*५ कोटी घेऊन मॅनेज झाल्याचा सोशल मिडियामध्ये आरोप*
*अर्चना घारेंची त्या इसमास विरुद्ध पोलीस तक्रार*
सत्यार्थ महाराष्ट्र या न्यूज चॅनेलने सावंतवाडी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सौ.अर्चना घारे परब यांची मुलाखत घेऊन भविष्यातील वाटचालीबाबत प्रश्न विचारला होता. सदरची मुलाखत सोशल मिडियामध्ये पोष्ट केल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. परंतु दोन तासात अर्चना घारे परब यांच्या त्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना अनंत मांजरेकर नामक एका व्यक्तीने “५ कोटी मिळालेत ना..!” असा प्रश्न करत विधानसभा निवडणुकीत सौ.अर्चना घारे परब या ५ कोटी घेऊन मॅनेज झाल्या आणि अपक्ष उमेदवारी दाखल केली असा आरोप करण्यात आला होता. प्रतिक्रिया वाचताच संतप्त झालेल्या सौ.अर्चना घारे परब यांनी सावंतवाडी पोलीस स्टेशन गाठत सोशल मीडियावरून आपल्यावर बदनामीकारक आरोप करण्यात आल्याने सदर इसमाच्या विरुद्ध लेखी पोलीस तक्रार दिली आहे.
एक महिला राजकीय रणांगणात उतरून समाज हितासाठी काम करत असताना अशाप्रकारे बदनामी करून महिलेचा अपमान आणि खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केल्याने सौ. अर्चना घारे परब यांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांचे लक्ष वेधले तसेच महिला आयोगाकडे देखील तक्रार दिली. सदर तक्रारीची दखल घेऊन पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती अर्चना घारे यांनी दिली आहे.