You are currently viewing फळपिक विमा योजनेच्या पोर्टलबाबत अडचणी दुर करा

फळपिक विमा योजनेच्या पोर्टलबाबत अडचणी दुर करा

फळपिक विमा योजनेच्या पोर्टलबाबत अडचणी दुर करा

जिल्हा बॅंक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिका-यांना निवेदन

सिंधुदुर्ग

हवामानावर आधारीत फळपिक विमा योजनेच्या पोर्टलबाबत येणाऱ्या अडचणी दुर करण्यात याव्यात. तसेच विमाधारक शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणी आहेत. त्याबाबत संबंधित अडचणी दूर करण्यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचेशी चर्चा करुन त्यांना निवेदन देण्यात आले.
हवामानावर आधारीत फळपिक विमा योजनेत संपुर्ण क्षेत्राचा विमा आत्तापर्यंत उतरवला जात होता. परंतू चालु वर्षी फक्त सातबारा वरील लागवडीलायक क्षेत्राचा विमा उतरवला जात आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी वरकस जमिनीमध्ये बागायती लागवड केलेली असून देवगड सारख्या भागामध्ये कातळ क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर आंबापीकाची लागवड केलेली आहे. सदर संपूर्ण क्षेत्रावरील बागायतीसाठी बँकांनी कर्ज दिलेली असून त्यानुसार विमा होणे आवश्यक आहे. मात्र, चालू वर्षी ही अडचण निर्माण झालेली आहे. केवळ पीकक्षेत्राचे नुकसान झाल्यास त्याचा फायदा मिळतो . मात्र पोटखराब क्षेत्रातील बागायती नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचित राहतात. तसेच सातबारा मधील सहहिस्सेदारांचे संमत्ती पत्राऐवजी सभासदाचे प्रतिज्ञापत्र घेवून पीक विमा पोर्टलवर माहिती अपलोड करण्यात यावी व गेल्यावर्षी पीक विमा भरलेल्या व नुकसान भरपाई जाहीर झालेल्या सावंतवाडी तालुक्यातील निरवडे, कुडाळ तालुक्यातील ओरोस बु., भडगांव, गोठोस तसेच दोडामार्ग तालुक्यातील तळकट व कोनाळ या महसुल मंडळांना तसेच उर्वरीत महसुल मंडळातील काही शेतकरी सभासदांना अद्यापही नुकसान भरपाई प्राप्त झालेली नाही. या सर्व त्रुटी दुर होईपर्यंत विमा हप्ता भरण्यासाठी 30 नोव्हेंबर ऐवजी आणखी एक महीना मुदतवाढ मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, समीर सावंत, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा