You are currently viewing संविधान सप्ताहाचे 2 डिसेंबरपर्यंत आयोजन

संविधान सप्ताहाचे 2 डिसेंबरपर्यंत आयोजन

संविधान सप्ताहाचे 2 डिसेंबरपर्यंत आयोजन

सिंधुदुर्गनगरी 

 भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने समाज कल्याण विभागांतर्गत दि. 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2024 या कालावधीत संविधान सप्ताहाचे आयोजन करुन संविधान दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी येथे सहाय्यक लेखाधिकारी उदय यादव, यांचे हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण  करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, विविध महामंडळे व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्ग या कार्यालयातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.

            दि.26 नोव्हेंबर 2024 ते दि. 02 डिसेंबर 2024 या कालावधीत जिल्ह्यातील शाळा व महाविदयालयांमध्ये तसेच अधिनस्त शासकीय वसतिगृहे, शाळा महाविद्यालयांमध्ये संविधान उद्देशिका दर्शनी भागात लावून संविधान रॅली काढण्याचे गृहपाल, मुख्याध्यापक, प्राचार्य यांना सूचित करण्यात आले आहे. संविधानातील माहिती मार्गदर्शन करणे, पथनाट्य सादर करणे, संविधानातील प्रमुख प्रकरणे हक्क आणि कर्तव्ये यावर मार्गदर्शन करणे, प्रश्नमंजुषा सादरीकरण करणे. तसेच जिल्हास्तरावर शाळा/महाविद्यालये येथे, संविधानावर आधारित निबंध लेखन, भाषण, वादविवाद चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आहवान  समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा