You are currently viewing जीवनातील सौंदर्य

जीवनातील सौंदर्य

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*द शो मस्ट गो ऑन*

 (पुष्प तिसरे)

 *जीवनातील सौंदर्य*

 

पहिल्या लेखात मी मदर टेरेसाने सांगितलेल्या जीवन विषयक काही व्याख्या नमूद केल्या होत्या. आयुष्याचा हा खेळ चालू असताना प्रत्यक्ष आयुष्य किती सुंदर आहे याचा विचार होणे मला

गरजेचे वाटते.

*Life is a beauty, admire it.* अर्थात जीवन अतिशय सुरेख आहे,त्याच्या सौंदर्याची दखल घ्या.

विधात्याने सृष्टी निर्माण केली. रंग,रस,रूप,गंधाने भरलेली ही सृष्टी!

एखाद्या वाहणाऱ्या तलावाकाठी बसावे,आणि पाण्यात शांतपणे विहार करणाऱ्या पांढऱ्या शुभ्र बदकाच्या जोडीला पाहून मन प्रफुल्लित व्हावे, पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात तलावातील चमचमणारे पाणी आणि त्यात उगवलेली नील कमले पाहून अल्हादित व्हावे. सृष्टीच्या या सौंदर्याने आपण जीवनातील आनंद लुटावा.

देठाला असंख्य काटे असून सुद्धा फुलांचा राजा गुलाब कसा अगदी दिमाखात फुललेला असतो आणि परिसर सुगंधित करतो. त्याला त्याच्या देठावरील टोचणाऱ्या काट्यांची तिळमात्र पर्वा नसते. पाण्याकाठी चिखलात कमळे उगवतात,परंतु त्या चिखलाची कमळांना कुठे फिकीर आहे? कमळाच्या सौंदर्याला चिखलामुळे जराही बाधा आलेली नाही. चंदनाच्या झाडाला विखारी सर्पाचा विळखा असला तरी ते त्याचा सुगंध वाटण्याचा धर्म सोडीत नाही. प्रत्येक सजीव वस्तूतील सौंदर्य नेमके शोधणे आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदाचा उपभोग घेणे हेच खऱ्या अर्थाने जगणे आहे. नाहीतर,ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे,

” *का कमलकंदा आणि दर्दुरी*

*नांदणूक एकेची घरी*

*परागुसेवीचे भ्रमरी*

जवळीला चिखलुची उरे”*

भ्रमर आणि बेडूक एकाच ठिकाणी राहतात, परंतु भुंगा कमळातील पराग सेवन करतो आणि बेडकाला मात्र कमलपुष्पाखालील चिखलच प्रिय वाटतो. तो त्या चिखलातच राहणे पसंत करतो.

माणसाचे ही तसेच आहे. भोवतालच्या चांगल्या आनंददायी गोष्टी तो नजर अंदाज करतो आणि दुःखद गोष्टींना कवटाळून तो माणूस जीवनात कधीच आनंद उपभोगत नाही. मग स्वतःच्या नशिबाला दोष देत रडत राहतो.

जीवन हे धबधब्यासारखे आहे. कडे कपारीतून कोसळताना कुठेतरी आपटणारच परंतु जन्ममृत्यूच्या खेळात यशापयश पचवून पुढे तर प्रत्येकाला जायचेच आहे. थांबून कसे बरे चालेल? सोबतीच्या आपल्या माणसात आनंद वाटून, उत्साहाचे बीज पेरून त्यांचे जीवन फुलवून त्यांच्या हृदयात कायम स्थान मिळवायचे आहे.

आपण एखाद्या संगीत सभेला गेलो, की सभा आटपल्यावर घरी जाताना ते गाण्याचे किंवा वाद्याचे सूर

सोबत घेऊन जातो,एखादे नाटक किंवा सिनेमा पाहिला की त्यातील काही विशिष्ट प्रसंग आपल्या कायम लक्षात राहतात,तद्वतच आपले आयुष्य दुसऱ्याच्या मनात घर करून जेव्हा बसते तेव्हाच आपण सुरू केलेला शो पुढे चालू राहतो.

मंगेश पाडगावकर यांनी

एक कविता लिहिली,आपल्या सर्वांचे लाडके पु.ल.देशपांडे यांनी ती कविता स्वरबद्ध केली आणि पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांनी गाऊन ती अमर केली…..

” *माझे जीवन गाणे*

*व्यथा असो आनंद असू दे*

*प्रकाश किंवा तिमिर असू दे*

*वाट दिसो अथवा न दिसू दे*

*गात पुढे मज जाणे”*

तेव्हा प्राप्त परिस्थितीत, तक्रार न करता, जीवनाचा आनंद घेत मार्ग क्रमण करायचे आहे, पुढे जात राहायचे आहे. द शो मस्ट गो ऑन….

( क्रमशः)

 

*अरुणा मुल्हेरकर*

*मिशिगन.*

प्रतिक्रिया व्यक्त करा