*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*४४) माझे गाव कापडणे..*
ऐका तर पुढे काय झाले…
कुसुंब्याजवळील खेडे येथील सरकारी रहदारी
बंगला जाळण्यात श्री. मुरतलाल जीवलाल शहा,यांनी पुढाकार घेतला.अमावस्येच्या रात्री
ते रॅाकेल आणि जुने कपडे घेऊन खेडे येथे गेले.
(मंडळी त्या वेळी वाहतुकीची साधने फारशी
नव्हती).अशात रात्री बे रात्री अंधारात
लपतछपत जायचे …)
तेथील बंगल्याच्या खांबाला त्यांनी फाटके कपडे गुंडाळले.आणि त्यावर रॅाकेल ओतून तो बंगला पेटवला. दुर्दैवाने यावेळी झालेला मोठा जाळ पाहून आजूबाजूचे कुत्रे मोठमोठयाने भुंकू लागल्याने क्रांतिकारकांना तेथून लवकरच घरी
परत यावे लागले.आजूबाजूचे नागरिक जागे झाले . त्यांनी रहदारी बंगल्याला लागलेली आग विझविल्याने खेड्याचा बंगला वाचला…….
दुसऱ्यादिवशी बंगल्यावा आग कोणी लावली
याची कसून चौकशी सुरू झाली. हा बंगला
फॅारेस्ट विभागाच्या ताब्यात असल्याने फॅारेस्ट
ॲाफिसर मि. ताम्हणे यांनी चौकशी सुरू केली.
ते कुसुंबा येथे आले. ते मुरतलाल शहा यांचे मित्र असल्याने फारशी चौकशी झाली नाही.
असिस्टंट कलेक्टर दाजी कोतवाल यांचेही
मुरतलाल जीवलाल शहा आणि त्यांचे वडील
यांच्यातही मैत्री असल्याने प्रकरण पुढे हलले
नाही.
खेड्याचा सरकारी बंगला जाळण्यात मुरतलाल जीवलाल शहा,वेडू बापू लोणू महिपत,दौलत सुकलाल,श्रावण माणिक,मोतीराम व्यंका,झोपडू सखाराम, रामचंद्र,आदि क्रांतिकारकांचा सहभाग होता.ओळखीमुळे फार चौकशी झाली नाही.या घटनेत श्री.मुरतलाल शहा आणि सहकाऱ्यांनी दाखवलेले साहस खरोखर कौतुकास्पद होते.
सरकारी बंगले जाळण्याव्यतिरिक्त स्वातंत्र्य
विरांनी आणखी दुसऱ्या मार्गानेही सरजकारी
मालमत्तेची जाळपोळ प.खानदेशमध्ये केलेली
दिसते. ९ ॲाक्टोबर १९४२ रोजी कापडणे गावात तेथील जनतेने ग्रामपंचायतीच्या ४ दिव्यांची मोडतोड केली.याच दिवशी गावातील एक बसही पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तलाठी गावात नसतांना त्याचे सारे दप्तर लोकांनी जाळून टाकले.या गावात श्री.माधवराव दिवाण पाटील माझे चुलत
आजोबा) हे प्रमुख राष्ट्रीय चळवळीचे नेते होते.तर…
…. १९४२ च्या “चले जाव” आंदोलनात
श्री.विष्णू सीताराम पाटील हे(माझे वडील) प.खानदेश जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक नेते होते.ते देखील कापडण्याचेच. या गावात एकजूट मोठी होती.सरकारला कोणतीच गुप्त माहिती या गावातून मिळेना.तेव्हा सरकारने या गावाला धडा शिकविण्यासाठी जनतेवर सामुदायिक दंड बसविला..तो ही त्या काळी ५०००/- रूपयांचा..
“चले जाव” आंदोलनातील बॅांम्बस्फोट …
मुंबईत अनेक ठिकाणी बॅांम्ब टाकण्याची
कृत्ये सुरू झाली.ही स्फोटके जेव्हा मुंबईला
येऊन पोहोचली तेव्हा तिच्यापासून खानदेशचा
क्रांतिकारक दूर राहणे शक्य
नव्हते.खानदेशच्या क्रांतिकारकांनी मुंबईतील भूमिगत क्रांतिकारकांशी त्वरित संपर्क सांधला व केवळ तीन आठवड्यांच्या आत ही स्फोटके खानदेश मध्ये आणण्यात ते यशस्वी झाले.
वडजई येथील फकिरा आप्पा देवरे हे गुप्तपणे
बंगालमध्ये जाऊन या स्फोटकासंबंधी विशेष
माहिती घेऊन आले होते.त्यामुळे खानदेश
मधील अनेक तरूण त्यांच्याकडे आकर्षिले गेले. व त्यांनी खानदेशात स्फोट घडवून आणून ब्रिटिश सत्तेला हादरा देण्याचे ठरविले.
धुळे , नंदुरबार शहरात स्फोटांची मालिका
सुरू झाली. नंदुरबार येथील श्री.बारकू हिराजी
पाटील हे व फकिरा अप्पा देवरे ,श्री.विष्णू
सीताराम पाटील, कापडणे,यांच्या बरोबर
मुंबई येथे श्री.अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांच्या
कडे गेले होते.त्यावेळी सहस्रबुद्धे पालन शेषपाल बिल्डिंग दादर येथे रहात होते. तेथेच महाराष्ट्र चरखा संघाचे ॲाफिसही होते.
यांच्याकडून श्री. बारकू हिराजी पाटील
(टोकरतळे,नंदुरबार) यांनी बॅांम्ब आणून ….
नंदुरबार मध्ये स्फोटांची मालिका सुरू केली. असे होते धाडसी आपले क्रांतिकारक …
२३ जानेवारी..१९४२ ,१ला स्फोट …नंदुरबार पोलिस चौकी जवळ …२५ जानेवारी १९४३ ,२रा स्फोट म्युनिसिपल हायस्कूल कंपाउंडमध्ये…आणि तिसरा स्फोट…१३ फेब्रुवारी १९४३ रिपन लायब्ररीजवळ झाला …
पण या स्फोटात मालमत्ता वा जीवितहानी
झाली नाही. धुळ्यात श्री. एलमार आणि श्री. शेलकर यांनी बॅांम्बस्फोट घडवून आणले.एलमारांना शिक्षा झाली.शेलकर सापडले नाहीत.हे बॅांम्ब मुंबई येथून चरखा संघाचे अध्यक्ष दे.भ.अण्णा साहेब सहस्रबुद्धे यांनी पाठवले होते.
श्री.विष्णूभाऊ पाटील यांनी क्रांतिकारकांची
सहस्रबुद्धे यांच्याशी ओळख व भेट घडवून
आणली होती.श्री. फकिरा अप्पा देवरे व श्री.
बारकू हिराजी पाटील यांनी रेल्वेचे रूळ काढण्यासाठीच्या लागणाऱ्या अवजारांची
वाहतूक केली. धुळ्यात दोनदा बॅांम्बस्फोट
होऊन श्री.एलमार व श्री.शेलकर भाजून निघाले. श्री.फकिरा अप्पा देवरे यांनी बॅांम्बचे कार्य बंद करून बाकीचे बॅांम्ब पांझरा नदीत पुरून टाकले …किती उद्योगी होती हो ही माणसे …..!
क्रांतिकारकांचे ब्रिटिश प्रशासनाला अडचणीत
आणण्याचे उद्योग चालूच होते.रल्वेमार्ग उखडणे, नटबोल्ट काढणे,फिशप्लेटस् काढणे इ.कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आखले.व त्यात यश मिळवून पूर्ण खानदेश मध्ये खळबळ उडवून दिली. सर्वत्र अशी धूम चालू होती.तारा तोडणे ,जाळपोळ करणे असे करून ब्रिटिश सरकारला आव्हान दिले होते. अनेक ठिकाणी सरकारी दप्तर क्रांतिकारकांनी पळवून नेले किंवा काही ठिकाणी जाळले.प. खानदेश मध्ये कापडणे गावचा तलाठी गावाला गेला असता २६ नोव्हेंबर १९४२ च्या रात्री त्याचे दप्तर क्रांतिकारकांनी पळवले. १८जानेवारी १९४३ रोजी शिंदखेडा व पिलखेडा येथील दप्तर चेरीस गेले. शिंदखेड्याचे दप्तर शिवराम पाटील,माणिक भील,शंकर वंजी पाटील , काशिनाथ गुरव,उदेसिंग ठाकूर यांनी जाळले.
खजिना लूट असो वा इतर काही असो या
देशभक्तांनी, पैशांची अत्यंत गरज असूनही
जनतेच्या पैशाला कधीही हात लावला नाही.
त्याचा परिणाम जनतेवर खूप चांगला झाला.
बरंय् मंडळी, राम राम..
जयहिंद.. जय महाराष्ट्र
आपलीच..
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)