You are currently viewing “अस्वस्थ माणसांना स्वस्थ करण्याचे काम गझल करते!” – डॉ. शिवाजी काळे

“अस्वस्थ माणसांना स्वस्थ करण्याचे काम गझल करते!” – डॉ. शिवाजी काळे

*”अस्वस्थ माणसांना स्वस्थ करण्याचे काम गझल करते!” – डॉ. शिवाजी काळे*

पिंपरी

“अस्वस्थ माणसांना स्वस्थ करण्याचे काम गझल करीत असते. अर्थातच त्यासाठी परकायाप्रवेश करून गझलकार मानवी भावभावनांना शब्दरूप देत असतो!” असे विचार ज्येष्ठ गझलकार डॉ. शिवाजी काळे यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह, पिंपरी येथे रविवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ रोजी व्यक्त केले. गझलपुष्प कला, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक संस्थेच्या सहाव्या वर्धापनदिन सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. शिवाजी काळे बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते सचिन भेगडे, उद्योजक संजॉय चौधरी, ज्येष्ठ गझलकार प्रमोद खराडे, गझलपुष्पचे अध्यक्ष संदीप जाधव, उपाध्यक्ष प्रशांत पोरे, संस्थापक व सचिव दिनेश भोसले, कोषाध्यक्ष अभिजित काळे आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ज्येष्ठ गझलकार बदीऊज्जमा बिराजदार उर्फ साबीर सोलापुरी यांना ‘गझलपुष्प प्रचार व प्रसार पुरस्कार २०२४’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच नीलेश शेंबेकर लिखित ‘क्षितिजापल्याड’ आणि संदीप कळंबे लिखित ‘मौनातल्या विजा’ या गझलसंग्रहांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना साबीर सोलापुरी यांनी,

“मी मराठीच्या कृपेने धन्य झालो
मातृभाषेचे जसे सौजन्य झालो!”

अशी काव्यात्मक कृतार्थ भावना व्यक्त केली; तर नीलेश शेंबेकर आणि संदीप कळंबे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. अभिजित काळे यांनी, ‘मौनातील विजा’ या संग्रहातील गझला म्हणजे जीवनानुभवाचा परिपाक आहे!” असे मत व्यक्त केले. प्रमोद खराडे यांनी, “आयुष्य जाळल्यानंतर एखादा गझलसंग्रह निर्माण होतो. ‘क्षितिजापल्याड’ मधील शेर अर्थाची दिशा दाखविणारे आहेत!” असे विचार मांडून, “मराठी गझलचळवळीचा संघटितपणे प्रचार अन् प्रसार करण्यासाठी ‘गझलपुष्प’ ही संस्था कटिबद्ध आहे!” असे गौरवोद्गार काढले. डॉ. शिवाजी काळे अध्यक्षीय मनोगतातून पुढे म्हणाले की, “गझल मार्गदर्शकाने आपल्या शिष्यांचे बोट शेवटपर्यंत धरून ठेवले पाहिजे. साबीर सोलापुरी हे शांतपणे गझलेचा प्रचार अन् प्रसार करीत आहेत; तर गझलपुष्प ही संस्था नसून एक मोठे कुटुंब आहे!”

त्यानंतर सुमारे तीन मुशायर्‍यांमधून प्रशांत पोरे, भूषण अहिर, हेमंत जोशी, ज्योत्स्ना राजपूत, गणेश भुते, प्रदीप तळेकर, डॉ. शिवाजी काळे, संजय कुळये, उत्तरा जोशी, मीना शिंदे, संजय खोत, अविनाश घोंगटे, राज अहेरराव, साबीर सोलापुरी, नीलेश शेंबेकर, संदीप कळंबे, समृद्धी सुर्वे, दिनेश भोसले, अविनाश काठवटे, सुहास घुमरे, संदीप जाधव यांनी विविध वृत्तांतील आशयगर्भ गझलांचे प्रभावी सादरीकरण करीत रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळविली.

सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे, राजन लाखे, प्रा. तुकाराम पाटील, आत्माराम हारे, शोभा जोशी, प्रदीप गांधलीकर, राजेंद्र घावटे, चंद्रकांत धस, सविता इंगळे, वैशाली माळी, माधुरी विधाटे, जयश्री श्रीखंडे, सुभाष मोहनदास, ॲड. अंतरा देशपांडे, नंदीन सरीन यांच्यासह विविध साहित्य संस्थांमधील अनेक मान्यवरांनी सभागृहात उपस्थिती दर्शविली. अनुक्रमे प्रदीप तळेकर, समृद्धी सुर्वे, राज अहेरराव, नीलेश शेंबेकर यांनी विविध सत्रांचे सूत्रसंचालन केले. सोहळ्याच्या समारोप प्रसंगी जयेश पवार यांनी ‘गझलगुज’ या कार्यक्रमांतर्गत वेगवेगळ्या गझलांचे एकल सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. दिनेश भोसले यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा