आपल्या देशात भारतीय प्रशासनिक सेवा (IAS) ही आदरणीय शिर्ष सेवा म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या सेवेचा खर्याअर्थाने प्रारंभ ब्रिटिश राजवटीत भारतीय शासन अधिनियम 1858 नुसार झाला होता. त्याकाळी, ह्या प्रशासकीय सेवेला इंडियन सिव्हिल सर्व्हिस (ICS) असे संबोधले जात असे. स्वातंत्र्यानंतरच ह्या सेवेचे नामाभिधान इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असे झाले. ब्रिटीश काळात ह्या सेवेसाठी घेतली जाणारी परीक्षा ही फक्त लंडन येथेच आयोजित केल्या जात होती. बंगालचे सत्येन्द्रनाथ टागोर हे 1863 साली पहिले भारतीय ICS अधिकारी म्हणून निवडल्या गेले. आता मात्र ही परीक्षा देशातच विविध केन्द्रांवर घेतल्या जाते.
आजही IAS परीक्षेबाबत लोकमानसात खूप विलोभ दिसून येतो. ह्या परीक्षेचा अंतिम निकाल देशभर मोठ्या उत्साहाने प्रतिक्षेत असतो. ग्रामीण लोकांसह शहरी लोकसुद्धा दरवर्षी कोण-कोण ही IAS ची परीक्षा उत्तीर्ण करतो, याबद्दल मोठ्या जिज्ञासाने चौकशी करताना दिसतात. ह्याचे कारण की, ह्या परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांची राज्ये आणि केन्द्र शासनातील मोठमोठ्या मोक्यांच्या पदांवर थेट वर्णी लागते. ह्या स्पर्धा परीक्षेच्या काठिण्यमूल्याचा विचार केला, तर ही स्पर्धा परीक्षा जगभरात एक अवघड परीक्षा समजल्या जाते. हार्वर्ड विद्यापीठाचे सुप्रसिद्ध प्रा. लान्ट प्रिटचेट् ह्यांनी 2010 साली एका मुलाखतीत म्हटले होते की, भारतीय प्रशासन सेवेसाठी घेण्यात येणारी परीक्षा ही हार्वर्ड विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या चाचणी परीक्षेसमानच आहे. सकृतदर्शनी, ही परीक्षा जरी कठीण असली तरी तीत यश संपादन करणे अशक्य नाही. प्रयत्नांची पराकाष्टा हवी.
माजी नामांकित मुख्य निर्वाचन आयुक्त टी. एन. शेषन (1955 चे IAS) ह्यांनी असे म्हटले होते की, IAS समान सर्वसमावेशक प्रशासन सेवा जगातील अन्य कोणत्याही देशात सापडत नाही. सेवा देशातील शिक्षित तरुणांना एक आव्हान असून निवड झालेल्या अधिकाऱ्यांना राष्ट्रसेवेची एक नामी संधी उपलब्ध होते. पुढे ते असेही म्हणले होते की, ह्या परीक्षेत यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रमाचा अनुभाग 90 टक्के असून उर्वरीत 10 टक्क्याचा अनुभाग हा प्रेरणेचा असतो. ह्याचा साधा आणि सरळ अर्थ असा होतो की, कठोर परिश्रमाशिवाय ह्या परीक्षेत यश संपादन करणे दुराराध्य ठरते. अपेक्षित यश पदरात पडण्यासाठी स्पर्धकाचे ठायी भरगच्च आत्मविश्वास, निर्धारशक्ती, अभ्यासूवृत्ती, आणि परीश्रम उपसण्याची सवय अशा गोष्टींचा संच असणे अनिवार्य ठरते. केन्द्रिय लोकसेवा आयोगातर्फे दरवर्षी ही परीक्षा तीन टप्प्यात घेतल्या जाते. पहिला टप्पा – प्रारंभिक परीक्षेचा; दुसरा टप्पा – मुख्य लेखी परीक्षेचा आणि तिसरा टप्पा हा मौखिक परीक्षेचा असतो.
या परीक्षेमध्ये यश मिळविणसाठी स्पर्धक आपल्या वैकल्पिक विषयात पारंगत असणे अनिर्वाय ठरते. त्याशिवाय त्यांचे सामान्यज्ञान वाखाणणसारखे असावे लागते. माझ्या आकलनानुसार सुमारे 60 टक्के प्रश्न हे सामान्यज्ञानाशी संबंधीत असतात. त्यात अनेक विषयांचा/उपविषयांचा गठ्ठा असतो. उदा. भारताचा इतिहास, स्वातंत्र्य चळवळ, भारतीय संविधान, राजकारण, भारतीय कृषी आणि सिंचन व्यवस्था, आर्थिक धोरणे, औद्योगिक विकास, संचार आणि तांत्रिक विकास आणि आव्हाने , वने व पर्यावरण, परराष्ट्र धोरण, उर्जा निर्मिती, संरक्षण धोरण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, भौगोलिक माहिती, इत्यादी. (ही यादी पूर्ण नाही)
आज देशात 65 टक्के लोक ग्रामीण भागात वास करतात. जर ग्रामीण भागातील शिक्षित तरुणांनी IAS मध्ये प्रवेश केला तर, ग्रामीण क्षेत्रातील प्रशासन हे अधिक लोकाभिमुख होण्यास मदत मिळू शकेल. खरे म्हटले तर, भारतासारख्या खंडप्राय देशात राज्य / केन्द्र शासनाचा कार्यभार ही एक अतिशय संकिर्ण व्यवस्थापन प्रक्रिया आहे. विविध प्रदेश, जाती, धर्म, वंश, भाषा आणि राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रातील असमानता, यामुळे प्रशासन प्रक्रिया एवढी जटिल स्वरुपाची बनते की, लोकाभिमुख प्रशासनाचा गाडा हाकणे, हे एक अवघड कार्य होऊन बसते. पण, जर अधिकाऱ्यांच्याठायी न्याय भावना जागृत असेल तर समाजातील सर्व घटकांना समानतेने वागणूक देण्यासाठी आणि कोणत्याही दबावाखाली न येता कायद्यान्वये आपले काम त्रयस्थबुद्धीने पार पाडण्यासाठी शासनाला शिस्तप्रिय, बुद्धिमान, उद्योगशील, प्रामाणिक, खंबिर आणि जबाबदारीने वागणाऱ्या प्रशिक्षित मनुष्यबळाची अत्यंत गरज असते आणि ती निकड प्रशिक्षित IAS अधिकारी पूर्ण करु शकतात. कारण, ही सेवा आपल्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण देण्याची पराकाष्टा करीत असते. आपण जर IAS ह्या सेवेच्या प्रशिक्षणाचा तक्ता बघितला, तर लक्षांत येईल की, या देशातील कुठलीच दुसरी सेवा आय्. ए. एस्. सेवेच्या प्रशिक्षण साच्याची बरोबरी करु शकत नाही. हीच एक गोष्ट भारतीय प्रशासनिक सेवेच्या महत्तेचे एक गमक आहे!
भारतीय प्रशासनिक सेवा अधिकाऱ्यांचे प्रशासनातील महत्त्व अनन्यसाधारण आहे; याबाबत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1948 साली संविधान सभेत स्पष्ट केले होते की, भारतीय नागरी सेवा (Civil Services) ही शासनाचा पाठिचा कणा आहे. त्यामुळेच अशा या सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा ढाचा सर्वसमावेशक आखला जातो. IAS अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांच्या एवढी लोकमान्यता तुलनात्मकदृष्ट्या इतर सेवेतील अधिकाऱ्यांच्या वाट्याला येत नाहीत. त्यामुळे इतर सेवेतील, जसे IPS, IFS, IRS इत्यादी अधिकारी नेहमी IAS सेवेचा आणि IAS अधिकाऱ्यांचा हेवा करतांना दिसतात. त्यांच्याबाबत मनात आकस ठेवतात. तथापि, केन्द्रीय लोकसेवा आयोगाकडे अर्ज करतांना मात्र या सर्व स्पर्धकांचे हमखास पहिले प्राधान्य IAS याच सेवेला दिलेले असते. पण, स्पर्धेत त्यांची निवड IAS ऐवजी इतर सेवेत झाली, तर ते सर्व अधिकारी आयुष्यभर IAS सेवा आणि त्या सेवेतील कार्यशील अधिकाऱ्यांविषयी नेहमी मनात असूया बाळगतात. वास्तविकता असे व्हायला नको.
IASची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबरोबर उमेदवारांना हिमालयाच्या पर्वतरांगाच्या आणि आभाळाच्या निळाईत लपलेल्या मसूरी (उत्तराखंड) येथे लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन येथे एक वर्षभर प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण मोठ्या विविधतेने नटलेले असते. जसे : संस्थात्मक प्रशिक्षणाशिवाय गिरीभ्रमण, भारतीय लष्कराशी जोड, अशासकीय संस्थांची जोड, सपाट प्रदेशातील एखाद्या गांवात राहून लोकजीवनाचा अभ्यास, दुर्गम, पहाडी भागातील दुसऱ्या एका गांवात राहण्याचा सराव आणि तेथील लोकजीवनाचा आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात उद्भवणार्या प्रश्नांचा अभ्यास, लोकसभा-राज्यसभा भेट आणि त्या संस्थांच्या कारभाराविषयाचा अभ्यास, राष्ट्रपतीशी भेट आणि त्यांचेसोबत राष्ट्रभवनाच्या मोगल गार्डन येथे रात्रीभोज सहभाग, पंतप्रधानांची भेट, लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्यांशी संवाद असे सर्व प्रसंग प्रशिक्षण काळात घडतात. अशा प्रसंगामुळे IAS परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांच्या मनात आपल्या सेवेचे स्थान किती लक्षणीय आहे; याची कल्पना येते आणि आपल्यासेवेबद्दलच्या अभिमानही उद्दिपीत होतो. याशिवाय, IAS अधिकार्यांना भारतदर्शनाचा भाग म्हणून देशातील विविध भागात जावून अनेक राज्य किंवा केन्द्राच्या अखत्यारित येणाऱ्या संस्थांचा अभ्यास करायची संधी उपलब्ध करुन दिल्या जाते. एकप्रकारे, IAS अधिकार्यांना प्रशासनातील पूर्णत्वाकडे नेणारा हा प्रशिक्षण आराखडा आहे. खरेच हे प्रशिक्षण खूप आव्हानात्मक असते !
जिल्हा पातळीवर, जिल्हाधिकारी हे पद अतिशय महत्त्वपूर्ण असते. माझ्यामते हा अधिकारी जिल्हापातळीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची एक लहान प्रतिकृती म्हणूनच कार्य करतो. जिल्ह्यातील विविध विभागादरम्यान समन्वय साधून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना यशस्वीपणे राखविण्यासाठी सक्रिय असतो. जिल्ह्यात ‘कायदा आणि सुव्यवस्था’राखण्यासाठी जिल्हाधिकारी जबाबदार असतो. याकामासाठी त्याला जिल्हा पोलीस प्रमुखाची भरपूर मदत लाभते. पूर, दुष्काळ, आग,दंगली किंवा रोगराई अशा नैसर्गिक आपत्तींचे वेळी जिल्हाधिकार्याचे ठायी असलेले व्यवस्थापन कौशल्य आणि संबंधित विभागातील लहानमोठ्या अधिकार्यांशी असलेले समन्वयन अतिशय कारगर ठरणारे असते. खरे पाहता, जिल्हाधिकारी ही एक व्यक्ती नसून, ती एक चालती बोलती कल्याणकारी संस्था आहे असे वाटायला लागते; आणि ज्या अधिकार्यांजवळ जबाबदारीची भावना आणि लोकसेवेची स्वाभाविक कळ प्रबळ असते, तेथे मग प्रशासन सुशासन बनते. पुढे हाच अधिकारी अनुभवाच्या जोरावर राज्य स्तरावर, केन्द्रांत मोठे मोठी प्रशासकीय पदें भूषवितो. प्रशासनाच्या विविध, संकिर्ण अंगाचा सर्वसमावेशक अभ्यास पाठीशी असल्यामुळे अनेक आय्. ए. एस्. अधिकारी सेवानिवृत्तीनंतरही शासनात किंवा खाजगी क्षेत्रात महत्त्वपूर्ण पदांवर काम करतांना दिसतात. काहीजण तर समुचित परिस्थिती चालून आल्यास मंत्री बनतात, खासदार, राज्यपाल होतात. थोडक्यात हे अधिकारी तुलनात्मकदृषट्या अधिक काळापयर्ंत नॉट आऊटच्या अवस्थेत टिकून राहतात.
ज्या अधिकार्यांच्या डी. एन्. ए. मध्ये लोकसेवेचे व्रत आहे, अशांसाठी आय्. ए. एस्. हे लोकसेवेचे एक प्रभावी साधन ठरु शकते. खरे पाहता; आय्. ए. एस्. होणे हे कोणाचेही ‘साध्य’असू नये. तर ते ‘साधन’ म्हणून आपल्या ‘भव्य’साध्याकडे जाण्यासाठीचे एक ‘साधन’ म्हणून वापरावे. तरच, त्या सेवेची पोत चमकते. प्रत्येकाने ‘साध्य’ आणि ‘साधनात’ फरक केला पाहिजे. अनेकजण जेव्हा साध्य आणि साधनात गफलत करतात, तेव्हा त्यांचेठायी वैफल्य वास करताना दिसते. अलिकडे, या शिर्ष सेवेत अनेक लोभी शिक्षित तरुण घुसलेले दिसतात. त्यामुळे या सेवेला गालबोट लागलेले दिसते. त्यामुळेच आता सामान्यांचा या सेवेवरील विश्वास घसरलेला दिसतो. तथापि, मला स्पष्ट म्हणायचे आहे की, IAS ही सेवा बावन्नकशी सोन्याप्रमाणे शुद्ध आहे; आणि शुद्ध राहीन! ‘IAS सेवा नको’ असे सूर गेल्या दीडशे वर्षापासून अधूनमधून घोंगावत आहेत. तरीपण ही सेवा टिकून आहे. यातच तिचे महत्त्व दडलेले आहे. आता IAS सेवेला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. खोट जर कोठे दिसत असेल, तर ती त्या सेवेत काम करीत असलेल्या काही अधिकार्यांच्या वैयक्तिक पातळीवर आहे. येथे ‘सेवा’ आणि ‘अधिकारी वर्ग’ ह्यांत आपणाला मूलत: भेद करावा लागेल! तो मी करतो!!
विश्वनाथ शेगावकर, आएएस (से.नि.)
9840392005