारपूस व्हायची. बबनरावचे खऱ्या अर्थाने अनुकरण त्यांचा पूर्ण परिवार करीत होता.

आज बबनराव दादा आज आपल्यात नाहीत . पण एक आमदार म्हणून एक माणूस म्हणून श्री संत गाडगेबाबा अध्यासनाचा अध्यक्ष म्हणून तसेच भारतीय विद्या मंदिराचा पदाधिकारी म्हणून त्यांनी जे काम केलेले आहे ते शब्दातीत आहे. अशा या माणुसकीच्या झरा असलेल्या माणसाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

 

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा