(अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन दिनांक 27 नोव्हेंबर रोजी होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्ष सौ रजिया सुलताना यांचा हा संक्षिप्त परिचय)
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील हिवरखेड या गावी राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सौ.. रजिया सुलताना यांची निवड झाली आहे. त्यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करून संयोजकांनी अध्यक्षपदाचा खऱ्या अर्थाने मान राखला आहे. रजियाताईंना मी गेल्या अनेक वर्षापासून पाहत आहे. सर्वसामान्य परिसरात राहणारी ही स्त्री आज तिच्या कार्यकर्तृत्वामुळे लेखनामुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकारात्मक कृतिशील चर्चेचा विषय आहे. सर्वश्री नरेंद्र दाभोळकर बाबा आढाव शिवाजी पानसरे आ.ह. साळुंखे यांच्यासारख्या थोरा मोठ्यांच्या विचारांचा वारसा ती विदर्भात तसे अनुकूल वातावरण नसताना प्रत्यक्ष आचरणात आणत आहे. प्रत्यक्ष बोलणे वेगळे आणि प्रत्यक्ष आचरणात आणणे वेगळे. पण ही किमया रजिया ताईंना गवसली आहे. अमरावतीचा फ्रजरपुरा हा वेगवेगळ्या कारणासाठी नेहमी चर्चेत राहणारा प्रभाग आहे. याच प्रभागामध्ये केरळ व बिहारचे राज्यपाल श्री रा सू उर्फ दादासाहेब गवई यांचे बऱ्याच वर्षापासून वास्तव्य होते. त्यांच्या घरापासून जवळच रजियाताईचे निवासस्थान. रजिया यांनी खूप हाल हा अपेक्षा सहन केल्या आणि आजही करीत आहेत .परंतु त्या डगमगल्या नव्हत्या आणि नाहीतही आणि डगमनार नाहीत. कारण त्यांनी त्यांचे मन कृती आचरण ह्या त्रिमिती सत्याशी पक्क्या करून ठेवलेल्या आहेत. त्याला कोणीही छेद देऊ शकत नाही. खरं म्हणजे रजिया ताई प्राध्यापिका असत्या तर त्यांच्या ठिकाणच्या या त्रिमितीला जागतिक स्तरावर आणि प्रतिसाद मिळाला असता. पण घरची आर्थिक परिस्थिती बेताची. समाजकार्याची आवड. मुस्लिम धर्मात असल्यामुळे धर्माची बंधने साहजिकच आली. पण हे सारे तारतम्य सांभाळून अन्यायग्रस्त स्त्रियांच्या हृदयात त्यांनी आपले स्थान पक्के केले आहे. रजिया यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील स्त्रियांना खऱ्या अर्थाने जागे करण्याचे त्यांना न्याय मिळवून देण्याचे पवित्र कार्य केले आहे आणि करीत आहेत. रजियाताईंचे माझे या ना त्या कारणामुळे घरी येणे जाणे असते. एक वेळ मला आठवते आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील महात्मा फुले राज्यस्तरीय सत्यशोधक साहित्य संमेलनाला गेलो होतो. संमेलन संपल्यानंतर आम्ही सर्वजण बस स्टैंड वर आलो. रात्र झाली होती. आम्ही बसची वाट पाहत होतो. रजिया यांचा सतत प्रवास आणि तोही बसने. त्यांनी बस येण्यास वेळ आहे हे पाहून त्या चक्क बेंचवर झोपी गेल्या. किती हा साधेपणा. आजकालच्या समाज कार्यकर्त्यांना गाडी लागते हॉटेल लागते चांगले जेवण लागते आणि चांगले मानधन पण लागते. पण रजियाताई या चौकटीमध्ये कधीच जगल्या नाहीत आणि जगणारही नाहीत. एक वेळची गोष्ट आहे .ताई मला भेटावयास माझ्या घरीआल्या. तीस एक वर्षे झाली असतील. मी त्यांची पर्स पाहिली. त्या मला प्रेमाने दादा म्हणतात. आपल्या बहिणीजवळ साधी चांगली पर्सही नाही हे माझ्या लक्षात आले. मी लगेच विद्याला सांगितले . विद्याने तिच्या ठेवणीतील एक चांगली पर्स रजिया यांच्या हवाली केली. मोठ्या कष्टाने त्यांनी ती स्वीकारली . माझ्याकडे जेव्हा महिलांचे प्रश्न येतात तेव्हा मी त्यांना रजिया यांचा पत्ता देतो. फोन नंबर देतो. ज्या स्त्रीवर अन्याय झालेला आहे त्या स्त्रीला न्याय मिळवून देण्याचे पवित्र कार्य ताई करीत आहेत. बोलण्यामध्ये तर त्यांचा कोणी हातच पकडणार नाही .इतक्या त्या स्पष्ट वक्त्या आहेत. ऐकणारे पाहत राहतात .ही बाई इतकी स्पष्टपणे बोल्ड बोलतेच कशी. पण या स्पष्टपणे बोलण्याला तिने सभोवताली अनुभवलेल्या अनुभवांची शिदोरी आहे. त्यामुळे या शिदोरीचा उलगडा त्या आपल्या बोलण्यामध्ये लेखनामध्ये सातत्याने करीत असतात. रजिया त्यांची राहणी साधी आहे. कुठलाही अनावश्यक नट्टापट्टा नाही. कुठलेही भारी पेहेराव अंगावर नाहीत. अशी ही साधीसुधी पुरोगामी व ज्वलंत बाई आज महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ती म्हणून रुजू झालेली आहे. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. चांगल्या शुभ्र वस्तीत राहणे नाही. विलासी जीवन नाही. पण तरीही रजियाची लेखणी सतत सुरू असते. खरं ते ती लोकांसमोर मांडते आणि लिहिते. तिच्या स्पष्ट लिहिण्यामुळे तिच्या घरावर दगडफेकी झाली आहे. तिला मारण्याच्या धमक्याही मिळाल्या आहेत .पोलीस संरक्षण द्यावे लागले .इथपर्यंत मजल गेलेली आहे. पण ती थांबली नाही . ती तिचे काम प्रामाणिकपणे करीत राहिली. आणि त्याचे फळ आज तिला मिळाले आहे .आज महाराष्ट्रात त्यांचे पुरोगामी सामाजिक चळवळीमध्ये नाव आहे आणि आमच्या अमरावती करांना ती अभिमानाची बाब आहे. अमरावती जिल्ह्यात मोर्शी तालुक्यात हिवरखेड येथे होणाऱ्या सत्यशोधक संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करून आम्ही सामाजिक कार्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी रजिया ताईंच्या ऋणातून उतराई होण्याचा हा अल्पसा प्रयत्न केला आहे. रजियाताई तुम्ही ज्या खंबीरपणे स्पष्टपणे खऱ्या अर्थाने सामाजिक कार्याला वाहून घेतले आहे .खरोखर तुमच्या कार्याला मनापासून सलाम.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आयएएस
अमरावती
9890967003