कणकवली :
दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत कलमठ गावची सिंधुकन्या अक्सा मुदस्सर शिरगावकर हिला राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत सांघिक रौप्य पदक प्राप्त झाले आहे.
गुजरात येथे १४ वर्षांखालील वयोगटात घेण्यात आलेल्या आंतरशालेय ६८ व्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत ५० मीटर कंपाउंड आर्चरी प्रकारात तिने सांघिक रौप्य पदक प्राप्त केले आहे.
१४ वर्षांखालील वयोगटातील राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा १८ ते १९ नोव्हेंबर दरम्यान गुजरात राज्यातील नडियाड येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये संपन्न झाली. १४ वर्षे वयोगटातील राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत देशातील विविध राज्यातील एकूण ७२ स्पर्धक सहभागी झाले होते.
अक्सा हिने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत आपल्या सहकारी तीन स्पर्धकांसह रौप्य पदकाची कमाई केली. अक्सा ही कणकवली येथील पोदार हायस्कुल ची विद्यार्थिनी असून कणकवली तालुक्यातील कलमठ येथील शासकीय ठेकेदार मुदस्सर शिरगावकर आणि न्यू खुशबू स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या संस्थापिका तन्वीर शिरगावकर यांची सुकन्या आहे.
सातारा येथील दृष्टी आर्चरी अकॅडमी चे संस्थापक प्रशिक्षक प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अक्सा हिने हे सुयश प्राप्त केले आहे. राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत सांघिक रौप्य पदक प्राप्त केल्याबद्दल अक्सा हिचे सिंधुदुर्गात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.