You are currently viewing वास्तवता

वास्तवता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि.ग.सा. लिखित कवितेचे कवयित्री सौ.ऐश्वर्या डगांवकर यांनी केलेलं रसग्रहण*

 

*वास्तवता*

**********

जगणे इतुके जाहले तरीही अजुनी

अंतरास कुणीतरी जाणावेसे वाटते

सत्यार्थ या जीवनाचा गवसला कां ?

याची संभ्रमात आज मन घुटमळते…..

 

भवताल साराच , स्वमग्नी गुंतलेला

हा जन्म सारा अंधारला असे वाटते

आशा निराशेचा माहोल झगडणारा

अंकुर प्रीतभावनांचा सुकला वाटते….

 

कुठले वात्सल्य कुठले ते मायापाश

जगताना सारे आज मृगजळ भासते

ऋतुऋतु पंचभुतेही आज बावरलेली

हीच वास्तवता क्षणाक्षणा त्रस्त करते

*****************************

*रचना क्र.१८५ / ७/११/२०२४*

*#©️वि.ग.सातपुते.(भावकवी )*

*📞( 9766544908 ) बेंगलोर*

———————————————

*वास्तवता –(रसग्रहण)

कवी– ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी *वि .ग.सातपुते (भावकवी )*

 

अगदी खर आहे उतारवयात सर्व जीवनच निरर्थक वाटते.कुणी आपले मन कधी जाणूनच घेतले नाही याची खंत जीवास वाटते.जीवनाचा खरा अर्थ अजून तरी आपल्याला कळलाच किंवा नाही याची विचारात मन अडकले असते.

 

आजूबाजूला जो तो आपल्यातच गुंतलेला असतो.

कुणाचं कुणाला काही सोयरसुतक नसतं.घोर निराशेत मन बुडून जाते.जीवनाची वाट,ध्येय , अर्थ विसरून जातं.सारा जन्मच व्यर्थ गेला असं सतत वाटत रहातं.चांगल काही घडलं की मनात आशा पल्लवित होतात त्याउलट कधी कधी अपेक्षेप्रमाणे नाही घडलं तर घोर निराशा मनात दाटून येते.आपापसातील प्रेमाचा मायेचा अंकुरच खुंटला आहे असं वाटतं.

 

कशासाठी मुलाबाळांत गुंतलो . नातेवाईकांच्या मायेच्या बंधनात अडकलो ते सर्व आता काहीच उरले नाही की काय अशी भिती मनात दाटून येते.नात्यांमधील मायेचा ,प्रेमाचा आपल्याला केवळ भासच झाला की काय असंही वाटू लागतं.

खरंतर हेच कटु सत्य आहे आता सर्व जग बदललं आहे नात्यांचे ,प्रेमाचे ,मायेचे ऋतु बदलले आहे .सर्वच बदललं आहे . आज निसर्गाचे चक्र ही बदललं आहे.वेळीअवेळी पडणारा पाऊस,तप्त उन्हाळा ओसाड जंगलं पाहून मनाला अस्वस्थता आहे.मन बेचैन आहे.जाताजाता उतारवयातील मानवी स्वभावाची आणि निसर्गाची सांगड उत्तम घातली आहे.

वि.ग.सा. ना भावकवी उगाच नाही म्हटले जात यांची प्रचिती या कवितेतून आपल्या सर्वांना येते.उतारवयातील मानसिक आंदोलन खूप उत्तम वर्णिले आहे.अगदी आजकालच्या परिस्थीती शी निगडीत आहे.एकटेपणा जाणवतो.त्यातून मनाला येणारी निराशा स्वाभाविक आहे.आतापर्यंत जोडलेले मायेचे संबंध फोल होते की काय इतपत नात्यांमध्ये दुरावा येत चालला आहे.कौटुंबिक वात्सल्याला तर फारच तडा गेला आहे.आजपर्यंत ज्यांच्यावर भरभरून प्रेम केलं ,सर्व आयुष्य ज्यांच्या सुखासाठी वेचलं त्यांना आपल्याशी बसून दोन शब्द बोलायला वेळ नाही.घरात संवाद नाही . अशावेळी एकटेपणा येणारच आणि त्या एकटेपणा तूनच निराशेचा अंधार पसरणार हे निश्चित.आजूबाजूला बदललेली वातावरण जग सर्वकाही त्रासदायक वाटणारचं त्यातच भर म्हणून निसर्ग ही आपले रंग बदलू लागला आहे.त्याला कारणीभूत मनुष्यच आहे.हे सर्व काही जाणवून पुढे काय होणार या विचाराने मन विचलीत झालं आहे.

खूप सुंदर कविता.

 

*सौ.ऐश्वर्या डगांवकर इंदूर*

९३२९७३६६७५.

प्रतिक्रिया व्यक्त करा